दुभंगाचा लाभ पवार आणि फडणवीसांना

By admin | Published: January 27, 2017 11:50 PM2017-01-27T23:50:52+5:302017-01-27T23:50:52+5:30

सत्ता आणि स्वार्थ या बाबी धार्मिक धोरणाहून अधिक बलशाली असतात. भाजपा आणि शिवसेना यांच्यातील एवढ्या वर्षांच्या युतीत झालेला बेबनाव व दुभंग याच कारणाखातर झाला आहे.

The benefit of the double division of Pawar and the Fadnavis | दुभंगाचा लाभ पवार आणि फडणवीसांना

दुभंगाचा लाभ पवार आणि फडणवीसांना

Next

सत्ता आणि स्वार्थ या बाबी धार्मिक धोरणाहून अधिक बलशाली असतात. भाजपा आणि शिवसेना यांच्यातील एवढ्या वर्षांच्या युतीत झालेला बेबनाव व दुभंग याच कारणाखातर झाला आहे. हिंदुत्व हे धोरण (धारणा नव्हे) आणि सत्ता हे ध्येय या बाबी त्या पक्षांबाबत खऱ्या आहेत आणि ते दोन्ही पक्ष साध्याला (म्हणजे सत्तेला) साधनाहून (म्हणजे हिंदुत्वाहून) अधिक महत्त्व देणारे आहेत. गेल्या अनेक वर्षांच्या त्यांच्या मैत्रीत उडत आलेले वादाचे विषय याच एका गोष्टीशी संबंधित आहेत. आज भांडण आणि उद्या मैत्री, सत्तेत सहभाग आणि राजकारणात वैर तर हिंदुत्वाच्या धोरणावर एकमत आणि त्यातल्या स्वत:च्या स्थानाबाबत मतभेद हे त्या दोन पक्षांच्या आजवरच्या वरकरणी एकोप्याचे दिसलेले चित्र साऱ्यांच्या परिचयाचे आहे. सत्ताकांक्षा धर्मश्रद्धेहून बळावली म्हणूनच त्यांचा संसार आता विस्कटला आहे. ‘दिल्ली तुमच्या ताब्यात आहे, महाराष्ट्र तुमच्या स्वाधीन झाला आहे निदान आता मुंबईची महापालिका आणि तिचे अनेक राज्यांहून मोठे असलेले ३७ हजार कोटींचे अंदाजपत्रक तरी आमच्या ताब्यात असू द्या’ हा सेनेचा हट्ट तर ‘दिल्लीएवढी गल्लीही आमचीच’ हा भाजपाचा होरा. दोन्ही पक्षांच्या या ताठर भूमिकांमुळे त्यांच्यातील वाद विकोपाला जाऊन ते दोन तटांत विभागले गेले आहेत. परिणामी मुंबई महापालिकेप्रमाणेच राज्यातील जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांसह सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांत हे दोन पक्ष स्वबळ आजमावण्याच्या तयारीला लागले आहेत. ‘यामुळे राज्याचे राजकारण दुरुस्त होईल’ असे देवेंद्र फडणवीसांचे शिवसेनेला डिवचणे तर ‘यातून तुम्हाला तुमची जागा दिसेल’ असे सेनेच्या प्रवक्त्यांचे त्यांना बजावणे. तशीही भाजपाने सेनेची दीर्घकाळपासून केलेली उपेक्षा तिचे बळ कमी लेखण्याचा व करण्याचा त्या पक्षाचा प्रयत्न यांचेही हे फलित आहे. लोकसभेत १८ जागा जिंकणाऱ्या सेनेला मोदींच्या मंत्रिमंडळात एक किरकोळ मंत्रिपद दिले जाणे आणि महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात ज्या खात्यांना फारसे कुणी मोजत नाही अशी चार खाती दिली जाणे हा भाजपाने सेनेच्या चालविलेल्या याच उपेक्षांचा परिपाक. युतीतील या दुभंगाचा लाभ घ्यायला तिकडे पद्मविभूषण शरद पवार आणि अनेक गटातटांत विभागलेले काँग्रेस नावाचे