हे कृष्णा, तू पुन्हा का अवतीर्ण होत नाहीस...?
By विजय दर्डा | Published: August 22, 2022 07:40 AM2022-08-22T07:40:01+5:302022-08-22T07:41:34+5:30
विजय दर्डा चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह योगेश्वर श्रीकृष्णाच्या लीलांमध्ये जीवनाची नाना रहस्ये दडलेली आहेत. वर्तमान कालियांच्या मर्दनासाठी श्रीकृष्णानेच ...
विजय दर्डा
चेअरमन, एडिटोरियल बोर्ड,
लोकमत समूह
योगेश्वर श्रीकृष्णाच्या लीलांमध्ये जीवनाची नाना रहस्ये दडलेली आहेत. वर्तमान कालियांच्या मर्दनासाठी श्रीकृष्णानेच पुन्हा अवतार घ्यायला हवा!
रात्रीचे १२ वाजत आले होते. मी जागाच होतो. माझी नजर भगवान श्रीकृष्णाच्या बालरूपावर खिळली होती. मनातले विचार थांबण्याचे नाव घेईनात. कृष्णाची अगणित रूपे, अद्भुत लीला आणि त्याच्या प्रत्येक लीलेमध्ये दडलेल्या जीवन जगण्याच्या कलेचे अगणित अद्भुत संदेश! खरोखरच प्रभू श्रीकृष्णासारखे दुसरे कोणीही नाही. अचानक दशदिशात जयजयकार झाला... ‘हाथी घोडा पालकी, जय कन्हैया लाल की.’
जन्माष्टमीच्या त्या रात्री मी पूर्णपणे भगवान कृष्णातच हरवून गेलो होतो. प्रत्येक मातापित्याला आपल्या मुलात बालकृष्णाचे अवखळ, लोभस रूप दिसते; यातच कृष्णाची दिव्यता सामावलेली आहे. कृष्णाच्या बाळलीलांचे किस्से आठवत राहिले आणि माझ्या कानांमध्ये गीतेची वचने गुंजत राहिली.
महान गणितज्ञ आर्यभट्ट यांच्या मानण्यानुसार भगवान कृष्ण पाचेक हजार वर्षांपूर्वी या भूमीवर १२५ वर्षं जगून गेले. महाभारताच्या युद्धाच्या ३५ वर्षांनंतर त्यांच्या शरीराने या भूमीचा निरोप घेतला. त्या दिवसापासून कलियुगाचा प्रारंभ झाला. भगवान कृष्णाचे शारीरिक अस्तित्व भले सव्वाशे वर्षे राहिले असेल; पण श्रीकृष्ण तर अमर आहे! गीतेमध्ये म्हटले आहे, शरीर नश्वर आहे; परंतु आत्मा अविनाशी, आणि म्हणून श्रीकृष्ण आजही आपल्या जाणिवेत अखंड आहे. आपल्या सुप्त मनातही तो आहे. तो संस्कारांचा महानायक आहे. त्याच्या बालपणात मृत्यूच्या दाढेतून सहीसलामत सुटण्याचा अद्भुत प्रसंग आहे, तशी जीवनात आनंद पसरविणारी अवखळ मस्तीही आहे. तो राजाही आहे आणि गरीब सुदाम्याचा मित्रसुद्धा. समरसतेचे असे उदाहरण क्वचितच पाहायला मिळते. प्रियसखा कृष्ण छेडत असलेली धून प्रेमाची आहे, रागाची आणि अनुरागाचीही ! हे प्रेम राग आणि अनुराग सर्वांसाठी आहे. भगवद्गीतेत कृष्णाने धर्माची व्याख्या केली आहे. माणुसकी म्हणजे काय आणि कर्म का महत्त्वाचे हे सांगितले आहे. कृष्णाचा धर्म सर्वांना सामावून घेणारा आहे. तो कुठल्या जाती, पंथासाठी निर्मिलेला नाही. तो मनुष्यनिर्मित धर्म नाही. या धर्माचा सारांश माणूस आहे.
समन्वय आणि एकतेचे असे उदाहरण दुसरीकडे कोठे क्वचितच मिळेल. कृष्णाचे बालपण अवखळ मस्ती आणि समरसतेने गजबजलेले आहे, तर तारुण्य सामाजिक क्रांतीने भारलेले. तो एकीकडे कालियाचे मर्दन आणि कंसाचा वध करतो, तर न्यायासाठी स्वतःला वाहून घेतो. कृष्ण हा १६,१०८ स्त्रियांचा पती अशी लोकधारणा चालत आली आहे. एक माणूस इतक्या स्त्रियांचा पती कसा असू शकेल? - हे रहस्य पुराणांच्या माध्यमातून समजून घेण्यासारखे आहे. भौमासुर नावाचा एक राक्षस अमरत्व प्राप्त करण्यासाठी १६ हजार मुलींचा बळी देऊ पाहत होता.
