गजर भक्तिपंथाचा !

By किरण अग्रवाल | Published: January 11, 2018 08:50 AM2018-01-11T08:50:29+5:302018-01-11T08:50:46+5:30

अध्यात्म, साधू-संत, भक्ती हे विषय किंवा ते क्षेत्र आपले नाही; घरातल्या ज्येष्ठांनी ते बघून घ्यावे अशी ‘शहरी’ मानसिकता एकीकडे प्रदर्शित होत असताना, दुसरीकडे विशेषत: ग्रामीण भागातील तरुण पिढी वारीमध्ये मोठ्या हिरीरीने सहभागी होत भक्तिपंथाची पताका उंचावताना दिसून यावी, ही बाब वारकरी संप्रदायाची परंपरा कशी घट्ट रुजली आहे याचा परिचय घडवून देणारीच आहे.

Bhaktipantha! | गजर भक्तिपंथाचा !

गजर भक्तिपंथाचा !

googlenewsNext

अध्यात्म, साधू-संत, भक्ती हे विषय किंवा ते क्षेत्र आपले नाही; घरातल्या ज्येष्ठांनी ते बघून घ्यावे अशी ‘शहरी’ मानसिकता एकीकडे प्रदर्शित होत असताना, दुसरीकडे विशेषत: ग्रामीण भागातील तरुण पिढी वारीमध्ये मोठ्या हिरीरीने सहभागी होत भक्तिपंथाची पताका उंचावताना दिसून यावी, ही बाब वारकरी संप्रदायाची परंपरा कशी घट्ट रुजली आहे याचा परिचय घडवून देणारीच आहे.

त्र्यंबकेश्वरी षट्तिला एकादशीला होणाऱ्या संतश्रेष्ठ निवृत्तिनाथांच्या यात्रोत्सवासाठी राज्यातील ठिकठिकाणच्या दिंड्या नाशकातून मार्गस्थ होत असून, या वारीतील तरुण वारक-यांचा सहभाग लक्ष वेधून घेणारा ठरला आहे. गेल्या पंढरपूरच्या आषाढी ‘वारी’तही हा तरुणाईचा भक्तिप्रवाह ओसंडून वाहताना दिसला आणि आता त्र्यंबकेश्वरीही तोच अनुभव येत आहे. ज्येष्ठांच्या संगतीने टाळ-मृदंगावर ठेका धरीत व ‘जय जय रामकृष्ण हरी’चा गरज करीत अनेक तरुण मोठ्या तल्लीनतेने नाममहिमेत तुडुंब डुंबत या वारीत सहभागी झालेले दिसून आले. त्यामुळे तरुण पिढीला देव-धर्म, संत-श्रद्धांशी काही देणे-घेणे नाही, आजची तरुण मुलं केवळ पोटा-पाण्याच्या नोकरी-उद्योगात म्हणजे ‘कमविण्यात’ गुंतली असून, ऐहिक सुखात रममाण झाल्याचा समज खोटा ठरावा. अर्थात, कालौघात तशी स्थिती आकारास येताना दिसत आहे, हे लपून राहिलेले नाही. विशेषत: सहजसाध्यतेच्या मागे लागलेली तरुण मंडळी आता कष्टदायी प्रथा वा कामांकडे पाठ फिरवतानाच दिसते. त्यात आठवडा-पंधरवड्याची ‘वारी’ करायची, ऊन-वारा-पाऊस-थंडी झेलत माउलींच्या भेटीसाठी पायी मार्गक्रमण करायचे तर तसे अवघडच काम. तरी, ग्रामीण भागातील तरुणाईचा ‘वारी’च्या भक्तिमार्गातील सहभाग उठून दिसणारा व टिकून राहिलेला आहे, नव्हे तो वृद्धिंगत होताना दिसतो आहे, ही मोठी समाधानाची बाब म्हणायला हवी.