कॉन्फेडरेशन एकत्र येण्याची शक्यता वाढली आहे. पवारांच्या पक्षात वाद नाही आणि असले तरी ते एकट्याने निकालात काढायला पवार समर्थ आहेत. काँग्रेसमध्ये आखाडे फार आणि त्यातही त्यातले अनेकजण अंगाला माती लावून एकाचवेळी उतरणारे. सत्ता समोर दिसली की हे पहिलवान एकत्र येतात हा आजवरचा अनुभव लक्षात घेतला की संजय निरूपम आणि मुंबईची काँग्रेस यांची आज बदललेली भाषाही आपल्याला कळणारी आहे. पवार आणि काँग्रेस हे आज सत्तेच्या विरोधात असल्याने त्यांना येणाऱ्या निवडणुकीत काही गमावायचे नाही, असलेच तर मिळवायचे आहे. सेनेची स्थिती याउलट म्हणजे गमावण्याची अधिक आहे. भाजपा आणि फडणवीस यांना यात धोका नाही. सेनेने त्यांचा पाठिंबा काढून घेतला तरी तो ऐनवेळी द्यायला पुढे होणारे पवार त्यांच्या स्नेहातले (आणि पद्म म्हणजे कमळातले) आहेत. त्यामुळे काँग्रेसला सत्तेसाठी तर सेनेला सत्तेच्या जवळ राहण्यासाठी आपले बळ एकवटावे लागणार आहे. पैसा आणि साधने साऱ्यांकडेच भरपूर आहेत. फक्त त्यांच्यावरचा मतदारांचा लोभ त्यांना जपायचा व वाढवून घ्यायचा आहे. काँग्रेसमध्ये पुढारी फार. पवारांकडे ते एकटेच साऱ्यांना पुरून उरणारे आहेत. भाजपाजवळ मोदी आणि शहांपासून फडणवीसांपर्यंतचा नेत्यांचा मोठा ताफा आहे. सेनेकडे मात्र एकट्या उद्धव ठाकऱ्यांखेरीज (व झालेच तर त्यांच्या चिरंजीवांखेरीज) दुसरे महत्त्वाचे नेते नाहीत. ते तसे राहणार नाहीत अशी व्यवस्थाही त्यांच्या पक्षात आहे. काही का असेना सेना आणि भाजपा यांच्या एवढ्या वर्षांनंतरच्या घटस्फोटामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाचे चित्र यापुढे बदलणार आहे. उद्याच्या काळात एकीकडे फडणवीस तर दुसरीकडे पवार अधिक बलशाली झालेले दिसले तर त्याचे आश्चर्य करण्याचे कारण नाही. कारण संघटित व राज्यव्यापी असे त्यांच्या पक्षांचे व राजकारणाचे स्वरूप आहे. पवारांचा पक्ष विभागीय दिसला तरी त्यांच्या नावाचे चलन राज्यभर चालणारे आहे. तर फडणवीस यांचे नाव अजून लहान असले तरी त्यांच्या पक्षाने मात्र राज्य व्यापले आहे. काँग्रेस सर्वत्र असली तरी एकसंध नाही आणि सेना मुंबई व कोकणवगळता अन्यत्र सांदीकोपऱ्यात आहे. आपल्या बळाविषयी पुढाऱ्यांनी मिजास मिरविणे वेगळे आणि त्यांच्यामागे अनुयायी व मतदार संघटित असणे वेगळे. या दोन्ही गोष्टी एकत्र येतात तेव्हा पक्ष वाढतात आणि नेतृत्व मोठे होते. शिवसेना आणि काँग्रेस या पक्षांच्या नेत्यांवर व कार्यकर्त्यांवर आताच्या भाजपा-सेना दुभंगामुळे येऊ घातलेली ही जबाबदारी मोठी आहे. ती पेलण्याच्या तयारीला लागणारा उत्साह अद्याप तरी त्यांच्यात दिसत नाही. काँग्रेसला एकसंध व्हायचे आहे, शिवसेनेला दंडबैठका मारायच्या आहेत आणि पवारांना फक्त उभे रहायचे आहे.

Web Title: The benefit of the double division of Pawar and the Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.