श्रीकृष्णाने त्या सर्व मुलींना कारावासातून सोडवले आणि त्यांच्या त्यांच्या घरी पाठवून दिले. त्या मुली जेव्हा घरी पोहोचल्या तेव्हा समाजाने त्यांच्या चारित्र्याबद्दल प्रश्न उपस्थित केले. तेव्हा कृष्णाने त्या प्रत्येकीला आपले नाव दिले. श्रीकृष्ण शोषित आणि कमजोर वर्गाला शक्ती प्रदान करतो हेच या प्रसंगातून दिसून येते. त्या मुलींना आपले नाव देताना त्या कुठल्या जातीच्या, धर्माच्या किंवा कुळाच्या आहेत, त्यांची योग्यता काय आहे हेही त्याने अर्थातच पाहिले नव्हते.
पाच हजार वर्षांपूर्वी द्रौपदीचे रक्षण करून श्रीकृष्णाने महिलांचा आदर करण्याचा केवढा मोठा संदेश दिला आहे. दुर्दैवाने आजही स्त्रियांचे खुलेआम वस्त्रहरण थांबलेले नाही. गायीच्या माध्यमातून कृष्णाने प्राण्यांच्या सेवेबरोबर वनाचे रक्षण करण्याचा संदेशही दिला आहे. म्हणून भगवान कृष्णाला मी सार्वकालिक महान सामाजिक क्रांतिकारी आणि युगपुरुष मानतो.
राजनीती कशी असावी हेही भगवान कृष्णाने सांगितले. राजकारणाच्या हरेक अंगाचे सूक्ष्म ज्ञान या महापुरुषाला होते. भगवान कृष्णाकडे सुख आहे, दुःख आहे, आकर्षण, प्रेम, गुरुत्व... सारे काही आहे. हे व्यक्तित्वच बहुरंगी आहे. आपल्या भक्तांसाठी तो केवळ भगवान नव्हे तर उच्च कोटीचा गुरुही आहे!
भगवद्गीतेमध्ये भगवान कृष्णाने जे सांगितले ते वरवर पाहाता अगदी साधेसुधे; पण सखोल आणि गूढ रहस्यांनी भरलेलेही आहे. भगवद्गीता हा अनमोल आणि अद्भुत खजिना आहे. स्वामी विवेकानंदांपासून महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावे यांनीही गीतेवर टीका लिहिली. महान दार्शनिक भगवान ओशो, वैज्ञानिक अब्दुल कलाम हेही गीतेमुळे प्रभावित झालेले होते. केवळ भारतच नव्हे तर संपूर्ण विश्व गीतेकडे जीवनाचे सूत्र म्हणून पाहते. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने १७८५ मध्ये गीतेचा इंग्रजी अनुवाद प्रकाशित केला. चार्ल्स विल्किन्सने हा अनुवाद केला. त्यानंतर फ्रेंच, जर्मन, डॅनिश, चिनी आदी ५९ हून अधिक भाषांत भगवद्गीतेचा अनुवाद झालेला आहे. भगवान कृष्णाचे वैशिष्ट्य हे की तुम्ही त्याला ज्या भावनेने हाक माराल, त्याच भावनेने तो तुमच्याजवळ येईल. वृंदावनातील गोपींसाठी तो रासलीला करतो, लोणी चोरतो, त्यांची मडकी फोडतो. गोपींचा हा कृष्ण चित्तचोर आहे.
एकीकडे तो आदर्श राजा आणि राजनीतिज्ञ आहे, तर दुसरीकडे सुदर्शन चक्रधारी रूपातला एक कुशल योद्धाही आहे. तो मित्रतेची परिभाषा आहे, तर वृंदावनासाठी प्रेमाचा अवतार. त्याच्या बासरीतून मंजूळ ध्वनी लहरू लागतात, तेव्हा तो एक महान संगीततज्ज्ञही असतोच. भगवान कृष्ण जीवनाचे दर्शन आणि कला यांचे अनन्यसाधारण प्रतीक आहे.
रात्र उलटत चालली होती आणि मी विचार करत होतो की, भगवान कृष्णाच्या नावाने केवळ उत्सव साजरा करून काय होणार? आपण कृष्णाला आपल्या हृदयात स्थापन केले पाहिजे. आपल्याला हे साधले तरच या कलियुगातील अत्याचारी स्वरूपांचा नाश करण्यासाठी आपण सक्षम होऊ. आजच्या परिस्थितीत श्रीकृष्णाची खरोखरच खूप गरज आहे.
माझे डोळे जडावत चालले होते. मनात प्रार्थना उमटत होती, हे श्रीकृष्णा, पुन्हा एकदा या भूमीवर तू अवतीर्ण का होत नाहीस !