भंडारा-परभणीतील निवडणुकीत चर्चा अकोल्याचीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2018 05:07 AM2018-05-03T05:07:54+5:302018-05-03T05:07:54+5:30

पूर्व विदर्भाच्या एका टोकावर असलेला भंडारा अन् मराठवाड्यातील परभणी-हिंगोली हे दोन जिल्हे. येथील राजकीय घडामोडींवर अकोल्याचा प्रभाव

Bhandara-Parbhani elections are discussed in Akola | भंडारा-परभणीतील निवडणुकीत चर्चा अकोल्याचीच

भंडारा-परभणीतील निवडणुकीत चर्चा अकोल्याचीच

Next

पूर्व विदर्भाच्या एका टोकावर असलेला भंडारा अन् मराठवाड्यातील परभणी-हिंगोली हे दोन जिल्हे. येथील राजकीय घडामोडींवर अकोल्याचा प्रभाव असण्याचे काहीएक कारण नाही; मात्र राजकरणात कोणती परिस्थिती कधी बदलेल, याचा नेम नसतो. हेच प्रत्यंतर आले आहे. भंडाऱ्यात होऊ घातलेल्या पोटनिवडणुकीत अन् परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य मतदारसंघाच्या निवडणुकीत अकोला फॅक्टर महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे या दोन मतदारसंघांसोबतच अकोल्यातही या निवडणुकीची चर्चा सुरू झाली आहे.
माजी खासदार नाना पटोले यांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे लोकसभेच्या भंडारा-गोंदिया मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. या मतदारसंघात पोटनिवडणूक लढण्यासाठी उमेदवार निश्चित करण्याचा निर्णय भारिप-बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी घेतला आहे. भारिप-बमसंने अकोला पॅटर्न तयार करून राजकारणातील समीकरणे बदलवून टाकल्याचा इतिहास आहे. भारिपच्या वाढत्या प्रभावामुळेच अकोल्यासारखा एकेकाळी काँग्रेसचा गड असलेल्या जिल्ह्यात सध्या विधानसभा व लोकसभा मतदारसंघ हे काँग्रेसमुक्त झाले आहेत. भारिप-बमसंच्या सामाजिक अभियांत्रिकीचा फटका काँग्रेसच्या व्होट बँकेला बसला तो आजतागायत सावरलेला नाही. या पार्श्वभूमीवर भंडारा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने भारिप-बहुजन महासंघाच्या उमेदवारास जाहीर पाठिंबा देऊन नवीन पर्वाची सुरुवात करावी, असा ठराव भारिप-बहुजन महासंघ प्रदेश कार्यकारिणीने घेतल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने यांनीच दिली आहे. या संभाव्य नव्या पर्वाची सूत्रे अकोल्यातून ठरविली जात असल्याने काँग्रेस-भारिप एकत्र आल्यास पुढील राजकारणाची समीकरणेच बदलणार आहेत. या दोन पक्षांची मैत्री झाल्यास विदर्भातील किमान पाच लोकसभा मतदारसंघातील समीकरणे बदलतील. दुसरीकडे परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य मतदारसंघातून शिवसेनेने अकोल्याचे आ़ गोपीकिशन बाजोरिया यांचे पुत्र विप्लव बाजोरिया यांना उमेदवारी दिली आहे. शिवसेना-भाजपा युतीनुसार परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य मतदारसंघाची जागा भाजपाच्या वाट्याला आली होती; मात्र शिवसेनेने आधीच उमेदवार जाहीर करून टाकला आहे. आता या निवडणुकीसाठी युती एकत्र आली आहे, त्यामुळे विरोधकांसाठी ते आव्हानच आहे. खरे तर आ़ गोपीकिशन बाजोरिया यांच्यावर या मतदारसंघात प्रभारी म्हणून जबाबदारी होती. त्यांनी सर्व चाचपणी करून आपल्या पुत्रालाच निवडणुकीत उतरविण्याचा घेतलेला निर्णय हा त्यांच्या राजकीय अनुभवातून आला आहे. आ. बाजोरिया हे अकोला स्थानिक स्वराज्य मतदारसंघातून सलग तिसºयांदा विजयी झाले आहेत. काँग्रेस-राष्टÑवादीचे बहुमत असतानाही त्यांच्या ‘व्यवस्थापन कौशल्या’ मुळे त्यांनी सेनेच्या विजयाचा झेंडा रोवला होता. नेमकी हीच परिस्थिती आता त्यांच्या पुत्रासमोर आहे. हिंगोली-परभणी मतदारसंघात काँग्रेस-राष्टÑवादीकडे असलेली मते वळविण्यासाठी ते आपला पूर्वानुभव पणाला लावतील, त्यामुळे पुत्रासाठी जणू आ. बाजोरिया हेच रिंगणात आहेत. एकंदरीत या दोन्ही निवडणुकीत अकोला फॅक्टरचा प्रभाव असल्याने अकोल्याच्या राजकारणावरही या निवडणुकीतील निर्णयांचा प्रभाव पडणार आहे.
- राजेश शेगोकार

Web Title: Bhandara-Parbhani elections are discussed in Akola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.