ठग ‘सिक्रेट’पासून सावध राहा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2018 03:57 AM2018-06-17T03:57:30+5:302018-06-17T03:57:30+5:30

मानवी जीवनात विचार करण्याच्या सामर्थ्याला, विचार करण्याला प्रचंड महत्त्व आहे. या विचार प्रक्रियेतून त्याचं व्यक्तिमत्त्व घडू शकतं.

 Beware of "secret"! | ठग ‘सिक्रेट’पासून सावध राहा!

ठग ‘सिक्रेट’पासून सावध राहा!

Next

- श्याम मानव
मानवी जीवनात विचार करण्याच्या सामर्थ्याला, विचार करण्याला प्रचंड महत्त्व आहे. या विचार प्रक्रियेतून त्याचं व्यक्तिमत्त्व घडू शकतं. त्याचप्रमाणे त्याचं व्यक्तिमत्त्व जसं घडेल तसाच तो विचार करत असतो. ही दोन्ही विरोधाभासी वाटणारी वाक्ये सत्य आहेत. ‘अरे यार पॉझिटिव्ह विचार कर! काय निगेटिव्ह विचार करतोस?’ असली वाक्ये आजच्या पिढीच्या तोंडून सहजतेने निघत असतात. विधायक विचार करणं नितांत गरजेचं आहे. विधायक विचार केल्यामुळंच विधायक कृती घडू शकतात, फायदे मिळू शकतात, याविषयीची जागरूकता वाढली आहे. ही चांगलीच गोष्ट आहे. पण प्रत्येकच चांगल्या गोष्टीचा उपयोग इतरांना लुबाडण्यासाठी करणारी एखादी ठग यंत्रणा निर्माण होते, तशी ती याही क्षेत्रात निर्माण झाली आहे.
माणूस सतत विचार करत असतो. एकाग्र मनानं करत असलेली मोजकी कामं वगळता इतर वेळी नित्याची, सवयीची कामं करत असतानाही त्याचं विचारचक्र सुरूच असतं. या नित्य विचार करण्याच्या प्रक्रियेतून त्याचं मार्इंड सातत्यानं प्रोग्राम होत असतं. जर सवयीनं माणूस सतत नकारात्मक विचार करत असेल तर... सतत त्याचा मेंदू नकारात्मक होतो. त्यातून नकारात्मक कृती घडून येतात. उदा. ‘मला हे जमतच नाही, जमणारच नाही.’ असा जर तो सतत विचार करत राहिला तर ती विशिष्ट गोष्ट, कृती त्याला जमणारच नाही. ‘मला जमेल, नक्की जमेल. मी नक्की यशस्वीपणे करेन,’ असं जर तो स्वत:ला वारंवार सांगत असेल आणि ती कृती करण्याचा प्रयत्न करताना त्यासाठी आवश्यक ती मेहनत घेत असेल, तर कदाचित वेळ लागेल; पण कालांतराने त्याला यश प्राप्त होईल.
विधायक विचार खूप महत्त्वाचे आहेत. ते आपलं व्यक्तिमत्त्व घडवू शकतात. क्षमता वाढवू शकतात. पण या साऱ्यांना मानवी मर्यादा आहेत. व्यवहारिक मर्यादा आहेत. त्या आपण नीट समजून घेतल्या पाहिजेत. तरच या विचार रोपण विज्ञानाचा योग्य उपयोग करून घेता येतो. आपणास दोन पावलं चालता येत असतील तर वेग वाढवण्यासाठी, सहजतेनं सुलभतेनं चार पावलं टाकण्यासाठी या विचार रोपणाचा उपयोग होऊ शकतो. तो होतो. आजवर लाखोंबाबत असं घडत आलं आहे. म्हणूनच आज या विज्ञानाला महत्त्व प्राप्त झालं आहे.
पण, सिक्रेट नावाचं फॅड. या क्षेत्रातील सगळ्यात मोठा हा ठग प्रकार. मनापासून इच्छा केली, प्रबळ इच्छा केली. जी गोष्ट हवी आहे, तीवर मन एकाग्र केलं तर ती गोष्ट प्राप्त होते. ‘‘सारी कायनात आपली इच्छा पुरी करने के लिये जूट जाती है, और इच्छा पुरी करती है’’ या पद्धतीची वाक्ये आजकाल जाहिरातींमधून, सिनेमांमधूनही कानावर पडतात. आणि आधीच तर्कशुद्ध विचार करण्याची सवय नसलेला तरुण मोठ्या प्रमाणात याला बळी पडतो. हे सिक्रेटचं तथाकथित तत्त्वज्ञान.
