भुजबळांचे साम्राज्य!

By admin | Published: August 27, 2016 05:49 AM2016-08-27T05:49:27+5:302016-08-27T05:49:27+5:30

इंग्रजी भाषेत ‘रोम वॉज नॉट बिल्ट इन अ डे’ अशी म्हण आहे. म्हणजे रोम शहराची उभारणी काही रातोरात झाली नाही.

Bhujbal empire! | भुजबळांचे साम्राज्य!

भुजबळांचे साम्राज्य!

Next


इंग्रजी भाषेत ‘रोम वॉज नॉट बिल्ट इन अ डे’ अशी म्हण आहे. म्हणजे रोम शहराची उभारणी काही रातोरात झाली नाही. रोमुलस आणि रेमस यांच्याकडे जरी या उभारणीचे श्रेय जात असले तरी ते काम केवळ या दोघांचे नव्हते. दोघांच्या चार हाताना ते शक्यही नव्हते. हजारो कामगार रात्रंदिवस खपत होते, कलाकार राबत होते, पैशाच्या राशी गोळा करुन ओतल्या जात होत्या, तेव्हां कुठे रोमन साम्राज्याचे वैभव मानल्या गेलेल्या रोम शहराची उभारणी झाली. अगदी आजदेखील त्या शहराचे वैभव, त्याचे ऐश्वर्य आणि त्याची भव्यता साऱ्यांना एकाच वेळी अचंबितही करते आणि बुचकळ्यातही पाडते. अशा या ऐश्वर्यसंपन्न भव्यतेचे मोल ते काय करणार आणि कसे करणार व ते मोजणार तरी कोणत्या मापाने? अशी नेत्रदीपक आणि खरे तर पाहाणाऱ्याचे डोळे फाडून टाकणारी खूबसुरती कधीही मोजता आणि मापता येत नसते. तसे करणे ना त्या काळी शक्य होते ना आजच्या काळी ते शक्य आहे. ऐश्वर्य नजरेत जितके माववून घेता येईल तितके माववून घ्यावे आणि मनातल्या मनात अंदाज बांधत राहावे. पण तसे करताना पाहाणाऱ्यानी स्वत:ची कल्पनाशक्ती कितीही ताणण्याचा प्रयत्न केला तरी ही शक्ती वास्तवाच्या जवळपासदेखील जाऊन पोहोचू शकणार नाही याची पक्की खूणगाठ मनाशी बांधून ठेवावी हेच अंती हितावह. म्हणूनच मोजदाद करणारे लोक भले कोणीही असोत, छगन भुजबळ यांनी ‘स्वकर्तृत्वाने’ उभारलेल्या अत्याधुनिक काळातील रोमन साम्राज्यसदृश साम्राज्याची ते काय मोजदाद करणार आणि काय त्यांना तिथे ओतल्या आणि सांडल्या गेलेल्या संपत्तीचा थांग लागणार? याचे महत्वाचे कारण म्हणजे जसे रोम रातोरात उभे राहिले नाही तसेच भुजबळांचे साम्राज्यदेखील रातोरात उभे राहिलेले नाही. त्यांच्या साम्राज्यातील काही मोजक्या वास्तूंकडेच आज साऱ्यांचे लक्ष वेधले गेले आहे आणि तिथल्या संपत्तीचेच मोजमाप केले जात आहे. नाशकातील त्यांच्या आधीच्या आणि नंतरच्या निवासी व विलासी वास्तूकडे जरी लोक विस्फारुन बघत असले तरी त्याच्याही उदरात आणखी जे ऐश्वर्य दडलेले आहे ते लोकांच्या नजरेसमोर तर अजून यायचेच आहे. शिवाय भुजबळ नॉलेज सिटी, मुंबई एज्युकेशन ट्रस्ट आणि तत्सम वास्तूंसमान या साम्राज्याच्या अन्य खुणा तर अजून अस्पर्शच आहे. पण मुद्दा तो नाही. मुद्दा इतकाच की हे कामदेखील त्या रोम शहराच्या उभारणीसारखे एकट्या दुकट्याच्या हातून आणि रातोरातही झालेले नाही. एकेक वीट रचत रचतच कोणतेही