उत्सुकता पुनरागमनाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2016 05:52 AM2016-09-10T05:52:20+5:302016-09-10T05:52:20+5:30

एकनाथराव खडसे यांच्या मंत्रिमंडळ तर सुरेशदादा जैन यांच्या राजकारणातील पुनरागमनाची समर्थकांना उत्सुकता आहे

Bed acauch keeping acchant bedch acauarius ac bed Being apose | उत्सुकता पुनरागमनाची

उत्सुकता पुनरागमनाची

Next


एकनाथराव खडसे यांच्या मंत्रिमंडळ तर सुरेशदादा जैन यांच्या राजकारणातील पुनरागमनाची समर्थकांना उत्सुकता आहे
सुरेशदादा जैन आणि एकनाथराव खडसे या दोन्ही नेत्यांच्या पुनरागमाविषयी समर्थकांमध्ये मोठी उत्सुकता आहे.
घरकुल प्रकरणात सुरेशदादा साडेचार वर्षांपासून कारागृहात होते. सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. सर्वपक्षीय नेते, मंत्री, आमदारांनी त्यांची सदिच्छा भेट घेतली. जैन गेल्या ४० वर्षांपासून राजकारणात आहेत, नऊ वेळा आमदार आणि दोनदा मंत्री राहिल्याने संपूर्ण राज्यात त्यांचे हितचिंतक आहेत. जामिनावर सुटल्याने स्वाभाविकपणे चाहता वर्ग भेटायला येणे अपेक्षित होते. परंतु या स्वागत, भेटीगाठींमधून राजकीय अर्थ काढले जाऊ लागले. राजकारणात परतण्याचा तूर्त विचार नाही, असे त्यांनी पहिल्याच दिवशी स्पष्ट केल्यानंतरही तर्कवितर्कांना सीमा उरली नाही.
दुसरीकडे एकनाथराव खडसे यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून समर्थकांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे व पालकमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या उपस्थितीत जंगी सभा झाली. मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला लागण्यामागे स्वपक्षातील काही नेत्यांचा कट कारणीभूत असल्याची जाहीर टीका खडसे यांनी पुन्हा एकदा केली. खडसे यांना पुन्हा मंत्रिमंडळात घ्या, असे आवाहन समर्थकांनी केले. लवकरच खडसे मंत्री होतील, अशी ग्वाही देऊन दानवे, फुंडकर यांनी समर्थकांच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत.
जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात जैन आणि खडसे ही दोन शक्तिकेंद्रे मानली जातात. पक्षीय राजकारणापेक्षा व्यक्तिकेंद्रीत राजकारणाला अधिक महत्त्व आले आहे. जैन घरकुल प्रकरणामुळे राजकारणातून दूर झाले आणि खडसे यांना मैदान मोकळे सापडले. त्यांनी जैन यांची शैली वापरुन सर्व पक्षीयांना एकत्र करुन जिल्हा बँक, जिल्हा दूध संघ, बाजार समिती यावर वर्चस्व मिळविले. मंत्रिमंडळातील डझनभर खाती हातात असल्याने त्यांचा प्रभाव कायम राहिला. मात्र कुटुंबातील तीन सदस्यांना सत्तापदे दिल्याने त्यांना टीकेचे धनी व्हावे लागले. मंत्रिपद गेल्यानंतर स्वत: खडसे आणि त्यांच्या समर्थकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.
चाळीसगाव, पाचोरा, यावल, रावेर, भुसावळ, मुक्ताईनगर या तालुक्यांमधील खडसे समर्थकांनी बैठका घेऊन पक्ष कार्यावर बहिष्काराचा इशारा दिला आहे. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीत झालेल्या पदाधिकारी बैठकीला काही तालुक्यांमधील पदाधिकाऱ्यांनी पाठ फिरवली. या अस्वस्थतेची दखल प्रदेशाध्यक्ष दानवे यांनी वाढदिवस कार्यक्रमाला उपस्थित राहून घेतली असावी, असा अंदाज बांधला जात आहे.
आघाडी सरकारच्या काळात संपूर्ण पाच वर्षे असलेले विरोधी पक्षनेतेपद आणि युती सरकारच्या काळात महसूल, कृषी, उत्पादन शुल्क सारखी महत्त्वाची खाती असल्याने खडसे जिल्ह्यातील एकमेव प्रभावशाली नेते बनले. परंतु मंत्रिपद जाताच पक्षातील विरोधक सक्रीय झाले. निद्रीस्त असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादीने संघटनात्मक मेळावे, आंदोलनांद्वारे अस्तित्व दाखविण्यास सुरुवात केली. शिवसेनेने खडसेंचे कट्टर विरोधक असलेल्या गुलाबराव पाटील यांना मंत्रिमंडळात स्थान देऊन पक्ष बळकटीच्या दृष्टीने पाऊल टाकले आहे.
पुढील सहा महिन्यात विधान परिषद निवडणूक, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. या निवडणुका स्वबळावर लढविण्याची परंपरा असल्याने सर्व पक्ष आता तयारीला लागले आहेत. शिवसेनेला सुरेशदादा जैन यांच्या आगमनामुळे बळ मिळण्याची आशा आहे. त्या दृष्टीने मंत्र्यांपासून संपर्क प्रमुखांपर्यंत अनेक सैनिकांनी त्यांच्या भेटी घेतल्या.
न्या.झोटिंग समितीच्या निष्कर्षावर खडसे यांचे तर घरकुल प्रकरणाच्या निकालावर जैन यांचे राजकीय भविष्य अवलंबून आहे. हे वास्तव नेत्यांना अवगत असले तरी कार्यकर्त्यांना तातडीने पुनरागमनाची आशा लागली आहे.
- मिलिंद कुलकर्णी

Web Title: Bed acauch keeping acchant bedch acauarius ac bed Being apose

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.