वारी ही खरे तर जीवनानुभव देणारी यात्रा असते. वारीदरम्यानच्या नामातून, भजन-कीर्तनातून आत्मभान तर जागतेच; शिवाय संतांनी सांगितल्याप्रमाणे ‘सर्वांभूती समत्व’ पाहण्याची दृष्टीही लाभते. आजच्या काळात तर तीच अधिक गरजेची झाली आहे. पंढरपूर पाठोपाठ ज्ञानोबारायांचे गुरू, ज्येष्ठ बंधू निवृत्तिनाथांच्या दर्शनासाठी त्र्यंबकेश्वरी येणाºया दिंड्या व वारकºयांच्या माध्यमातून हेच समाज जागरण होताना दिसून येते. या जागरणात संतांच्या नामस्मणाचा नाद व श्रद्धा-भक्तीचा गंध असतो, जो अवघा परिसर व्यापून टाकतो. माउलींच्या दर्शनाच्या ओढीने वारी वा दिंडीतील वारकºयांची पाऊले पुढे पडतात. या प्रत्येक पावलागणीक राग-लोभ-मत्सर-अहंकार मागे पडत जाऊन माणुसकीच्या विश्वधर्माच्या जाणिवा प्रगाढ होत जातात. संत ज्ञानेश्वर, निवृत्तिनाथ, सोपानदेव, मुक्ताबाई, नामदेव, तुकाराम, सावता माळी, चोखोबा, गोरोबा आदी सर्वच संतांनी तेच तर अपेक्षिले आहे. म्हणूनच या जाणीव जागृतीच्या वारीत तरुण पिढीचा सहभाग महत्त्वाचा ठरणारा आहे. कारण आजचे वर्तमान व उद्याचे भविष्यही त्यांच्यातच आशेचा किरण शोधते आहे. नाहीतरी वारकरी संप्रदायातील तरुणाईच्या पुढाकाराची परंपरा खुद्द प्रवर्तकांनीच घालून दिली आहे. ज्ञानोबा माउली, सोपानदेव, मुक्ताबार्इंनी तरुणपणातच या संप्रदायाची पायाभरणी करून समाधी अवस्था प्राप्त केल्याचा इतिहास आहे. संत निवृत्तिनाथांनीही तरुणपणीच, पण त्यांच्यानंतर समाधी घेतली. याच संदर्भाने संत नामदेवांनी, ‘वरिष्ठांचे आधी, कनिष्ठांचे जाणे! केले उफराटे, नारायणे!!’ हा अभंग रचिला आहे. तेव्हा, हा संप्रदाय घट्ट पायावर उभा करण्याचे कार्य तरुण पिढीच अव्याहतपणे करीत आल्याचे जे दिसून येते त्याला अशी गौरवशाली परंपरा आहे. सध्याच्या ‘वारी’तील तरुणाईचा वाढता सहभाग याच परंपरेचा परिचायक म्हणायला हवा.

महत्त्वाचे म्हणजे, वारीतील नामसंकीर्तनातून मनाच्या निर्मलतेचा संदेश मिळतो. त्याच संकल्पनेतून यंदा त्र्यंबकच्या वारी व यात्रेदरम्यान ‘निर्मल वारी’ची साद घातली गेली आहे. वनवासी कल्याण आश्रम, निवृत्तिनाथ महाराज संस्थान, वारकरी महामंडळ व त्र्यंबक नगरपालिकेच्या परस्पर सहकार्यातून परिसर स्वच्छ व निर्मल ठेवण्याचे प्रयत्न याद्वारे केले जात आहेत. वारीतील तरुणांचा यातही पुढाकार दिसत आहे. दुसरे म्हणजे त्र्यंबकेश्वर हे भगवान शिवाचे तीर्थक्षेत्र व पीठ आहे. संत निवृत्तिनाथ हेदेखील शिव अवतार मानले जातात. ‘धन्य धन्य निवृत्ती देवा, काय महिमा वर्णावा! शिवावतार तुंचि धरून, केले त्रैलोक्य पावन!!’ या अभंगात संत एकनाथ महाराजांनी तसा दाखलाही दिला आहे. त्यामुळे तीर्थराजा त्र्यंबकेश्वराचे मंदिर जसे काळ्या पाषाणात आहे त्याप्रमाणे संत निववृत्तिनाथांचे समाधी मंदिरही काळ्या पाषाणात साकारण्याचे काम सुरू झाले असून, गेल्याच महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंदिर जीर्णोद्धाराचा शुभारंभ करण्यात आला आहे. यंदा पीक-पाणीही बºयापैकी आहे, त्यामुळे वारकरी संप्रदाय आनंदाचे डोही आनंद तरंग घेऊन यंदाच्या वारीत सहभागी झाला आहे. ही वारी मंगलकारी व अवघ्या विश्वाचे म्हणजे सकलजनांचे कल्याण साधणारी सुफल-संपूर्ण होवो, इतकेच यानिमित्ताने...

Web Title: Bhaktipantha!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.