साम्राज्य उभे राहात असते व त्याला अनेकांचा हातभारही लागावा लागत असतो. भुजबळ ज्या काळात ही एकेक वीट रचत होते, त्या काळात त्यांच्याकडे कोणाचेच लक्ष नव्हते का ज्यांनी लक्ष द्यावयास हेवे होते, ते जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत होते? जे भुजबळाना कोणे एके काळी आपला चेला, आपला वारस, आपला उत्तराधिकारी मानीत होते, त्यांना आपला शिष्योत्तम वाममार्गाकडे झुकत चालला आहे, याची कधीच का जाणीव झाली नव्हती? खचितच झाली असणार. पण त्यांनी कधीही शिष्याला रोखण्याचा प्रयत्न केला नाही. उलट भुजबळांच्या परमनेत्यांची भूमिका प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरीत्या प्रोत्साहन देण्याचीच असणार. अन्यथा, कोणाचेही इतके स्खलन होऊ शकत नाही. लहान मुलांच्या गोष्टीतील एका तरुणावर चोरीचा आरोप सिद्ध होतो. न्यायाधीश त्याला काही सांगायचे आहे का म्हणून विचारतो. चोर सांगत काही नाही, तिथेच हजर असलेल्या आईजवळ जाण्याची परवानगी घेऊन जातो आणि आईच्या कानाचा कडकडून चावा घेतो. सारे दंग. न्यायाधीश खडसावतो. त्यावर चोर म्हणतो, लहानपणी शाळेत मी पहिल्यांदा एक पेन्सील चोरली तेव्हां हिने माझे कौतुक केले. त्याऐवजी तेव्हांच तिने माझा कान धरला असता तर मी आज चोर झालो नसतो! होईल का असे काही भुजबळांच्याही बाबतीत? आता ते अशक्य आहे. कल्पनेतील गोष्टीतल्याच त्या वाटमारी करणाऱ्याच्या पापात त्याची बायकोही सहभागी होण्यास तयार होत नाही मग भुजबळांचे कर्म कोण कशासाठी आणि का म्हणून आपल्या अंगावर ओढून घेईल? महात्मा गांधी ‘वॉन्ट’ आणि ’नीड’ म्हणजे हाव आणि गरज असा भेद करतात आणि वॉन्ट निषिद्ध मानतात. पण भुजबळ काही गांधीभक्त नव्हेत. त्यांचा सारा विश्वास वॉन्टवर आणि त्यांच्या आयुष्यात त्यांना जे कोणी प्रतिपालक भेटले तेदेखील वॉन्टवालेच. एकप्रकारचा समसमासंयोगच तो! नाशकातील भुजबळांच्या प्रासादाचे मूल्य तपासण्याचे कार्य म्हणे दीर्घकाळ चालणारे आहे. दगड विटा सीमेंट मोजता येईल, सागवानाच्या लाकडाचा अंदाज बांधता येईल, विद्युत रोषणाईचा अदमास येऊ शकेल पण मुळातच अवैध संपत्ती अवगुंठित करुन ठेवण्याचे साधन म्हणूनच ज्या पेन्टींग्जना आणि पुराणकालीन वस्तू म्हणजे अ‍ॅन्टीक पीसेसना स्वत:ची अशी खास ओळख आहे, त्यांची बाजारभावातील किंमत शोधून काढणे अशक्य कोटीतील समजले जात असताना त्याची किंमत कोण आणि कशी लावणार? तरीही या प्रकरणात एक मोठा काव्यगत न्याय लपलेला आहे. ज्या हातांनी दीर्घकाळ भुजबळांच्या साम्राज्यात भर टाकण्याचे काम केले तेच हात आता मोजपट्टी घेऊन या साम्राज्याला रुपये आणे पैच्या थोटक्या कोंदणात बसवायचा प्रयत्न करीत आहेत!

Web Title: Bhujbal empire!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.