बरं हे सिक्रेट ठग केवळ बोलत नाहीत, तशा कृतीही करायला लावतात. भरमसाठ फी आकारून कार्यशाळेत दाखल झालेल्यांना बीएमडब्लू कारचं व आकर्षक बंगल्याचं चित्र देतात. त्यावर रोज मन एकाग्र करा, मेडिटेशन करा म्हणजे तुम्हाला बीएमडब्लू, बंगला प्राप्त होईल असं सांगतात. आणि त्यावर विश्वास ठेवून हजारो तरुण स्वत:ला लुबाडून घेतात. मनापासून इच्छा केली, त्यावर मन एकाग्र केलं तर ती गोष्ट प्राप्त होेते,’ असं यांचं तत्त्वज्ञान. या ‘सिक्रेट’ सिनेमा व व्हिडीओने धुमाकूळ घातला आहे. त्याचं पुस्तकही बाजारात आहे. व्यक्तिमत्त्व विकास कार्यशाळा हे ‘सिक्रेट’ सांगत, विकत असतात. हा प्रकार किती फालतू आहे हे पाहण्यासाठी एक उदाहरण पाहू. भारतीय समाजात कोट्यवधी तरुणांना करिना कपूर वा आलिया भट आवडते. समजा त्यातील २ कोटी तरुणांना करिना हवी आहे. तिचा फोटो समोर ठेवून २ कोटी तरुणांनी रोज मन एकाग्र केलं. तिची प्रबळ इच्छा केली तर... ‘‘सारी कायनात जुटकर करिना के २ करोड टुकडे कर के २ करोड युवकों को बाट देगी?’’ किती हास्यास्पद आहे हा प्रकार! त्यामुळे असल्या ठगांपासून सावध राहा!
आपल्या मेंदूत जो आपण विचार करतो, त्यामुळे कोणतेही ‘विधायक वा नकारात्मक तरंग निर्माण होत नाहीत. असे कोणतेही तरंग वा पॉझिटिव्ह वेव्हज् वा व्हाईब्ज वातावरणात पसरत नाहीत. त्याचा दुसºया-तिसºयावर काहीही परिणाम होत नाही. एखादी व्यक्ती आसपास असताना आपल्याला निगेटिव्ह व्हाईब्ज् जाणवत असतील तर तो त्या व्यक्तीविषयी आपल्या मनात आधीपासून असलेल्या समजुतीचा परिणाम असतो. अथवा आपल्या मेंदूतील राईट हेमिस्पिअरमध्ये समोरच्याची बॉडी लँग्वेज समजून घेण्याची क्षमता असते. त्याचा तो निष्कर्ष असतो. समोरच्याचं आपल्याविषयी वाईट मत असेल तर ते आपणास जाणवू शकतं. इतरांच्या विचारांमुळं वातावरणात विधायक वा नकारात्मक तरंग निर्माण होतात, त्याचा आपल्यावर परिणाम होतो, हेही अवैज्ञानिक आहे, चुकीचं आहे. कितीही मोठ्या ‘मॉ’ने, ‘श्री श्री श्री श्री’ने सांगितले तरी ते धादांत खोटं आहे. आपल्या मनात जो आपण विचार करतो त्याचा निश्चितपणे परिणाम होतो. वारंवार सतत जो विचार करतो तो मनात रुजत असल्यामुळं त्यातून तशा कृती, भावना, वर्तणूक निर्माण होते. विधायक विचार करण्याची सवय मनात रुजवली तर नकळत सवयीनं तसेच विचार मनात निर्माण होतील आणि स्वत:च्या कृती, वर्तणूक, भावना तशा बनत जातील, दिवसेंदिवस आपलं जीवन विधायक बनेल. हे सत्य आपण स्वीकारू या! तसा सतत प्रयत्न करू या!माणसाचं यश-अपयश, सुख-दु:ख त्याच्या मेंदूतूनच निर्माण होत असतं. औषधीशास्त्राचा जनक हिप्पोक्रेटस यानं २४०० वर्षांपूर्वी हे सत्य जगासमोर मांडलं.

ज्या काळात जवळपास सारं जगच नशीब या संकल्पनेवर अवलंबून असायचं, त्या काळात हे वैज्ञानिक सत्य त्यानं मांडलं. माणसाचं भविष्य त्याच्या कर्तृत्वाच्या मनगटात असतं हे ठसवलं. थोडक्यात यश-अपयश, सुख-दु:ख या सर्वांचं मूळ माणूस मेंदूत जो विचार करतो, जसा विचार करतो त्यावर अवलंबून आहे. आज संपूर्ण व्यक्तिमत्त्व विकासाचं क्षेत्र, माणसाचा विकास या विचार करण्याच्या पद्धतीवर अवलंबून आहे, हे जगानं स्वीकारलेलं सत्य आहे.

करिअरमध्ये व जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर त्या पद्धतीचं व्यक्तिमत्त्व असावं लागतं, तसं व्यक्तिमत्त्व घडवावं लागतं. यशाला गवसणी घालणारं अनुकूल व्यक्तिमत्त्व असेल तर माणसाला यशस्वी
होता येतं.

Web Title:  Beware of "secret"!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.