भगवानगड घायाळ झाला!
By admin | Published: October 12, 2016 07:15 AM2016-10-12T07:15:43+5:302016-10-12T07:15:43+5:30
कोणतेही श्रद्धेचे ठिकाण श्रद्धेसाठीच ठेवायला हवे. तिथे राजकारणाची घुसखोरी झाली की मग त्याचा भगवानगड होतो. आपल्याच लोकांकडून न दिसणारे
कोणतेही श्रद्धेचे ठिकाण श्रद्धेसाठीच ठेवायला हवे. तिथे राजकारणाची घुसखोरी झाली की मग त्याचा भगवानगड होतो. आपल्याच लोकांकडून न दिसणारे घाव होतात, तेव्हा भक्तांना वेदना होतातच, स्वत: श्रद्धास्थानही घायाळ होते. भगवानगडही सध्या याच वेदनेतून जात आहे.
राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या संत भगवानबाबा यांच्या श्रीक्षेत्र भगवानगडाला दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी राजाश्रय दिल्यानंतर राजकारणातही या गडाचे महत्त्व वाढले. दसऱ्याच्या दिवशी होणाऱ्या मेळाव्यातून गोपीनाथ मुंडे आपली राजकीय दिशा येथूनच जाहीर करायचे. गडावरून आपल्याला दिल्ली दिसते, असे ते म्हणायचे. त्यांच्या अकाली निधनानंतर ते दसरा मेळाव्याला भाषण करायचे ते व्यासपीठच गडाचे महंत नामदेवशास्त्री यांनी पाडून टाकले. यामागेही शास्त्री यांची श्रद्धाच होती. गोपीनाथ मुंडे यांच्या उंचीचा नेता यापुढे होणार नाही, त्यामुळे त्या व्यासपीठावरुन इतर कुठल्या नेत्याने दसरा मेळाव्यात भाषण करु नये, हा त्यांचा व्यासपीठ पाडण्यामागचा विचार होता. पंकजा या गडाच्या कन्या असल्याचे शास्त्री यांनीच जाहीर केले होते. त्यामुळे पंकजा यांनीही भगवानगडावरूनच राजकीय पर्वाला सुरुवात केली. परळीत गोपीनाथगड होईपर्यंत भगवानगड श्रद्धेचेच ठिकाण होते.
वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना परिसरातील १८ एकर जागेवर आंतरराष्ट्रीय दर्जाचा भव्य कमलाकृती आकाराचा ‘गोपीनाथगड’ साकारला गेला. आकर्षक शिल्पकलेचे प्रवेशद्वार, गोपीनाथ मुंडे यांचा २२ फूट उंचीचा पूर्णाकृती पुतळा, प्रशस्त ध्यानमंदिर, समाधीस्थळ, थीम पार्क आणि स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण केंद्र असा हा गोपीनाथगड पंकजा यांनी उभारला, त्याच वेळी भगवानगडावरील श्रद्धेचा पाया कंप पावला. श्रद्धास्थानाने राजकारणाची जागा घेण्यास सुरुवात केली. भगवानगड हे श्रद्धेचे तर गोपीनाथगड हे राजकारणाचे ठिकाण असल्याचे स्वत: पंकजा यांनीच म्हटले होते. पण घडले भलतेच.
आधी याच गडावरुन धनंजय आणि पंकजा या भावा-बहिणीनी एकमेकांवर निशाणा साधला. श्रद्धास्थानाला भक्ताने घायाळ करण्याची ही पहिली वेळ. आपली अवस्था महाभारतातील अभिमन्यूसारखी झाली असून ‘ते’ दुर्योधन असल्याचा उल्लेख पंकजा यांनी या गडावरुन केला. त्याला धनंजय यांनी उत्तर दिले, तेही याच गडावरुन. ‘धार्मिक व्यासपीठावरून काय बोलावे काय बोलू नये, याची शिकवण मला आई-वडिलांनी दिली आहे. या गडाशी माझे मुलाचे नाते नाही तर खऱ्या भक्ताचे आहे’, असा प्रतिटोला त्यांनी लगावला.
या वेदना कमी म्हणून की काय, याच श्रद्धेच्या गडावर दसरा मेळाव्यावरुन राजकारण सुरु झाले. ते एवढे वाढले की, आख्खा गड पोलिसांनी ताब्यात घेतल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली. गडावरच्या दोन्ही मुख्य प्रवेशद्वारांवर पोलिसांचेच नियंत्रण आले. नामदेवशास्त्री यांच्या गडावरील निवासस्थानालाही मोठा बंदोबस्त दिला गेला. त्याच्या ५० फूट अलीकडे लोखंडी कठडे लावून रस्ताच बंद करुन टाकला गेला. गडाच्या तटबंदीचा संपूर्ण ताबाच जणू पोलिसांनी घेऊन टाकला.
श्रद्धेमधून राजकारण आणि राजकारणातून भाऊबंदकी यात जय-पराजय भावाचा होवो की बहिणीचा, खरी पराभूत होणार श्रद्धा आणि पर्यायाने श्रद्धास्थान. त्यातच खरी श्रद्धा असलेल्या प्रत्येक भक्ताचाही पराभव आहे.
आपले श्रद्धास्थान पोलिसांच्या गराड्यात अडकलेले बघून श्रद्धावानांना झालेल्या वेदना कोण समजून घेणार? त्यांच्या दृष्टीने महंत नामदेवशास्त्रीही त्यांचेच आणि पंकजाताईदेखील त्यांचीच. शत्रूने वार केल्याचे फारसे दु:ख होत नसते. पण स्वजनांनी केलेला वार जीवघेणा असतो.
- सुधीर महाजन