बायडेन आणि पर्यावरण

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2020 05:31 AM2020-11-16T05:31:05+5:302020-11-16T05:31:21+5:30

Editorial : डोनाल्ड ट्रम्प यांना दुर्दैवाने विचार करणे या एकूणच गोष्टीचे अंग नव्हते; त्यांची हटवादी आढ्यता  एवढी टोकाची, की या माणसाने वातावरण बदलाच्या  एकूण कल्पनेलाच बोगस संबोधून जगातील शास्रज्ञांना पार शून्यवत करून ठेवले होते.

Biden and the environment | बायडेन आणि पर्यावरण

बायडेन आणि पर्यावरण

Next

अमेरिकेसारख्या महासत्तेत जेव्हा सत्तांतर होत असते तेव्हा त्याचे दृश्यादृश्य परिणाम केवळ तिथल्या तेहतीस कोटी जनतेपुरते मर्यादित राहात नाहीत, तर ते देश आणि खंडांच्या सीमा ओलांडून अवघ्या मानवतेला घेरत असतात. अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वत:भोवती ठाम नकाराची काल्पनिक तटबंदी उभी केली असली आणि जो बायडेन यांनी खेचून आणलेली  विजयश्री नाकारण्याचा चिथावणीखोर पवित्रा घेतला असला तरी त्या देशाच्या संविधानात सत्तांतराची प्रक्रिया सुरळीत पार पाडण्याचे सामर्थ्य निश्चितपणे आहे. परिणामी सुसंस्कृत, मध्यमवर्गीय पार्श्वभूमी असलेल्या बायडेन यांच्या विचारधारेचा प्रभाव येती किमान चार वर्षे तरी जगावर पडणार आहे. 


यात अतिमहत्त्वाचे आहेत ते जो बायडेन यांचे पर्यावरणीय विचार. डोनाल्ड ट्रम्प यांना दुर्दैवाने विचार करणे या एकूणच गोष्टीचे अंग नव्हते; त्यांची हटवादी आढ्यता  एवढी टोकाची, की या माणसाने वातावरण बदलाच्या  एकूण कल्पनेलाच बोगस संबोधून जगातील शास्रज्ञांना पार शून्यवत करून ठेवले होते.  मात्र, बायडेन यांनी या विषयाचा सांगोपांग अभ्यास केल्याचे पुरावे आहेत. १९८६ साली अमेरिकन कॉंग्रेसमध्ये पहिलेवहिले वातावरण बदलविषयक विधेयक मांडण्याचा मान त्यांना जातो. त्यानंतरची त्यांची सातत्यपूर्ण कृती आणि उक्ती त्यांना वातावरण बदल योद्धयाचा किताब देऊन गेलेली आहे.  बराक ओबामा यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात बायडेन यांच्याकडे उपाध्यक्षपद होते आणि यादरम्यान प्रदूषणकारी उद्योगांवरले निर्बंध कठोर करण्यात आले होते. विशेषत: कार्बनचे उत्सर्जन करणारे उद्योग बायडेन यांच्या जाहीर नाराजीचे कारण राहिले असून, त्यांच्या जाहीरनाम्यातील पर्यावरणीय संकल्पांकडे पाहिल्यास त्यांच्या या धारणेचे प्रतिबिंब प्रत्यक्ष आणि ठोस कृतीत उमटण्याचीच शक्यता अधिक दिसते.

इमारत उभारणीपासून जलसंचयापर्यंत आणि वाहतुकीपासून ऊर्जानिर्मितीच्या संसाधनापासून आपल्या कार्यकाळात जे काही निर्मिले जाईल त्याची क्षमता वातावरण बदलाचे परिणाम तोलणारी असेल, असा निर्वाळा बायडेन यांनी आपल्या जाहीरनाम्यातून दिलेला आहे. सुबत्तेच्या पिरॅमिडच्या तळाशी असलेल्या दुर्बल जनतेची मते प्रामुख्याने आपल्या पारड्यात पडतील याचा विश्वास बायडेन यांना होता आणि या घटकांच्या आशा-अपेक्षांशी निगडित पर्यावरणीाय धोरण त्यांनी निश्चित केलेले आहे. पर्यावरण आणि अर्थव्यवस्था यांचा घनिष्ठ संबंध असल्याचे प्रमेय बायडेन मांडतात आणि जबाबदार अर्थनीतीतून सुनिश्चित पर्यावरणीय उद्दिष्टांपर्यंत जाताना मध्यमवर्गासाठी रोजगारनिर्मितीचेही लक्ष्य गाठता येईल, अशी ग्वाही देतात. कोणत्याही कट्टर पर्यावरणवाद्याच्या तोंडी शोभतील असे हे बोल; पण ते जेव्हा अमेरिकेच्या भावी राष्ट्राध्यक्षाच्या तोंडी अवतरतात तेव्हा त्यामागे हजारो अब्ज डॉलरच्या गुंतवणुकीचे पाठबळ अपेक्षित असते.  स्वच्छ, हरित ऊर्जेच्या निर्माणासाठी १० वर्षांत ४०० अब्ज डॉलरच्या गुंतवणुकीचा संकल्प सोडतात आणि त्यादरम्यान पवन ऊर्जेवर भर दिला जाईल असे स्पष्टपणे सांगतात. आपल्या देशाच्या १०० टक्के ऊर्जाविषयक गरजा स्वच्छ स्रोतांतून भागवण्याचे उद्दिष्ट २०३५ पर्यंत गाठता येईल, असा आत्मविश्वास बायडेन यांना वाटतो.

ट्रम्प यांच्या एकंदर कारभारात दिसणाऱ्या बेजबाबदार, उथळपणाच्या पार्श्वभूमीवर बायडेन यांचा कार्यकाळ दिलासादायक ठरेल, असे जगभरातील पर्यावरणवाद्यांना वाटतेय ते त्यांच्या पूर्वपीठीकेमुळेच. अर्थात बायडेन यांनी अमेरिकेच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर एका रात्रीत चक्रे उलटी फिरू लागतील, अशी अपेक्षा कुणी करू नये. केवळ एकटी अमेरिका बदलली म्हणून लगोलग जग बदलेल असे होणार  नाही. चीनसारखी महासत्ताही आजच्या ट्रम्पकालीन अमेरिकेचाच प्रच्छन्न कित्ता गिरवत वातावरण बदलाच्या प्रक्रियेत आपले योगदान देत आलेली आहे. अनेक प्रगत देशांनी त्यांच्या पर्यावरणीय उत्तरदायित्वाकडे सोईस्कर दुर्लक्ष केलेले असून, गरिब देश तर आपल्या विपन्नावस्थेचे कारण सांगत याबाबतची आपली जबाबदारी नाकारताना दिसतात. अशा स्थितीत अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर जो बायडेन यांच्याकडे पर्यावरणीय अग्रदूताची भूमिका येण्याची चिन्हे दिसत आहेत. ठाम पर्यावरणीय धारणा असलेल्या या कृतिशील नेत्याच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या कार्यकाळात अमेरिकेचे आणि जगाचेही पर्यावरण धोरण जबाबदार व कृतिशील बनेल, अशी अपेक्षा बाळगण्यास हरकत नाही.

Web Title: Biden and the environment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.