मध्य-पूर्वेतल्या नव्या ‘शांतता-पर्वा’चा प्रारंभ

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2020 06:12 AM2020-09-25T06:12:34+5:302020-09-25T06:13:03+5:30

इस्रायल आणि यूएईने राजनयिक संबंध प्रस्थापित करण्याचा निर्णय घेतल्यानंतर लगेचच एका अमिराती गुंतवणूक संस्थेने इस्रायली तंत्रज्ञान कंपनीशी जलदगतीने आणि अचूकतेने कोविड चाचणी करणाऱ्या यंत्रासाठी करार करून व्यापारी संबंधांचा प्रारंभ केला.

The beginning of a new 'peace' in the Middle East | मध्य-पूर्वेतल्या नव्या ‘शांतता-पर्वा’चा प्रारंभ

मध्य-पूर्वेतल्या नव्या ‘शांतता-पर्वा’चा प्रारंभ

Next

- याकोव फिंकलश्टाइन
इस्रायलचे मुंबईतील वाणिज्यदूत


बहारिन आणि यूएई यांच्यासोबत झालेल्या इस्रायलच्या शांतता करारामुळे मध्यपूर्वेतील महत्त्वाचे देश मानवतेच्या कल्याणाच्या उद्देशाने एकत्र येत आहेत. कोरोनाच्या वैश्विक संकटामुळे परस्परांतील सामायिकता शोधून एकत्र येणे ही काळाची गरज बनली होती. दि अब्राहम अ‍ॅकॉर्ड या नावाने ओळखला जाणारा हा करार नेमके हेच साध्य करतो.
यहुदी, ख्रिस्ती आणि इस्लाम या जगातील तीन महत्त्वाच्या एकेश्वरवादी धर्मांसाठी प्रेषित हेच कुळपुरुष आहेत. ख्रिस्तीबहुल अमेरिकेच्या मध्यस्थीतून यहुदी धर्मीयांचे राष्ट्र असलेल्या इस्रायलचा मुस्लीम धर्मीय यूएई आणि बहारिनसोबत झालेला हा करार आपले नाव सार्थ करतो. यापूर्वी अरब देशांत इजिप्तने १९७८ साली आणि जॉर्डनने १९९४ साली इस्रायलसोबत शांतता करार केले होते.
इस्रायल, अमेरिका आणि यूएईच्या नेत्यांनी या कराराला ऐतिहासिक राजनयिक घटना म्हणून संबोधले असून, यामुळे मध्य-पूर्वेत शांतता प्रस्थापित होईल, नवीन मार्ग चोखाळले जातील आणि या भूप्रदेशात असलेली विकासाची प्रचंड क्षमता बंधनमुक्त होईल, असे म्हटले आहे.
इस्रायल आणि यूएईच्या आरोग्यमंत्र्यांनी कोरोना आणि अन्य क्षेत्रात सहकार्य करण्याचे घोषित केले असून, त्यात व्यापारी शिष्टमंडळांच्या भेटी आणि विद्यार्थ्यांच्या देवाणघेवाणीचा समावेश आहे.


इस्रायल आणि यूएईने राजनयिक संबंध प्रस्थापित करण्याचा निर्णय घेतल्यानंतर लगेचच एका अमिराती गुंतवणूक संस्थेने इस्रायली तंत्रज्ञान कंपनीशी जलदगतीने आणि अचूकतेने कोविड चाचणी करणाऱ्या यंत्रासाठी करार करून व्यापारी संबंधांचा प्रारंभ केला.
उभय देशांनी वैद्यकीय संशोधन आणि फार्मास्युटिकल्स क्षेत्रात एकत्रित काम करण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यात कोविड १९वरील उपचार आणि लसीच्या चाचण्यांचा समावेश आहे. त्याच गुंतवणूक संस्थेने इस्रायलमधील एका आघाडीच्या हॉस्पिटलशी सामंजस्य करार केला आहे. त्यानुसार यूएईमधून उपचारांसाठी बाहेर जाणाऱ्यांसाठी इस्रायल हे महत्त्वाचे केंद्र असणार आहे. दोन्ही देशांना कोरोनाचा मोठा फटका बसल्यामुळे द्विपक्षीय सहकार्यात वैद्यकीय क्षेत्राला महत्त्वाचे स्थान असणे प्रासंगिक महत्त्वाचेही आहेच.
इस्रायल आणि यूएई ही दोन्ही तरुण राष्ट्रं आहेत.
दोघांनीही अवघ्या काही दशकांमध्ये चैतन्यमय आणि जलदगतीने विकसित होणाºया अर्थव्यवस्था म्हणून नावलौकिक मिळवला आहे.
दोन्ही देश सृजनशीलता आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आघाडीवर असून, दोघांकडेही उद्यमशीलतेची कमतरता नाही.
त्यामुळे व्यापार आणि व्यावसायिक क्षेत्रातील वाढत्या संबंधांचा दोघांनाही फायदा होणार आहे.
इस्रायलच्या वाणिज्य मंत्रालयाच्या अंदाजानुसार वार्षिक व्यापार आणि गुंतवणुकीचा आकडा कोट्यवधी डॉलर्सच्या घरात जाऊ शकेल.
व्यापार आणि गुंतवणुकीतील वृद्धीचा सायबर सुरक्षा, ऊर्जा, आरोग्य, वित्त, दूरसंचार आणि कृषीसारख्या क्षेत्रांना विशेष फायदा होऊ शकतो.
बहारिन आणि यूएई यांनी इस्रायलशी राजनैतिक संबंध प्रस्थापित करण्याच्या निर्णयामुळे वर उल्लेखलेले उपक्रम आणि सहकार्य हे केवळ समुद्रातील एक थेंब असावा, एवढ्या विपुल संधी निर्माण होणार आहेत.
या करारांमुळे तिन्ही देशांच्या नागरिकांची आयुष्यं अधिक समृद्ध होणार आहेत.


त्यामुळे या भागातील इतर देशही इस्रायलशी शांतता करार करून त्याच्यासोबत असलेल्या प्रचंड संधी साधण्यासाठी उद्युक्त होतील.
मध्यपूर्वेत अमेरिका मध्यस्तंभाची भूमिका बजावत असून, या करारातील सर्व देशांचा सच्चा सहकारी आहे. हा करार घडवून आणण्यात अमेरिकेने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.
आजच्या घडीला आपण ज्या आव्हानांचा सामना करतो आहोत, ती देशांच्या सीमांना ओळखत नाहीत. आपल्या सर्व नागरिकांच्या भल्यासाठी सर्व देशांना मिळून आपापल्या क्षमतांची बेरीज करावी लागेल. या ऐतिहासिक घटनेचे साक्षीदार असलेल्या सर्वांना आम्ही आवाहन करतो की, त्यांनी या कराराला पाठिंबा देऊन इतरांनाही असे करण्यास उद्युक्त करावे.

Web Title: The beginning of a new 'peace' in the Middle East

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.