भास्कराचार्य गणितनगरी
By Admin | Published: March 26, 2016 03:19 AM2016-03-26T03:19:17+5:302016-03-26T03:19:17+5:30
भास्कराचार्यांचे यथोचित स्मारक म्हणून गणितनगरीसाठी अर्थसंकल्पात तरतूद झाली. केकी मूस व वि.का.राजवाडे यांच्या स्मारकांची उपेक्षा कायम आहे.
- मिलिंद कुलकर्णी
भास्कराचार्यांचे यथोचित स्मारक म्हणून गणितनगरीसाठी अर्थसंकल्पात तरतूद झाली. केकी मूस व वि.का.राजवाडे यांच्या स्मारकांची उपेक्षा कायम आहे.
गणितज्ज्ञ भास्कराचार्य यांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या पाटणादेवी (ता.चाळीसगाव) येथे जागतिक दर्जाची गणितनगरी उभारण्यासाठी भरीव तरतूद महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. चाळीसगावचे आमदार उन्मेष पाटील यांनी गणितसूर्य भास्कराचार्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून गणितनगरीसाठी प्रयत्न चालविले होते. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी चाळीसगाव दौऱ्यात यासंबंधी घोषणादेखील केली होती. आता अर्थसंकल्पात तरतूद झाल्याने गणितनगरीच्या स्थापनेच्या दृष्टीने आश्वासक पावले पडू लागल्याचे स्पष्ट झाले आहे.
इ.स.१११४ ते ११८५ या कालखंडात भास्कराचार्य यांनी गणित, खगोलशास्त्र आणि आकाशनिरीक्षणाचे ज्ञान पाटणादेवी येथे संपादित केले. सध्या त्यांच्या नावाने वनौषधी केंद्र अस्तित्वात आहे. परंतु गणितनगरीच्या रुपाने यथोचित स्मारक उभारले जाणार आहे. अहमदाबादच्या सायन्स सिटीच्या धर्तीवर ही मॅथ सिटी उभारण्याचा प्रस्ताव आहे. त्यात एक हजार गणिती खेळांचे गणिती उद्यान, स्पर्धा परीक्षा तयारीसाठी मॅथ क्लिनिक, नक्षत्र विज्ञानाच्या अभ्यासासाठी तारांगण, वैदिक गणिताचे प्रशिक्षण, ग्रंथदालन यांचा समावेश असेल. आमदार उन्मेष पाटील हे सत्ताधारी भाजपाचे आमदार असल्याने ‘गणितनगरी’ उभारण्यासाठी ते आटोकाट प्रयत्न करतील.
गणितनगरीच्या माध्यमातून भास्कराचार्य यांचे यथोचित स्मारक उभारले जात असताना चाळीसगाव हे कर्मभूमी मानून अखंड कलासाधना करणाऱ्या केकी मूस यांच्या कलादालनाच्या सक्षमीकरणासाठी तरतूद करायला हवी होती, अशी अपेक्षा कलाप्रेमींकडून व्यक्त झाली. मुंबईत जन्म आणि शिक्षण, इंग्लंड, स्पेन, ग्रीस, जपान, रशिया व चीन या देशात कला-संस्कृतीचा अभ्यास केलेले केकी मूस १९४० मध्ये चाळीसगावला आले. अखेरच्या श्वासापर्यंत ते चाळीसगावातच राहिले. एक-दोन प्रसंग वगळता ते क्वचितच घराबाहेर पडले. अखंड कलासाधनेसाठी त्यांनी तब्बल ५० वर्षे आत्मकैद स्वीकारली. चित्रकला, छायाचित्रकला, शिल्पकला, काष्ठ शिल्पकला, क्ले मॉडेलिंग, ओरिगामी आदी कलाप्रकारातून हजारो कलाकृतींची निर्मिती केली. कलामहर्षी केकी मूस फाऊंडेशनने मूस यांच्या कलाकृतीचे संग्रहालय त्यांच्याच छोटेखानी बंगल्यात उभारले आहे. या संग्रहालयाच्या सक्षमीकरणासाठी सरकार आणि समाजाच्या मदतीची गरज असली तरी दोन्ही पातळीवर उपेक्षा होत आहे.
केकी मूस कलादालनाप्रमाणेच धुळ्याच्या राजवाडे संशोधन मंडळालाही आर्थिक हातभार हवा आहे. महाराष्ट्राच्या इतिहासाचे संशोधन करणाऱ्या इतिहासाचार्य वि.का.राजवाडे यांनी १९०४ ते १९२६ असा २२ वर्षांचा कालखंड धुळ्यात व्यतीत केला. इतिहास, संस्कृती, भूगोल, मानववंशशास्त्र, आरोग्य, भाषा, व्याकरण, खगोलशास्त्र, पुरातत्त्व, राज्यशास्त्र, समाजशास्त्र या विविध अभ्यासशाखांचा त्यांचा व्यासंग होता. त्यांच्या निधनानंतर ९ जानेवारी १९२७ रोजी तात्यासाहेब भट यांनी राजवाडे संशोधन मंडळाची स्थापना केली. छत्रपती शिवाजीमहाराजांची दुर्मिळ पत्रे, पेशव्यांची अस्सल कागदपत्रे, खान्देशचा पहिला कलेक्टर ब्रिग्ज यांच्या शिक्क्याची काही पत्रे, पाच हजार हस्तलिखिते आणि ३० हजार कागदपत्रे या मंडळाने जतन केली आहेत. ३ आॅक्टोबर १९४१ रोजी राजवाडे वस्तुसंग्रहालय स्थापन झाले. १९७७ मध्ये या वस्तुसंग्रहालयासाठी बाळासाहेब मुंदडे यांच्या पुढाकाराने देखणी वास्तू लाभली.
केकी मूस, इतिहासाचार्य वि.का.राजवाडे यांनी खान्देशला कर्मभूमी मानून ऐतिहासिक कामगिरी केली. त्यांचे कार्य पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरावे म्हणून कलादालन, वस्तूसंग्रहालय उभारले गेले. परंतु त्यांच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न होत नाहीत. भास्कराचार्यांच्या गणितनगरीच्या निमित्ताने ही बाजूदेखील समोर यायला हवी.