‘भाजीपोळीपंचटार्गेट’; ‘होतं तेच बरं होतं’ असं म्हणण्याची वेळ येईल का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2020 12:12 AM2020-05-27T00:12:16+5:302020-05-27T00:12:27+5:30
‘वर्क फ्रॉम होम’ने गांजलेल्या चाकरमान्यांच्या अस्वस्थ कहाण्या
नऊ ते पाच हे रुटीन जगभरातल्या माणसांना किती ‘बोअर’ वाटत होतं. ‘आपल्या आयुष्यात काहीतरी भन्नाट घडावं आणि बदलून जावं आयुष्य, कंटाळा आला या नुसत्या कोरड्या कोरड्या ‘भाजीपोळीपंचटार्गेट’ जगण्याचा!’ अशी एक सर्वदूर भावना होती. ज्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ची सवलत आहे, ज्या लोकांना फ्लेक्झी अवर्समध्ये काम करता येतं, जे फ्री लान्सर आहेत, त्यांचं आयुष्य म्हणजे हेवा वाटावा अशी ‘लक्झरी’ होती बाकीच्यांसाठी.
कोरोनाच्या संसर्गभयाने हे चित्रच पालटून टाकलं.
‘घरी बसून काम करण्याचा’ स्वप्नवत वाटणारा पर्याय अनेक कर्मचाऱ्यांना अचानकच मिळाला. सुरुवातीला सोयच सोय म्हणून सरसकट खुशी होती. कोरोनाच्या हल्ल्याने हैराण झालेल्यांना आपल्या वाट्याला आलेल्या वास्तवाचा मुकाट स्वीकार करण्यावाचून पर्यायही नव्हता.
हळूहळू ‘वर्क फ्रॉम होम’चं पहिलेपण संपलं. मग तक्रारी सुरू झाल्या.
काहींनी अडचणीतून शिताफीने मार्ग शोधले आणि आपण आता ‘वर्क फ्रॉम होम’चे कट्टर पुरस्कर्ते झाल्याचंही जाहीर केलं. पर्यावरणाच्या अभ्यासकांना या पर्यायात ‘संकटातली संधी’ दिसली. पण आता जवळपास दोन महिने उलटून गेल्यावर मात्र जगभरच्या ‘रिमोट वर्किंग’ नोकरदारांमधून नाराजीचे, नकोसेपणाचे स्वरही ऐकू येऊ लागले आहेत.
या ‘न्यू नॉर्मल’ होऊ घातलेल्या व्यवस्थेतल्या अडचणी आणि छुपे प्रश्नही आता समोर येऊ लागले आहेत. चतकोराएवढ्या घरात कोंडून घेऊन, कामाची जागा-वीज-इंटरनेट अशा अडचणींचे डोंगर ओलांडत ओलांडत सहकाऱ्यांच्या संपर्काविना एकाकी, एकेकट्या कामाच्या ताणाने अनेकांना आता सैरभैर करून सोडलं आहे.
जगभरात अभ्यास, सर्वेक्षणं करून निष्कर्ष प्रसिद्ध केले जात आहेत. त्यांपैकी काही अभ्यासकांना असं दिसतं/वाटतं की, मनाविरुद्ध ‘वर्कफ्रॉम होम’ करीत असलेली माणसं आजच रडकुंडीला आलेली आहेत. आपण एखाद्या ‘पिंजºयात’ अडकलो आहोत आणि यातून कधीच सुटका होणार नाही, अशी बहुसंख्यांची भावना होत चालली आहे. मानसिक स्वास्थ्याचे प्रश्न गंभीर होत चालले आहेत. वेगवेगळ्या मदत-वाहिन्यांवर विचारल्या जाणाºया प्रश्नांमध्ये ‘वर्क फ्रॉम होम’ करावं लागणाºयांच्या दुखण्याची आता भर पडत चालली
आहे.
रिमोट वर्किंगची पहिली संधी मिळताच आधी ज्यांना आनंद झाला होता, त्यातले काही आता ‘कोई लौटा दे मेरे बिते हुए दिन’ असं म्हणू लागले आहेत. काल या स्तंभामध्ये आपण ‘वर्क फ्रॉम होम’च्या फायद्यांची चर्चा केली होती, आज त्याच नाण्याची ही दुसरी; पण तोट्यांची बाजू तपासून पाहूया!