लहान व स्वतंत्र्य घटक असण्याचे फायदे
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2019 04:41 AM2019-07-05T04:41:04+5:302019-07-05T04:43:18+5:30
आपल्या शेजारी राष्ट्र असलेल्या बांगलादेशचे उदाहरण घेऊ. हा भाग जेव्हा पाकिस्तानचा एक भाग होता तेव्हा तो क्रिकेट खेळात कुठेच नव्हता.
- संतोष देसाई
(व्यवस्थापकीय संचालक, फ्युचर बॅण्ड्स)
भारत आणि पाकिस्तान अशी दोन वेगळी राष्ट्रे झाली नसती तर संपूर्ण भारतातून कशा त-हेची क्रिकेट चमू तयार करता आली असती, याचा एकेकाळी क्रिकेटप्रेमी विचार करीत असत. भारतीय फलंदाज आणि पाकिस्तानी गोलंदाज यांच्या संयोगाला विद्यमान खेळाडूंचे शहाणपण जोडले गेले असते तर एका अजेय चमूची निर्मिती झाली असती. वरकरणी अशा युक्तिवादात तथ्यही जाणवते. अशी चमू सर्वच क्षेत्रांत समृद्ध झाली असती. वेगवान गोलंदाज, फिरकी गोलंदाजांच्या विविध त-हा आणि फलंदाजांची विश्वासार्हता, अव्वल दर्जाची चमू यातून जगज्जेती चमू निर्माण होऊ शकली असती.
पण असा तर्क करणे वास्तववादी असू शकते का? केवळ राष्ट्राच्या आकारमानातून चांगली चमू तयार होऊ शकते का? त्याच्या उलट स्थितीही राहू शकते. चांगल्या कामगिरीसाठी एकीकरणाची गरज असतेच असे नाही. याउलट लहान राष्ट्रेही त्यांच्यापेक्षा आकाराने मोठ्या असलेल्या राष्ट्रापेक्षा उत्तम कामगिरी बजावू शकतात. भारताची चमू उपखंडातील त्याच्या प्रतिस्पर्ध्यांपेक्षा निश्चितच बलाढ्य आहे, पण त्याच्या आकाराएवढी ती मजबूत आहे का?
आपल्या शेजारी राष्ट्र असलेल्या बांगलादेशचे उदाहरण घेऊ. हा भाग जेव्हा पाकिस्तानचा एक भाग होता तेव्हा तो क्रिकेट खेळात कुठेच नव्हता. त्याची क्रिकेट चमू अस्तित्वात आल्याला २४ वर्षे झाली आहेत. या काळात त्या राष्ट्राने राष्ट्रीय पातळीचा एक तरी क्रिकेटपटू दिला आहे का? राष्ट्रीय क्रिकेट चमूमध्ये त्यांच्या खेळाडूला बारावा गडी म्हणून स्थान मिळाले होते. त्या राष्ट्राचे सांस्कृतिक भावंड असलेल्या पश्चिम बंगालची स्थिती क्रिकेटच्या संदर्भात बांगलादेशपेक्षा चांगली होती. तथापि त्याही राज्याला क्रिकेटची परंपरा नाही किंवा त्याने क्रिकेटच्या हीरोचीही निर्मिती केली नाही.
स्वातंत्र्य मिळाल्यानंतर बांगलादेशमध्ये क्रमाक्रमाने खूप बदल घडून आले. क्रिकेटच्या खेळात त्या राष्ट्राचे अस्तित्व हळूहळू जाणवू लागले आहे. त्याने मधूनच या खेळात चमक दाखवली असली तरी कधी कधी त्याने सामान्य खेळाचेही प्रदर्शन केलेले आहे. पण सध्याच्या वर्ल्ड कप स्पर्धेत त्याने चमक दाखवली. त्या राष्ट्राची चमू सामने जिंकू लागली आहे. त्या चमूची उपेक्षा करणे बड्या बड्या चमूंनाही शक्य झालेले नाही. भारत-बांगलादेश यांच्यात झालेल्या सामन्यात बांगलादेशने भारतीय संघासोबत कशी लढत दिली हे नुकतेच पाहायला मिळाले.
