सावध, 'तो' पुन्हा येईल! काळजीपूर्वक पुढचे पाऊल टाकायला हवे

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2022 05:59 AM2022-02-18T05:59:13+5:302022-02-18T06:00:43+5:30

जागतिक राजकारणावरही या विषाणूने आपला प्रभाव दाखवला. कोरोनाकाळात दाखवलेल्या प्रशासकीय बेफिकरीमुळे दोन राष्ट्रप्रमुखांना पायउतार व्हावे लागले.

Beware, Coronavirus will come again! The next step should be taken carefully | सावध, 'तो' पुन्हा येईल! काळजीपूर्वक पुढचे पाऊल टाकायला हवे

सावध, 'तो' पुन्हा येईल! काळजीपूर्वक पुढचे पाऊल टाकायला हवे

Next

गेली सुमारे तीन वर्ष संपूर्ण जगाला वेठीस धरणाऱ्या, लाखो मानवी जीवांचे बळी घेणाऱ्या आणि ज्याने असंख्य लोकांची रोजीरोटी हिरावून घेतली त्या कोरोना नामक विषाणूचा प्रभाव ओसरत असल्याची दिलासादायक वार्ता आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेकडून यावर अधिकृत शिक्कामोर्तब होणे बाकी असले, तरी कोरोनाने आता आवराआवर सुरु केल्याचे रुग्णसंख्येच्या ताज्या आकडेवारीतून दिसून येते. युरोपातील अनेक देशांनी व्यवसाय, वाहतूक आणि पर्यटनावरील बहुतांश निर्बंध शिथिल केले आहेत. अमेरिकेने आंतरराष्ट्रीय प्रवासावरील बंधने सैल केली आहेत. आपल्याकडेही तशी सुरुवात होऊ घातली आहे. कोरोनाच्या साथीची तीव्रता आता कमी झाल्याने कोरोना प्रतिबंधासाठी लागू केलेल्या अतिरिक्त निर्बंधांत बदल करा अथवा ते हटवा, अशी सूचना केंद्र सरकारने राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांना केली आहे.

ओमायक्रॉन विषाणूमुळे कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली होती. मात्र, हा ‘व्हेरिएंट’ पूर्वीच्या ‘डेल्टा’पेक्षा कमी घातक असल्यामुळे दुसऱ्या लाटेइतका हाहाकार माजला नाही. शिवाय, लसीकरणही मोठ्या प्रमाणात झाल्याने ओमायक्रॉनमुळे होऊ शकणारी मोठी प्राणहानी टळली.  १७ नोव्हेंबर २०१९ रोजी चीनच्या हुबेई प्रांतात कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण आढळला आणि त्यानंतर या विषाणूने संपूर्ण मानवी जीवनच बदलून टाकले. कोरोना रुग्णांच्या मृत्यूची आकडेवारी पाहिली तर ती दोन्ही महायुद्धात झालेल्या मनुष्यहानीहून कितीतरी पट अधिक असल्याचे दिसून येईल. मानवी संहाराला केवळ हायड्रोजन अथवा अणुबॉम्बची गरज नसून, एखादा विषाणू पुरेसा असल्याचे कोरोनाने दाखवून दिले. या विषाणूमुळे केवळ प्राणहानीच झाली असे नव्हे, तर मानवी आकांक्षा आणि बुद्धीसामर्थ्यालाच एकप्रकारे आव्हान दिले. परग्रहावर अधिवास करण्याची आकांक्षा बाळगून असलेल्या आणि त्यादृष्टीने सारी सज्जता करत असलेल्या मानवाला जमिनीवर आणि तेही एकमेकांपासून चार हात लांब राहण्याचा, मुखपट्टीने नाक-तोंड बंद ठेवण्याचा धडा कोरोना विषाणूने शिकवला.

India reports highest single-day death toll of 6,148, new cases remains below 1 lakh for third consecutive day

जागतिक राजकारणावरही या विषाणूने आपला प्रभाव दाखवला. कोरोनाकाळात दाखवलेल्या प्रशासकीय बेफिकरीमुळे दोन राष्ट्रप्रमुखांना पायउतार व्हावे लागले. आपल्याकडे तर आरंभापासून हा विषय राजकारणाच्या केंद्रस्थानी राहिला. आजही तो आहेच. कोणामुळे कोरोना पसरला, कोणत्या राज्यात किती मृत्यू झाले, यावर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. सामाजिक बांधिलकीच्या नात्यातून ज्यांनी गरजवंतांना मदतीचा हात दिला, त्यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जात आहे.! कोरोना आगमनाची गांभीर्यपूर्वक दखल न घेतल्याने दुसऱ्या लाटेत या विषाणूने आपला इंगा दाखवला. मृत्यूचा आकडा कोटींवर नेऊन ठेवला. आपल्याकडची आरोग्य यंत्रणा किती सक्षम आणि सुसज्ज असायला हवी, याची पहिल्यांदा जाणीव झाली. देश मग ते विकसित असो की अविकसित. जगभर हेच चित्र पाहायला मिळाले.

पृथ्वीवर सूर्य कधी मावळत नाही म्हणतात. पण, या अदृश्य अशा विषाणूने वैश्विक जनजीवन ठप्प करुन दाखवले. आजवर अनेक जीवघेणे विषाणू आले आणि गेले. मात्र, कोरोनामुळे उडालेला हाहाकार न भुतो... असाच होता. मानवी विजीगिषूवृत्तीने लसीच्या माध्यमातून या विषाणूला अटकाव केला असला तरी अजून सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. नव्या रुपात तो पुन्हा येऊ शकतो. ब्रिटनमध्ये नुकताच ‘डेल्टाक्रॉन’ नावाचा विषाणू आढळला आहे. ओमायक्रॉन आणि डेल्टाच्या संक्रमणातून हा नवा विषाणू तयार झाल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.  निर्बंध शिथिल करुन गावगाडा पुन्हा रुळावर आणत असताना दक्षता बाळगण्याची गरज आहे. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सूचनेत तशी पूर्वकल्पना दिल्याचे दिसते. रुग्णसंख्या ओसरत असली तरी कोरोना चाचण्या करत राहणे, रुग्णांचा शोध घेणे, उपचार करणे, लसीकरण वाढविणे आणि प्रतिबंधक नियम पाळणे या पंचसुत्रीचे सर्वांनी पालन करावे, असे केंद्रीय आरोग्य खात्याने सांगितलेे आहे.

COVID-19: With 18,166 new coronavirus infections, India sees lowest one-day rise in 214 days | India News | Zee News
COVID-19: With 18,166 new coronavirus infections, India sees lowest one-day rise in 214 days | India News | Zee News

कोरोनामुळे झालेल्या मनुष्यहानीची भरपाई होणे शक्य नाही. परंतु, जनजीवन पूर्वपदावर आणत असताना ज्यांचा रोजगार बुडाला, त्यांच्या हाताला काम उपलब्ध करुन देणे, आरोग्य यंत्रणेतील त्रुटी दूर करुन ती अधिक सक्षम बनविणे, आरोग्यविषयक संशोधनाला चालना देणे, याकडेही सरकारने लक्ष देण्याची गरज आहे. कारण, जुना गेला तरी नवा येणारच नाही, याची खात्री देता येणार नाही. तेव्हा सावधपणेच पुढचे पाऊल टाकायला हवे. 

Web Title: Beware, Coronavirus will come again! The next step should be taken carefully

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.