भिडे वाड्यातील मुलींची शाळा : स्त्री शिक्षणाच्या पहाटेची १७६ वर्षे!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2024 10:17 AM2024-01-01T10:17:49+5:302024-01-01T10:18:27+5:30

म. जोतिराव व सावित्रीबाई फुले यांनी पुण्यातील भिडे वाडा येथे भारतातील मुलींची पहिली शाळा सुरू केली. या घटनेला आज १७६ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त..

Bhide Wada Girls' School: 176 years of the dawn of women's education | भिडे वाड्यातील मुलींची शाळा : स्त्री शिक्षणाच्या पहाटेची १७६ वर्षे!

भिडे वाड्यातील मुलींची शाळा : स्त्री शिक्षणाच्या पहाटेची १७६ वर्षे!

महात्मा जोतिराव व सावित्रीबाई फुले, फातिमा शेख यांनी पुण्यातील भिडेवाडा येथे १ जानेवारी १८४८ रोजी भारतातील मुलींची पहिली शाळा सुरू केली आणि स्त्री मुक्तीची पहाट झाली. हा क्षण इतिहासात नोंदला गेला असला तरी त्याचा साक्षीदार असलेला भिडे वाडा मात्र अंधारात राहिला होता. त्यामुळे २५ वर्षांपूर्वी म्हणजे या शाळेला १५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने १ जानेवारी १९९८ रोजी या महत्त्वाच्या सामाजिक इतिहासाकडे सगळ्यांचे लक्ष वेधण्यासाठी ‘म. फुले वाडा ते भिडे वाडा’ अशी कृतज्ञता मिरवणूक आम्ही आयोजित केली होती.  

फुले अभ्यासक दिवंगत फुलवंताअक्का झोडगे, महात्मा फुले यांच्याविषयी माहितीकोश असलेले ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव यात सहभागी झाले होते. त्यावेळी पहिल्यांदा भिडे वाडा येथे राष्ट्रीय स्मारक करण्याची मागणी ठळकपणे पुढे आली. तेव्हापासून ‘मुलींची पहिली शाळा सार्वजनिक स्मारक निर्माण समिती’च्या माध्यमातून गेली २५ वर्षे हा लढा सुरू आहे. मोर्चे, आंदोलने, निवेदने, चर्चा या माध्यमातून समितीने स्मारकाचा विषय लावून धरला होता. याबद्दल मा. उच्च व सर्वोच्च न्यायालयाने स्मारक उभारणीचा मार्ग नुकताच प्रशस्त केला आहे.

समितीच्या वतीने गेल्या दहा-बारा वर्षांपासून १ जानेवारी हा दिवस ‘स्त्री शिक्षण गौरव दिवस’ म्हणून साजरा करण्यात येतो. शासनानेही हा दिवस ‘स्त्री शिक्षण गौरव दिवस’ म्हणून जाहीर करावा, अशी मागणी समितीने केली होती. त्यानुसार राज्य शासनाने सावित्रीबाई फुले यांचा जयंती दिवस ३ जानेवारी हा ‘स्त्री शिक्षण दिन’ म्हणून जाहीर केला आहे. ही स्वागतार्ह घोषणा आहे. यामुळे समितीची भूमिका शासनाने स्वीकारल्याचे स्पष्ट होते. मात्र ही शाळा १ जानेवारीला सुरू झाली, तसेच ती सुरू करण्यासाठी फुले दांपत्याला इतरही समाजबांधवानी जे साहाय्य केले त्यांचीही उचित दखल घेण्यासाठी १ जानेवारी हा दिवस ‘स्त्री शिक्षण गौरव दिन’ म्हणून अधिक संयुक्तिक असल्याच्या भूमिकेला मान्यता मिळविण्यासाठी समिती प्रयत्नशील असेल.
शाळेच्या पहिल्याच दिवशी सावित्रीबाईंना शेण-गोट्यांचा मारा सहन करावा लागला. सावित्रीबाईंसोबत अहमदनगरमध्ये शिक्षिकेचे प्रशिक्षण घेतलेल्या फातिमा शेख यादेखील प्रशिक्षित शिक्षिका म्हणून त्या शाळेत शिकवत.  त्याचा सावित्रीबाईंना मोठा आधार वाटत असे.  सावित्रीबाईंना शाळेच्या पहिल्याच दिवशी विरोध झाल्यानंतर लहुजी वस्ताद साळवे यांनी आपल्या तालमीतील मल्लांचे त्यांना संरक्षण दिले. शिवाय आपल्या घरातील मुक्ता या चिमुकलीला शाळेत शिकण्यासाठी पाठविले. सावित्रीबाईंवर हल्ला झाल्यामुळे सुरुवातीला लोक आपल्या मुली शाळेत घालावयास घाबरत असत. परंतु जोतिराव व सावित्रीबाईनी पालकांच्या भेटी घेऊन त्यांची मते बदलली. त्यामुळे मुलींची संख्या हळूहळू वाढत जाऊन २५ पर्यंत गेल्याचे आढळते. त्यामध्ये नंतर मागास समजल्या जाणाऱ्या जातीतील मुलीही येऊ लागल्या.

जोतिराव व सावित्रीबाईनी १८५२ पर्यंत १८ शाळा सुरू केल्याच्या नोंदी आहेत. या शाळेत व्याकरण, भूगोल, गणित, भाषा असे आधुनिक विषय शिकविले जात. यावरून सावित्रीबाईची दूरदृष्टी दिसून येते. मुलींच्या शैक्षणिक प्रगतीस प्रमुख कारण असलेल्या सावित्रीबाईचा जन्मदिन हा ‘स्त्री शिक्षण दिन’ म्हणून जाहीर झाला आहे, पण दुसऱ्या बाजूला या सर्वांची मुहूर्तमेढ जिथे झाली त्या भिडे वाड्याकडे मात्र पूर्ण दुर्लक्ष झाले होते. पहिली मुलींची शाळा व पहिल्या भारतीय शिक्षिकेचे नाते या ठिकाणाशी जुळलेले आहे याची माहिती गेल्या २५ वर्षांतील घडामोडींमुळे सगळ्यांना झाली. त्यातून समाजाच्या विविध स्तरांतून आवाज उमटला. तो वाढू लागल्यावर अखेर राष्ट्रीय स्मारक होण्यासाठी ठोस घडामोडी घडू लागल्या. सर्वोच्च व उच्च न्यायालयानेही स्मारकाची वाटचाल आता प्रशस्त केली आहे, पण स्त्री मुक्तीची पहाट झालेल्या ठिकाणाला उचित स्मारक उभारून न्याय देणे आता शासन व त्यावर लक्ष ठेवणाऱ्या जनतेच्या हाती आहे.

- नितीन पवार, निमंत्रक, ‘मुलींची पहिली शाळा सार्वजनिक स्मारक निर्माण समिती’
2nitin.pawar@gmail.com

Web Title: Bhide Wada Girls' School: 176 years of the dawn of women's education

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.