कोयना धरणाच्या उभारणीचा साक्षीदार पडद्याआड !

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2020 03:17 AM2020-08-17T03:17:50+5:302020-08-17T06:53:37+5:30

रणाच्या जलाशयातून बोगद्याद्वारे रत्नागिरी जिल्ह्यात वळविण्यात आले. तेथे वीज निर्मितीगृह उभारले होते. तांत्रिकदृष्ट्या तो एक चमत्कारच आहे.

Behind the scenes witness of the construction of Koyna Dam! | कोयना धरणाच्या उभारणीचा साक्षीदार पडद्याआड !

कोयना धरणाच्या उभारणीचा साक्षीदार पडद्याआड !

googlenewsNext

-वसंत भोसले
सुती पँट आणि शर्ट घालणारे, स्कूटरवरून फिरणारे आणि अखेरच्या श्वासापर्यंत स्वत:चे कपडे स्वत: धुणारे वि. रा. जोगळेकर महाराष्ट्राची वरदायिनी कोयना नदीवरील धरणाच्या उभारणीचे साक्षीदार होते, हे आताच्या पिढीला सांगितले, तर पटणारही नाही. सांगलीच्या वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयातून पदवी घेऊन महाराष्ट्र शासनाच्या पाटबंधारे विभागात ते नोकरीला लागले. महाराष्ट्र निर्मितीचा तो काळ होता. कोयना धरण उभारणाऱ्या अभियंत्यांच्या संघात त्यांची नियुक्ती झाली. परदेशात जाऊन प्रशिक्षणही घेऊन आले. सलग तेरा वर्षे या धरणाच्या उभारणीतील ते भागीदार होते.
कोयना धरणाची उभारणी प्रामुख्याने वीजनिर्मितीसाठी करण्यात आली आहे. महाबळेश्वर ते हेळवाकपर्यंत कोयना नदी उत्तर-दक्षिण वाहते, हेळवाक-पासून पूर्ववाहिनी होते. आताचे कोयनानगर गाव आहे तेथे धरणाचा पाया काढण्याची सुरुवात करण्यापासून ते पूर्ण करेपर्यंत वि. रा. जोगळेकर यांनी कष्ट उपसले आहेत. त्यांच्या शब्दांत सांगायचे, तर ती नोकरी नव्हती, राष्ट्र उभारणीचे कार्य चालू होते. सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये पडणारे मान्सूनचे प्रचंड पाणी अडवून पश्चिमेला वळविण्यात आले होते. धरणाच्या जलाशयातून बोगद्याद्वारे रत्नागिरी जिल्ह्यात वळविण्यात आले. तेथे वीज निर्मितीगृह उभारले होते. तांत्रिकदृष्ट्या तो एक चमत्कारच आहे.
धरण पूर्ण झाले आणि जोगळेकरांच्या मनात कालवाकालव सुरू झाली. सह्याद्री पर्वतरांगांत पडणारे निसर्गाचे पाणी नैसर्गिकरीत्या पूर्वेला विजयवाड्यापर्यंत वाहत जाते. ते अडवून पश्चिमेस विजेच्या आशेने सोडणे, हे निसर्गाच्या विरोधी काम झाले. ऊर्जाच हवी होती, तर पूर्वेला वाहणाºया पाण्याच्या आधारे आणि शेतकऱ्यांच्या मदतीने गावोगावी शाश्वत ऊर्जा निर्माण करता आली असती. आपण एका मोठ्या राष्ट्रीय कार्याच्या उभारणीत खारीचा वाटा उचलला असला, तरी तो चुकीचा मार्ग होता, या निकषापर्यंत आले आणि तेराव्या वर्षीच त्यांनी नोकरी सोडली. अन्यथा ते महाराष्ट्र शासनाच्या पाटबंधारे खात्याच्या सचिवपदापर्यंत गेले असते. या तेरा वर्षांत काम करत असतानाच १0-११ डिसेंबर १९६७ च्या पहाटे कोयना धरण परिसरात मोठा भूकंप झाला. तेव्हा वि. रा. जोगळेकर पोफळी येथे वीजगृहाजवळच्या शासकीय निवासस्थानी राहत होते. पहाटे जीप घेऊन भूकंपाने उद्ध्वस्त झालेल्या कोयनानगर वसाहतीत पोहोचणारे ते पहिले अधिकारी होते. ‘शाश्वत ऊर्जेच्या शोधात’ या आत्मचरित्रात त्यांनी याचे सविस्तर वर्णन केले आहे. त्या भूकंपाची तीव्रता, झालेला विध्वंस आणि धरणाच्या सुरक्षिततेच्या काळजीने त्यांच्या मनाचा थरकाप झाला होता. तेव्हाच त्यांनी नोकरी सोडली आणि ऊर्जा निर्मितीचे हे मार्ग सोडून दिले पाहिजेत म्हणून शाश्वत ऊर्जेच्या शोधात या गांधीवादी विचाराच्या माणसाने कोयनानगर सोडले.


