काँग्रेस पक्षाला बालेकिल्लयात मोठे धक्के
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2019 12:18 PM2019-10-02T12:18:36+5:302019-10-02T12:19:33+5:30
विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला मोठे धक्के बसत आहे
मिलिंद कुलकर्णी
विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला मोठे धक्के बसत आहे. मातब्बर नेते पक्ष सोडत असल्याने पक्षाची स्थिती वाईट झाली आहे. ही परिस्थिती सावरण्यासाठी पक्षश्रेष्ठी आणि पदाधिकारी काही प्रयत्न करताना दिसत नाही, हे त्याहून मोठे दुर्देव आहे. पक्षाची वाताहत होताना उघड्या डोळ्याने सारे हे पहात आहे, यापेक्षा वाईट ते काय असणार आहे.
जळगाव जिल्ह्यात काँग्रेस पक्षाची स्थिती १९९९ पासून बिघडायला सुरुवात झाली. राष्टÑवादी काँग्रेस पक्षाची स्थापना होताच जिल्ह्यातील सर्व दिग्गज नेते काँग्रेस सोडून गेले होते. स्व.प्रा.व्ही.जी.पाटील यांनी पक्षाची धुरा सांभाळली होती. परंतु, त्यांना पक्षीय नेत्यांकडून आणि श्रेष्ठींकडून अपेक्षित सहकार्य न मिळाल्याने पक्षाची वाताहत होत गेली. १९९९ ते २०१४ पर्यंत काँग्रेस पक्ष राज्यात सत्तेत होता तर २००४ ते २०१४ केंद्रात सत्तेत होता. मात्र याचा लाभ जिल्ह्यात पक्षाला फारसा झाला नाही. प्रतिभाताई पाटील यांना राज्यपालपद आणि राष्टÑपतीपद सोडले तर अन्य नेत्यांना पक्षाने बळ दिले असे काही घडले नाही. परिणामी पक्ष कमकुवत होत गेला. पक्षाचा आमदार गेल्या १५ वर्षांपासून जिल्ह्यात निवडून आलेला नाही. (रावेरचे शिरीष चौधरी हे अपक्ष आमदार म्हणून २००९ मध्ये निवडून आले होते.) जळगावसारख्या जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी नगरसेवक निवडून येत नाही, अशी अवस्था झालेली आहे.
लोकसभा निवडणुकीत डॉ.उल्हास पाटील यांच्या प्रयत्नाने रावेरची जागा राष्टÑवादीकडून पक्षाने खेचून आणली आणि लक्षणीय मते त्यांनी मिळविली. उमेदवार आणि कार्यकर्ते एकदिलाने काम केल्यास सन्मानजनक स्थितीत पक्ष येऊ शकतो, हे या निवडणुकीत दिसून आले. परंतु, विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्यास दोन दिवस शिल्लक असताना पक्षाने रावेर वगळता कोणताही उमेदवार जाहीर केलेला नाही. कोणत्या जागा पक्षाला आलेल्या आहेत, हे देखील अद्याप जाहीर झालेले नाही. पक्ष विरोधात असतानाही एवढे वेळकाढू धोरण राहिले तर कशी यशाची अपेक्षा केली जाऊ शकते?
धुळे जिल्ह्यात काँग्रेसचे तीन आमदार असल्याने परिस्थिती चांगली असतानाही लोकसभा निवडणुकीत सलग तीन लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसचा पराभव झाला. जिल्हा परिषद, पंचायत समिती, साक्री, शिरपूर या पालिका काँग्रेसच्या ताब्यात असतानाही ही स्थिती उद्भवली. अमरीशभाई पटेल व कुणाल पाटील हे दोघे उमेदवार म्हणजे अँकर व जवाहर गटाचे सूत्रधार असताना हा पराभव झाला. पक्षश्रेष्ठींनी पक्षातील अंतर्गत वाद, नेत्यांमधील मतभेद व मनभेद मिटविण्यासाठी प्रयत्न करायला हवे होते, परंतु हे घडलेले नाही. त्यामुळे आमदार अमरीशभाई पटेल यांच्यासारखा दिग्गज नेता पक्ष सोडत आहे. त्यांच्यासोबत जि.प.चे माजी अध्यक्ष शिवाजी दहिते, आमदार काशीराम पावरा हे भाजपमध्ये गेले आहेत.
दोन आमदारांनी पक्ष सोडल्याच्या घटनेने काँग्रेसमध्ये भूकंप होणे स्वाभाविक होते. त्यामुळे धुळे ग्रामीण मतदारसंघातील आमदार कुणाल पाटील यांच्या उमेदवारीची केवळ घोषणा झाली. साक्री आणि शिरपूरच्या उमेदवाराची घोषणा अद्याप प्रलंबित आहे.
धुळ्यापाठोपाठ नंदुरबारातही भूकंप झाला आहे. तेथेही पक्षाचे तीन आमदार असताना परिस्थिती बिकट झाली. विद्यमान विधान परिषद सदस्य व जिल्हाध्यक्ष चंद्रकांत रघुवंशी यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. बुधवारी ते शिवसेनेत प्रवेश करतील. त्यांच्यासोबत नंदुरबार पालिकेसह तालुक्यातील सर्व संस्थांचे पदाधिकारी सेनेत जाणार आहेत. त्यापूर्वी माजी केंद्रीय मंत्री माणिकराव गावीत यांनी पक्ष सोडला. याचा परिणाम विधानसभा निवडणुकीत पक्षावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ज्येष्ठ नेते सुरुपसिंग नाईक यांना या वयात आता पक्षाची धुरा आणि वारसदाराची प्रस्थापना करण्यासाठी रणांगणात उतरावे लागणार आहे. लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले अॅड.के.सी.पाडवी यांना पक्षाने कोअर कमिटीत स्थान दिले आहे आणि प्रवक्तेपददेखील दिले आहे. त्यांनाही आता नंदुरबारमध्ये लक्ष घालावे लागणार आहे. पक्षाची आणखी पडझड टाळण्यासाठी पक्षश्रेष्ठींनी प्रयत्न करण्याची गरज आहे.
खान्देशात प्रथमच काँग्रेस संकटात आल्याचे चित्र निर्माण झाले आहे. एका जुन्या राष्टÑीय पक्षाची ही वाताहत लोकशाहीच्यादृष्टीनेदेखील दुर्देवाची म्हणावी लागेल.