भाष्य - अभिनयकलेचा सन्मान
By admin | Published: June 1, 2017 12:14 AM2017-06-01T00:14:47+5:302017-06-01T00:14:47+5:30
मराठी रंगभूमी, चित्रपट, मालिका तसेच हिंदी चित्रपट अशा मोठ्या अवकाशात मुक्त भ्रमंती करणारे ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना
मराठी रंगभूमी, चित्रपट, मालिका तसेच हिंदी चित्रपट अशा मोठ्या अवकाशात मुक्त भ्रमंती करणारे ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर होणे म्हणजे मराठी अभिनयकलेचाच सन्मान म्हणावा लागेल. मराठी कलाक्षेत्रात हरहुन्नरी अभिनेता हे विशेषण ज्यांना ज्यांना चपखल लागू पडते, त्यात मोहन जोशी यांचे नाव बरेच वर आहे. रंगमंच, छोटा पडदा आणि मोठा पडदा अशा तिन्ही ठिकाणी लीलया संचार करत मोहन जोशी यांनी त्यांच्या अभिनयाची वेगळीच छाप उमटवली आहे. केवळ मराठी व हिंदीच नव्हे तर या मराठी शिलेदाराने भोजपुरी आणि कन्नड चित्रपटांनाही गवसणी घातली आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत खलनायक म्हणून ठसा उमटवणाऱ्या मोहन जोशी यांनी मायमराठीत मात्र त्यांच्या खास अभिनय शैलीतून रसिकांच्या गळ्यातला ताईत होण्याची भूमिका नेटाने बजावली आहे. त्यांच्या उमेदवारीच्या काळात ते या क्षेत्रापासून कोसो दूर होते. पण पोटापाण्यासाठी बरेच उद्योगधंदे केलेल्या या मेहनती माणसाचे चीज हे अभिनय क्षेत्रात व्हायचे होते, हे विधिलिखितच असावे. मोरूची मावशी या नाटकापासून सुरू झालेला त्यांचा अभिनय प्रवास आजही तितक्याच जोमाने सुरू आहे. सुरुवातीच्या काळात त्यांनी रावसाहेब या चित्रपटात भूमिका साकारत राज्य शासनाचा पुरस्कार प्राप्त केला. तेव्हापासूनचा हा प्रवास आता संगीत नाटक अकादमीपर्यंत येऊन पोहोचला आहे. घराबाहेर, सवत माझी लाडकी, तू तिथं मी अशा अनेक चित्रपटांतून त्यांनी रसिकांवर गारुड केले. नॉट ओन्ली मिसेस राऊत या चित्रपटातली त्यांची भूमिकाही लक्षवेधी ठरली. मराठीत जम बसल्यावर त्यांना हिंदी चित्रपटसृष्टी खुणावू लागली आणि तिथेही त्यांनी मराठी अभिनयाचा अनोखा आविष्कार पेश केला. भूकंप, वास्तव, मृत्युदंड, गंगाजल अशा चित्रपटांतून विविध प्रकारच्या भूमिका रंगवत त्यांनी हिंदी चित्रशौकिनांच्या मनातही अढळ स्थान निर्माण केले. मराठी मालिकांमध्ये अनेकविध भूमिका साकारत मोहन जोशी यांचा अभिनय घराघरांत जाऊन पोहोचला. आजही तिन्ही क्षेत्रात त्यांची मुशाफिरी सुरू असताना अ. भा. मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष म्हणून ते यशस्वी कामगिरी पार पाडत आहेत, हेसुद्धा त्यांच्या लौकिकास साजेसेच म्हणावे लागेल.