जोगळेकर हे सांगली जिल्ह्यातील तासगावचे सधन कु टुंब, सांगलीत आले आणि वसंतदादा पाटील, वि. स. पागे, धुळाप्पाण्णा नवले, चारूभाई शहा या काँग्रेसी नेत्यांच्या तसेच उद्योजक रघुनाथराव ऊर्फ मामा भिडे यांच्या मदतीने सहकार तत्त्वावर ‘शिवसदन’ ही संस्था स्थापन केली. शेणाचा वापर करून शेतकºयांनी आपल्या घराच्या किंवा गोठ्याच्या बाजूला गोबरगॅस उभारण्याची मोहीम सुरू केली. स्वस्तातील घरे उभारणीचे प्रयोग, पाईप तयार करण्याचा कारखाना, असे अनेक प्रयोग त्यांनी सांगलीच्या औद्योगिक वसाहतीत सुरू केले. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण आणि उत्तर कर्नाटकात लाखो गोबरगॅस प्लँट उभारले. शेतकºयांनी केवळ जागा दाखवायची, शिवसदनचे कर्मचारी संपूर्ण उभारणी करून देत होते. त्या संस्थेचे कार्यकारी संचालक म्हणून त्यांनी चाळीस वर्षे काम केले. हा प्रयोग यशस्वी झाला.
निवृत्तीनंतर वि. रा. तासगावला शेतावर राहायला गेले. वाचन अफाट, इंग्रजी आणि मराठी भाषेवर प्रभुत्व होते. त्यांनी आत्मचरित्र लिहिले. त्यात ऊर्जा आणि माणूस यांचे नाते निसर्गाच्या संवर्धनाबरोबर कसे हवे, याचे चिंतनच मांडले आहे. लुईस फिशर या लेखकाचे १९५३ मध्ये प्रसिद्ध झालेले आणि जगभर गाजलेले गांधीजींचे चरित्र मराठीत भाषांतरित केले. दोन वर्षांपूर्वीच साधना प्रकाशनाने ते प्रसिद्ध केले. त्यांनी ‘ज्ञानेश्वरी’चे इंग्रजीत भाषांतर करण्याचा उपक्रम हाती घेतला होता. तो अपूर्णच राहिला. रामायण, महाभारतही इंग्रजी करायचे होते. सध्या ते वयाच्या ८८ व्या वर्षी, कोल्हापूरचे प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ प्राचार्य डॉ. बाळकृष्ण यांनी १९३२ मध्ये लिहिलेल्या पाच खंडात्मक ‘शिवाजी द ग्रेट’ चरित्राचे भाषांतर करीत होते.

वेगळ्या शोधवाटेवरून चालत राहणारा हा गृहस्थ पद, पुरस्कार, गौरव, आदींपासून कायम दूर राहिला. त्यांचे कोयनेच्या उभारणीतील काम आणि त्यांनी लिहून ठेवलेल्या स्मृती महाराष्ट्राच्या उभारणीतील नोंदीच आहेत. ‘शिवसदन’ या संस्थेच्या माध्यमातून केलेले कार्यही प्रचंड होते. एका साध्या स्कूटीवरून ते शिवसदनकडे जाताना, हा माणूस साधाच असावा असे वाटायचे; पण त्यांनी केलेले चिंतन, उभारलेले काम, कोयनेच्या भूकंपग्रस्तांच्या पुनर्वसनातील त्यांचा सहभाग, सर्व अचंबित करणारे आहे. त्यांच्या घराण्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पार्श्वभूमी असली, तरी ते गांधीवादी होते. अशा विचारानेच त्यांनी उत्तरायुष्य व्यतीत करण्यासाठी स्वत:च्या शिवाराची निवड केली. त्यावर निवारा उभारला आणि तेथेच अखेरपर्यंत राहिले. महाराष्ट्राचे डॉ. विश्वेश्वरय्या वि. रा. जोगळेकर यांच्यारूपाने आपल्यातून निघून गेले. महाराष्ट्राने त्यांची नोंद घेतली नाही, हे मात्र खेदाने नमूद करावेसे वाटते.
( संपादक, लोकमत कोल्हापूर)

Web Title: Behind the scenes witness of the construction of Koyna Dam!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.