मनाचिये गुंथी - शांती-विशाल मनोवृत्ती
By admin | Published: February 23, 2017 12:16 AM2017-02-23T00:16:35+5:302017-02-23T00:16:35+5:30
महात्म्यांपासून सामान्य माणसांपर्यंत सर्वजण म्हणत असतात आम्हाला ‘शांती’ हवी आहे. लोकव्यवहारातून अनेक संकटांशी झगडत
महात्म्यांपासून सामान्य माणसांपर्यंत सर्वजण म्हणत असतात आम्हाला ‘शांती’ हवी आहे. लोकव्यवहारातून अनेक संकटांशी झगडत त्यावर मात करीत व्यवहारी जीवन जगणारा माणूसही शेवटी कुठेतरी शांती लाभावी ही अपेक्षा करतो तर अशांतीला कारणीभूत असणारी प्रपंचबंधने आणि प्रलोभने तोडून अनासक्त जीवन जगणाऱ्या वैराग्यालाही शांतीच हवी असते.
प्रापंचिक माणसाची धडपड तर पारमार्थिक माणसाची उपासना ही केवळ त्या शांतीसाठीच आहे. ‘शांती’ ही भगवंताची आवडती विभूती आहे. भगवद्गीतेने शांती या तत्त्वाला सर्वश्रेष्ठ मानवी मूल्य म्हणून गौरविले आहे. भक्ती, ज्ञान, वैराग्य, कर्म, उपासना या साऱ्यांपेक्षाही शांती सर्वश्रेष्ठ आहे. ‘श्रेयो ही ज्ञानम् अभ्यासात’ या गीतेतील बाराव्या श्लोकावर भाष्य करताना ज्ञानेश्वर माउलींनी म्हटले आहे.
‘‘अभ्यासाहूनि गहन।पार्था मग ज्ञान।
ज्ञानापासोनि ध्यान।विशेषिजे।।’’
अभ्यासापेक्षा ज्ञान गहन आहे. ज्ञानापेक्षा ध्यान सर्वश्रेष्ठ आहे. ध्यानापेक्षा कर्मफलत्याग विशेष आहे आणि शेवटी ‘त्यागाहुनि भोगु। शांतिसुखाचा’ कर्मफलत्यागापेक्षाही शांति सर्वश्रेष्ठ आहे. शेवटी ज्ञान आणि ध्यान ज्या गावाला मुक्कामाला जातात, त्या गावाचे नाव ‘शांती’ होय. दैवीगुणसंपत्तीच्या अधिकाधिक जवळ जाणे हे मानवी जीवनाचे प्रयोजन आहे. शांती ही भगवंताच्या अगदी जवळ वावरणारी आणि प्रेमाचा आनंद देणारी अवस्था आहे. ज्ञानेश्वरीच्या सोळाव्या अध्यायात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींनी शांती या गुणसांैदर्याचे लक्षण सांगितले आहे. आत्मदर्शनाने विकास पावलेली विशाल आणि व्यापक मनोवृत्ती म्हणजे शांती होय. मानवी जीवन जगताना काही शारीरिक, मानसिक गरजा आहेत. त्या गरजांची पूर्तता होणे आणि ती करून घेणे हे स्वाभाविक आहे. पण गरजा या जर मर्यादा सोडून हव्यासाकडे झेपावल्या की सुखोपभोगाच्या शांतीचाही लय होतो. माणसाला गरजेपेक्षा खूप पैसा मिळाला, खूप पदे लाभली, खूप भोग भोगले, पाण्यासारखा पैसाही खर्च केला. पैशाच्या मागे आवश्यकता नसतानाही धावत सुटला आणि सारखा पैसा पैसा करत आसक्तीने ग्रासला गेला तर शेवटी त्या आसक्तीच्या मागे लागून जीवनाच्या आनंदाला मुकतो. जगाच्या व्यवहारात बेचैनी आणि अहंकार थैमान घालीत असतात. मी आणि माझे या अहंतेचे आणि ममतेचे दडपण दूर झाल्याशिवाय आनंद मिळणार नाही. शांती ही ममत्व नाहीसे करते आणि समत्व उभे करते. त्यामध्ये व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व हरपून त्याला अत्यानंदाची अनुभूती येते. ही अनुभूती निर्हेतुक आणि नैसर्गिक असते. त्यातूनच सारे अंतरविरोध शमन पावतात आणि शांतीच्या वाटचालीतून समाधानाचा मुक्काम गाठला जातो.
डॉ. रामचंद्र देखणे