मनाचिये गुंथी - आकाश आनंदाचे

By admin | Published: January 12, 2017 12:20 AM2017-01-12T00:20:21+5:302017-01-12T00:20:21+5:30

आकाश हे निर्मळ, अभेद्य, अलिप्त आणि सर्व पदार्थांशी समान भाव धरणारे आहे. ते विषमान असून सम, संगात असून असंग आणि भेद करू गेलात तरी अभेदत्वात संपत नाही.

Believe in the Ganti - the sky is blissful | मनाचिये गुंथी - आकाश आनंदाचे

मनाचिये गुंथी - आकाश आनंदाचे

Next

आकाश हे निर्मळ, अभेद्य, अलिप्त आणि सर्व पदार्थांशी समान भाव धरणारे आहे. ते विषमान असून सम, संगात असून असंग आणि भेद करू गेलात तरी अभेदत्वात संपत नाही.
वैर आणि निर्वैैर हे आकाशाला ठाऊक नसते. म्हणून आकाशाला गुरुत्व बहाल केले आहे. भारतीय संस्कृती अशीच उत्तुंग आहे. ती माणसाला आकाशासारखे निर्मळ, सर्वसमावेशक, आणि व्यापकत्व देते. या व्यापक जनविश्वात आपण किती लहान आहोत याची जाणीव व्हावी आणि त्या जाणीवेतून जीवनाचा आनंद घेण्याची आणि देण्याची वृत्ती वाढीस लागावी म्हणून तर मानवी जीवनाला रमविणाऱ्या, रंगविणाऱ्या कला आल्या.
साहित्य आले. संस्कृती आली, लोकसंस्कृती आली. स्वत:च्या जीवनात दु:खाचे, वेदनेचे आणि प्रतिकूलतेचे अनेक ढग येतात, पण त्या साऱ्यांना परतवून आनंदाचा पाऊस पाडणारे आकाश प्रत्येकाला लाभले आहे.
जगताना प्रत्येकाला स्वत:चे आकाश हवे. त्या आकाशातून धरणीवर पडणाऱ्या सुखदु:खाच्या जलधारा हव्यात. काळ्या ढगांप्रमाणे दाटून यावे आणि ढगातलं सारं पाणी देऊन म्हणजे सर्वस्व देवून पुन्हा मोकळे व्हावे, हे मोकळेपण आनंदाच्या आकाशातच गवसते.
इथेच जीवनाच्या आणि मानवी मनाच्या सप्त रंगाचे इंद्रधनुष्यही पहायला मिळते.
मरगळलेल्या जड मनाला पुन्हा साजिवंत करणारा स्फूर्तीचा वारा याच आकाशात घोंघावतो आणि मनसोक्तपणे विहार करणाऱ्या पक्ष्यांप्रमाणे मनही भरारी घेतंं. ही भरारी आनंदाची आहे. मुक्ततेची आहे. प्रसन्नतेची आहे, अनासक्ततेची आहे. जाणीवेची आहे.
आकाश हेच एक संस्कृती आहे. हेच आकाश जेव्हा मानवी जीवनात स्वाभाविकपणे अवतरते तेव्हाच एक संस्कृती जन्म घेते. ती संस्कृती मानवी जीवनाला सुखावते, आनंदित करते, जगण्याची मूल्य देते, कला, अध्यात्म आणि मानवी सौंदर्याची अनुभूती देते. खरे तर जगण्यातली स्वाभाविकता म्हणजे संस्कृती.
ती जेव्हा लोकजीवनाशी एकरुप होते, लोकजीवनाशी नात्याने बांधली जाते. तेव्हा तीच लोकसंस्कृती होते. खेळ, सण, उत्सव, वारी, पालखी, दिंडी, लोककला, कीर्तन, नृत्य, नाट्य या साऱ्यातून लोकसंस्कृतीच्या वेली विस्तारल्या आनंदाने बहरल्या.
सुखाचा फुलोरा देत फुलल्या, त्यात लोकभूमिका आल्या, लोककला आल्या, लोकवाणी आली, लोकाचार आले आणि लोकजीवनातील एक आनंदाचे आभाळ लोकसंस्कृतीने उभे केले. 

डॉ. रामचंद्र देखणे

Web Title: Believe in the Ganti - the sky is blissful

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.