मनाचिये गुंथी - वाळूचे घर

By admin | Published: December 26, 2016 12:29 AM2016-12-26T00:29:34+5:302016-12-26T00:29:34+5:30

लोक ह्या दिवसात चला पुढल्या वर्षी भेटू म्हणत राहतात. नव्या वर्षाचे संकल्प करतात, जे मोडण्यासाठीच असतात.

Believe in the greedy - house of the sand | मनाचिये गुंथी - वाळूचे घर

मनाचिये गुंथी - वाळूचे घर

Next

आपण सगळेच वाळूच्या घरात राहतो. हळूहळू वाळू ढळत राहते. आपण मोठे होत राहतो वयाने. मग क्षणांची आठवण येत राहते. आठवण ही गोष्ट अशीच की ती तुम्हाला सुखाने जगू देत नाही. म्हणजे दु:खद असेल तर त्रास आणि सुखद असेल तर हुरहूर म्हणजे पुन्हा हळवा त्रासच. पण त्यावरही दैवी उपाय आहेच. विस्मृती... ती आहे म्हणून आपण आहोत. ती नसती तर आठवणींच्या माऱ्यानेच आपण मरून गेलो असतो.
लोक ह्या दिवसात चला पुढल्या वर्षी भेटू म्हणत राहतात. नव्या वर्षाचे संकल्प करतात, जे मोडण्यासाठीच असतात. काही ठरवू नका हेच ठरवा. बघा १ जानेवारीची सकाळ किती प्रसन्न असेल. काही दिवसांपुरता आपण हिशेब करतो. गतवर्षी काय कमावले, काय गमावले. दोघांचे आकडे बघून खट्टू होतो. क्षणभर एवढं आठवलं की, आपण पैशांचे किती झालो आणि माणसांचे किती झालो तरी पुरे! बाहेरच्यांचे जाऊ द्या आपण घरच्यांचे किती झालो? लहान मुला बाळांवर यथेच्छ प्रेम करा. त्यांच्यावर माया करा. लाड नाही. लाडांनी पोरं नासतात.
तरुणाईला समजून घ्या. समजून म्हणजे पॉकेटमनी, हॉटेलिंग करणे नाही. त्यांना वयात येतानाचे शारीरिक, मानसिक बदल समजावून सांगा. आपल्या वागणुकीतून दुर्दैवाने संस्कारांचे अर्थ बदललेत. ‘लिव्ह इन’ ने मनं दूरच राहिली. आयुष्यातील शृंगार प्रणय ह्यांचे अर्थ सपक यांत्रिक करून टाकले. पहिल्या स्पर्शाची थरथर, आवेगाच्या चुंबनाची चव गेली. ह्याचा परिणाम तरुणांना कोणत्याच गोष्टीची नवलाई राहिली नाही. फार कमी वयात प्रचंड अनुभव घेत पिढी नि:सत्त्व होत चाललीय. त्यांचा जगण्यातला इंटरेस्ट कोमेजून जातोय.
सांताक्लॉज येतो. गुपचूप एक वस्तू देतो. स्वत:मधला सांताक्लॉज शोधा. वस्तू आपल्यातच दडून आहे. प्रसन्न सकाळ अनुभवण्यापासून ते रात्री शांत झोप मिळेपर्यंत प्रत्येक क्षण भेटवस्तू असतो. मातेचा जिव्हाळा मातृभाषेतच व्यक्त करा. आई म्हणा बाबा म्हणा. मॉम डॅडी नको. हे फ्लार्इंग किस देतात तर आई बाबा कुशीत घेऊन कुरवाळतात. आपल्या मिठीचा घेर विस्तारतो. कॅशलेस व्हा, होऊ नका पण कुशीलेस होऊ नका. एक मायेची जागा सातत्याने काळजात ठेवा. मग काळजीलेस होता येईल.
नव्या वर्षाला हस्तांदोलन करताना सगळ्या चिंता, विकार ओंजळीतून गळून जायला हवेत. मोकळा श्वास घेण्यासाठी वेळ आणि जागा ठेवा. तुम्ही म्हणाल वेळच नाही इतकं यांत्रिक झालंय जगणं! कुणी केलं हे यांत्रिक? आपणच ना! जगणं फार मागत नाही, आपला हव्यास मागतं. हव्यास सुटत नाही म्हणूनच वाळूचं घर लौकर रितं होतं. आपला देह हेच वाळूचे घर आहे. माती गळते आहे. एक दिवस घर रिकामं होणार. तेव्हा आनंदाने म्हणता यायला हवं उड जायेगा... हंस अकेला. नववर्षात नवे घर बांधू या... एकमेकांच्या मनात! मग वाळू सरकणार नाही पायाखालची! आणि हृदयाच्या तळघरात होकाराचा तळ स्वच्छ दिसू लागेल.
 - किशोर पाठक

Web Title: Believe in the greedy - house of the sand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.