भामसंचा घरचा अहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 01:02 AM2017-10-11T01:02:29+5:302017-10-11T01:02:43+5:30

जुने ते सोने अशी म्हण मराठीत आहे. इतर भारतीय भाषांमध्ये अशा आशयाच्या म्हणी आहेत की नाहीत कोण जाणे; पण भारतीय माणूस इतिहासात रमतो, हे सत्य आहे.

 Bhramasacha's house | भामसंचा घरचा अहेर

भामसंचा घरचा अहेर

googlenewsNext

जुने ते सोने अशी म्हण मराठीत आहे. इतर भारतीय भाषांमध्ये अशा आशयाच्या म्हणी आहेत की नाहीत कोण जाणे; पण भारतीय माणूस इतिहासात रमतो, हे सत्य आहे. आताच्या तुलनेत जुना काळ कसा चांगला, रम्य, वैभवशाली, समृद्ध होता, हे कथन करीत सुस्कारे सोडणे त्याला आवडते. अलीकडे मात्र, इतिहासातील गत सहा-सात दशकांच्या कालखंडात जे काही झाले ते सगळे टाकाऊ असल्याचा कांगावा करीत बदलून टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे. देशाच्या नियोजनबद्ध विकासाचा कणा ठरलेल्या योजना आयोगाचा गाशा एक दिवस असाच गुंडाळण्यात आला आणि नीती आयोग अस्तित्वात आणण्यात आला. त्यावेळी जुन्या बाटलीत नवी दारू म्हणून विरोधकांनी त्याची संभावना केली; पण आता तर सत्ताधारी भारतीय जनता पक्षाची मातृ संस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या परिवारातील भारतीय मजदूर संघानेच नीती आयोगाला धारेवर धरले आहे. केवळ नीती आयोगच नव्हे, तर नरेंद्र मोदी सरकारच्या एकूणच आर्थिक धोरणावर भामसंने सडकून टीका केली आहे. भामसंच्या कार्यकारिणीची बैठक नुकतीच नागपुरात पार पडली. त्यानंतर पार पडलेल्या पत्रकार परिषदेत भामसंचे महामंत्री ब्रजेश उपाध्याय यांनी मोदी सरकारच्या आर्थिक धोरणांची पार चिरफाड केली. काँग्रेसचीच आर्थिक धोरणे राबवित असल्याचा हल्ला, त्यांनी मोदी सरकारवर चढविला. गत काही दिवसांपासून मोदी सरकारवर चौतर्फा टीकेचा भडिमार सुरू झाला आहे. राजकीय विरोधकांसोबतच विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि समाजमाध्यमांमध्ये सक्रिय ट्रोल असे सारेच मोदी सरकारवर तुटून पडत असताना, आता साक्षात परिवारातील संघटनेकडून झालेला हल्ला जिव्हारी लागणाराच म्हणायला हवा. त्यातही ऊठसूट काँग्रेसमुक्त भारताच्या घोषणा देणे सुरू असताना, संघ परिवारातील संघटनेनेच काँग्रेसची धोरणे राबवित असल्याची टीका करावी, यापेक्षा मोठा दैवदुर्विलास तो कोणता? संघ परिवाराची राजकीय शाखा असलेल्या भाजपाच्या सरकारवर टीका करण्यामागे भामसंची जी भूमिका असेल ती असो; पण उपाध्याय यांनी नेमक्या त्याच मुद्यांवरून सरकारला धारेवर धरले आहे, जे मुद्दे विविध विचारवंत व अर्थतज्ज्ञांनी गत काही दिवसात मांडले आहेत. आर्थिक मंदी आणि थंडावलेली रोजगार निर्मिती हे त्यापैकी प्रमुख मुद्दे! पंतप्रधान मोदी व सरकारमधील इतर धुरीण या आघाड्यांवर अपयशी ठरल्याचे साफ फेटाळून लावतात; पण आता थेट परिवारातूनच घरचा अहेर मिळाल्याने, किमान आता तरी त्यांनी या मुद्यांची दखल घ्यायला हवी. तसे झाल्यास जनता भामसंला निश्चितच धन्यवाद देईल!

Web Title:  Bhramasacha's house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.