पश्चिम बंगालची क्रिकेट चमू अद्यापही प्रादेशिकतेतून बाहेर पडलेली नाही. त्यांच्या कामगिरीत कुठेही सातत्य आढळून येत नाही. त्या चमूने आतापर्यंत दोनदाच रणजी करंडकावर स्वत:ची मोहर उठवली आहे, तीही पन्नास वर्षांपूर्वी एकदा आणि त्यानंतर तीस वर्षांपूर्वी पुन्हा, एवढीच त्यांची कर्तबगारी. पण बांगलादेशच्या चमूने गेल्या पंधरा वर्षांत चमकदार कामगिरी बजावली आहे. त्यामुळे राष्ट्रीय चमूत त्यांचे अनेक खेळाडू घेतले जाऊ शकतात. पण पश्चिम बंगालने सौरव गांगुलीचा अपवाद वगळता एकही नावाजण्याजोगा खेळाडू क्रिकेटला दिलेला नाही. पश्चिम बंगालच नाही तर अनेक राज्यांमध्ये हीच स्थिती पाहायला मिळते.
काही लहान पण समृद्ध राष्ट्रांनी चांगल्या पायाभूत सोयींमुळे या क्षेत्रात परंपरा निर्माण केल्या आहेत. पण विकसनशील राष्ट्रांच्या लहान चमूंनी जागतिक स्पर्धेत स्वत:चा जो ठसा उमटविला आहे त्याचा खुलासा कसा करणार? श्रीलंकेच्या चमूने क्रिकेटच्या क्षेत्रात चढउतार बघितले आहेत. पण एकेकाळी या राष्ट्रांच्या चमूने एकदिवसीय सामन्यात तसेच टी-२० सामन्यात अव्वल स्थान पटकावले होते आणि कसोटी सामन्यात त्याची चमू दुसऱ्या स्थानावर होती हे विसरून चालणार नाही. त्याच्या चमूने १९९६ साली वर्ल्ड कप स्पर्धा जिंकली होती तर २०१४ साली टी-२० चा वर्ल्ड कप जिंकला होता. जेमतेम दोन कोटी लोकसंख्या असलेल्या या बेटाची ही कामगिरी दुर्लक्षिण्याजोगी नक्कीच नाही. अफगाणिस्तानच्या चमूनेही किती प्रगती केली आहे हे भारताविरुद्धच्या सामन्यात पाहायला मिळाले आहे.
आत्मसन्मानाची भावना प्रबळ झाली की चमत्कार घडू शकतात. आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वत:चा ठसा उमटविण्यासाठी वेगळी साधने नसलेली राष्ट्रे क्रीडा क्षेत्रात - विशेषत: क्रिकेटमध्ये स्वत:चा ठसा उमटवू शकतात. प्रादेशिक चमू असणे आणि राष्ट्रीय चमू असणे यात बराच फरक पाहायला मिळतो. त्यापासून मिळणारे फायदेही मोठे असतात. शिवाय राष्ट्राचा सन्मान राखल्याचा लौकिकही मिळवता येतो. आकाराने लहान असलेल्या राष्ट्रांना बड्या राष्ट्रांना पराभूत केल्याने मिळणारा लौकिकही मोठा असतो. अशा तºहेच्या विजयामुळे कोकरूदेखील स्वत:ला सिंह म्हणून मिरवू लागते!
व्यापक परिक्षेत्रात पाहिले तर आकाराने मोठ्या घटकांना लहान लहान घटकात विभाजित केल्याने त्या घटकांना स्वत:ची वेगळी ओळख मिळते आणि त्यातून त्या घटकाचे आत्मसामर्थ्य बळावते. मग आत्मविकासासाठी वेगळ्या उद्दिष्टांचा शोध घेणे त्या घटकाला सहज शक्य होते. पण असे नेहमीच साध्य होते असेही नसते. कधी कधी लहान असणेही अस्तित्वहीन ठरू शकते. तथापि लहान आणि स्वतंत्र घटक असण्यातही सामर्थ्य दडलेले असते. त्याचे अनेक फायदेही असतात. अशक्यप्राय असलेल्या गोष्टी मिळविण्यासाठी प्रयत्न करणे हे अशा स्थितीत अर्थपूर्ण ठरू शकते!