भजीपुराण

By admin | Published: July 14, 2017 11:58 PM2017-07-14T23:58:29+5:302017-07-14T23:58:29+5:30

पहिला भजी महोत्सव गाजला तो सुरेशदादा जैन आणि एकनाथराव खडसे यांनी परस्परांना भजी खाऊ घातल्याने

Bhaji Purana | भजीपुराण

भजीपुराण

Next


- मिलिंद कुलकर्णी
पहिला भजी महोत्सव गाजला तो सुरेशदादा जैन आणि एकनाथराव खडसे यांनी परस्परांना भजी खाऊ घातल्याने. खिलाडूवृत्ती आणि मुत्सद्दी असलेल्या या नेत्यांच्या कृतीतून ‘मनोमिलना’चा अर्थ काढणे उतावीळपणाचे ठरेल.
सामान्य माणूस मोठा श्रध्दाळू, पापभिरु आहे. पौराणिक कथा, ऐतिहासिक कादंबऱ्या, चित्रपटांचा त्याच्यावर मोठा पगडा आहे. नायक-खलनायक, सुष्ट-दुष्ट शक्ती, जय पराजय अशी गृहितके तो मांडतो आणि प्रत्यक्षात तसेच घडावे अशी कामना करीत असतो. सुरेशदादा जैन आणि एकनाथराव खडसे या दोन दिग्गज नेत्यांमधील ‘भजीपुराणा’ वरून सध्या असेच कल्पनेचे इमले बांधणे सुरू आहे.
वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम आयोजित करणाऱ्या ‘मराठी प्रतिष्ठान’ या संस्थेने जळगावातील लोकसहभागातून सुशोभीकरणाच्या वाटेवर असलेल्या मेहरुण तलावाच्या चौपाटीवर पावसाळ्यातील भजी महोत्सवाचे आयोजन केले. या महोत्सवात १५ प्रकारची भजी खवैयांसाठी उपलब्ध होती. जळगावात प्रथमच होणाऱ्या या भजी महोत्सवाविषयी कुतूहल असल्याने गर्दी चांगली होती. आयोजकांना राजकीय पार्श्वभूमी असल्याने त्यांनी राजकीय नेत्यांना आमंत्रित केले होते. सुरेशदादा जैन, एकनाथराव खडसे, ईश्वरलाल जैन, आमदार चंद्रकांत सोनवणे, महापौर नितीन लढ्ढा या प्रमुख नेत्यांनीही हजेरी लावली. खिलाडूवृत्ती दाखवत नेते एकमेकांच्या शेजारी बसले. परस्परांची विचारपूस केली. महोत्सव असल्याने उद्घाटन, भाषणे असे सोपस्कार नव्हते. सामान्य नागरिकांसोबत नेत्यांनीही भज्यांचा आस्वाद घेतला. कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव एकमेकांना भजी खाऊ घातली आणि उत्साही मंडळींसाठी ही घटना ब्रेकिंग न्यूज ठरली.
‘मेहरुण तलावाला साक्षी ठेवत, गुरुपौर्णिमेच्या पवित्रदिवशी कट्टर प्रतिस्पर्धी नेत्यांचे मनोमिलन’ अशी खास खबर समाजमाध्यमे, प्रसारमाध्यमांवर झळकली. त्यावर मग चर्वितचर्वण सुरू झाले. आता विचार करा, हे दिग्गज नेते या कार्यक्रमाला एकत्र आले आणि त्यांच्यातील राजकीय मतभेद लक्षात घेता, परस्परांशी बोललेच नसते तरीही ती ‘ब्रेकिंग न्यूज’ ठरली असती. ‘सात वर्षांनंतर आमनेसामने येऊनही नेत्यांनी एकमेकांकडे फिरवली पाठ’ असे शीर्षक देत बातमी रंगविण्यात आली असती. सामान्य माणसाला राजकीय, चित्रपट या क्षेत्रातील मंडळींकडून नेहमी ‘तडका’ छाप कहाण्यांची अपेक्षा असते. तेच या प्रकरणात घडले, यापेक्षा या भेटीला राजकीय महत्त्व आहे, असे वाटत नाही.
सुरेशदादा, नाथाभाऊ आणि ईश्वरलाल जैन हे यापूर्वी अनेकदा एकत्र आले आणि प्रसंगानुरुप विभक्तदेखील झाले. तिन्ही नेते शिवसेना, भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रतिनिधित्व करीत असले तरी त्यांचा सर्वच राजकीय पक्ष आणि नेत्यांशी सौहार्द आहे. काळ गाजविलेल्या या मंडळींनी आपत्ती कोसळल्यानंतर सार्वजनिक जीवनातून अलिप्त राहण्याचे धोरण काही काळ अवलंबले. परंतु कार्यकर्ते आणि जनता त्यांच्यासाठी ऊर्जा असल्याने ते पुन्हा सक्रिय झाले आहेत.
जळगाव महापालिकेवर सुरेशदादा जैन यांच्या नेतृत्वाखालील खान्देश विकास आघाडीचे वर्चस्व आहे. महापालिकेची निवडणूक वर्षावर येऊन ठेपली असल्याने राजकीय वर्तुळात हालचाली सुरू झाल्या आहेत. सुरेशदादा जैन हे शिवसेनेचे नेते असल्याने पुढील निवडणूक सेनेच्या तिकिटावर लढवावी, असा एक मतप्रवाह आहे. ‘शतप्रतिशत भाजपा’साठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि जलसंपदामंत्री गिरीश महाजन हे प्रयत्नशील आहेत. विधान परिषदेच्या निवडणुकीमुळे सुरेशदादा जैन आणि महाजन यांच्यात सख्य वाढल्याने नवीन समीकरण उदयाला येते काय याचीही राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.
गिरीश महाजन हे ईश्वरलाल जैन यांना पितृस्थानी मानतात. बहुमत नसतानादेखील महाजन यांच्या पत्नी जामनेरच्या नगराध्यक्षा होण्यात जैन यांचा गट साहाय्याच्या भूमिकेत होता. या पार्श्वभूमीवर वर्षाखेरीस होणारी जामनेर पालिकेची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढविणार असल्याच्या ईश्वरलाल जैन यांच्या घोषणेने राजकीय कलाटणी मिळाली आहे. भोसरी प्रकरणाची चौकशी करणाऱ्या झोटिंग समितीने सरकारकडे अहवाल सादर केला असून मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेवर खडसे यांच्या मंत्रिमंडळ पुनरागमनाचा निर्णय अवलंबून आहे. ‘भजीपुराणा’मागे ही पार्श्वभूमी आहे, त्यामुळे कल्पनेचे इमले बांधण्यात काहीही हशील नाही.

Web Title: Bhaji Purana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.