छडी लागे छम छम !
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2018 12:11 PM2018-08-10T12:11:44+5:302018-08-10T12:12:31+5:30
मिलिंद कुलकर्णी
एका शाळेतील पर्यवेक्षकांची भेट झाली. अंगावरील (सक्तीचे) ब्लेझर सांभाळत त्यांची धावपळ सुरु होती. त्यात संस्थेचे अध्यक्ष येणार म्हटल्यावर प्रवेशद्वारावर स्वागतासाठी जाण्यासाठी लगबग सुरु झाली. तेवढ्यात एक पालक आले. विद्यार्थ्याला शिक्षकांनी मारल्याची तक्रार करु लागले. पर्यवेक्षकांनी त्यांना तातडीने खुर्ची दिली. शिपयाला बोलावून पाणी मागविले. अहो, तुमचा पाल्य फार गोंधळ घालत होता. इतर विद्यार्थ्यांना त्रास देत होता. म्हणून शिक्षकाने केवळ चापट मारली. मी माहिती घेतली, शिक्षक व इतर विद्यार्थ्यांकडून. तुम्ही पाल्याला थोडं समजून सांगा. व्रात्य आहे हो, शेजारी बसणाऱ्या विद्यार्थ्यांच्याही तक्रारी आहे, त्याच्याविषयी... पर्यवेक्षकाचे बोलणे पूर्ण होऊ न देताच पालकांनी बाजू मांडायला सुरुवात केली, असं शक्यच नाही. माझा मुलगा अगदी सज्जन आहे. चांगल्या वळणाचा आहे. घरी, गल्लीत कुणी त्याची तक्रार कधी करीत नाही. शाळेतच असे का होते? त्याला शाळेत वाईट संगत आहे काय हो? शिक्षक लक्ष कसे देत नाही? आम्ही मागे तुकडी बदल करण्याची मागणी केली होती, ती ही तुम्ही मान्य केली नाही. आता चक्क मारता, बरं नाही हो हे!
पर्यवेक्षक आणि पालकाचा संवाद ऐकून मला बालपण आठवले. शिक्षक आणि पालकांच्या भूमिकेत काळानुसार किती बदल झाला आहे नाही ? पालक शिक्षक संघाला आता कायदेशीर अधिकार प्राप्त झाले असल्याने पालक जागरुक झाले आहेत. पूर्वी पालक विद्यार्थ्यांना शिक्षकांच्या हवाली करुन द्यायचे. गुरुजी...सर, पोराला तुमच्या हवाली करतोय, वेडंवाकडं वागला तर हाणा त्याला. चकार शब्द बोलणार नाही, असे पालक पाल्यासमोरच शिक्षकाला सांगायचे. असे सांगितल्याने जसे शिक्षक हातातल्या छडीचा कधी मुक्त हस्ताने वापर करताना दिसले नाही, तसे मुलांना पालकांपेक्षा शिक्षकच आपले तारणहार आहे, हे लक्षात आल्याने ते मर्यादेबाहेर कधी गेले नाही. पूर्वी कधी पालक शिक्षक संघाच्या सभा फारशा व्हायच्या नाही. त्यामुळे पालकांना शाळेत बोलावणे आले की, समजायचे पाल्याने मोठा घोळ करुन ठेवलेला दिसतोय. त्याची चर्चाही मोठी व्हायची. शिक्षकांविषयी आदरयुक्त भीती असायची. त्यांनी दिलेले मूल्यशिक्षणाचे धडे, अपयश आल्यास केलेला उपदेश, युक्तीच्या चार गोष्टी अजून स्मरणात असतात. शिक्षकांविषयी ऋण व्यक्त केले जाते.
अलिकडे समाजमाध्यमांमुळे दहावीच्या विद्यार्थ्यांच्या एकत्रिकरणाचे कार्यक्रम मोठ्या उत्साहात होऊ लागले आहेत. शाळेला आवर्जून भेट दिली जाते. शाळेला साहित्यविषयक किंवा आर्थिक मदतीची विचारणा केली जाते. शिक्षकांना अशा एकत्रिकरणाला बोलावून त्यांचा सत्कार केला जातो. हा त्या काळात शैक्षणिक परिसरात असलेल्या खेळीमेळीच्या, निकोप वातावरणाचा परिपाक आहे.
एका निवृत्त शिक्षकाशी या बदलत्या परिस्थितीविषयी चर्चा करत असताना त्यांनी नेमकेपणाने विश्लेषण केले. पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंबपध्दती होती. ‘हम दो, हमारा एक’ असे नव्हते. घरात एकूण ८-१० मुले असायची. एकमेकांची पाठ्यपुस्तके, गणवेश वापरले जात असत. मुले कोणत्या इयत्तेत शिकत आहे, हे देखील काही पालकांना माहिती नसायचे. पण आता परिस्थिती बदलली आहे. विभक्त कुटुंबे आहेत. नवरा-बायको दोन्ही नोकरी करतात. एकुलत्या एका अपत्यावर लक्ष केंद्रित केले जाते. अकारण अपेक्षांचे ओझे लादले जाते. परिस्थितीमुळे आम्हाला अमूक करता आले नाही, पण तुझ्यासाठी आम्ही काहीही करु. तू आमचे स्वप्न पूर्ण कर, असे भावनिक त्रांगडे तयार होऊन बसते. मुलांची क्षमता, कल हे लक्षात न घेताच, त्याला साचेबध्द घडविण्याचा प्रयत्न अंगलट येऊ लागला की, मग पालकांची चिडचीड सुरु होते. मग त्याचा दोष आधी पालक एकमेकांवर फोडतात. त्यानंतर शिक्षक, माध्यम, शाळा, समाज, एकंदर परिस्थिती अशा प्रत्येक घटकाला बोल लावले जातात. हे सगळे काय आताच घडले आहे काय, पूर्वीपासून तसेच आहे. आपण बदललो आहोत, हे लक्षात घेतले जात नसल्याने सगळा घोळ आहे. इतके छान आणि तर्कशुध्द विवेचन ऐकून सगळाच उलगडा झाला.
पर्यवेक्षकांची अजीजी, पालकाचा त्रागा या सगळ्याकडे मग मी तटस्थपणे बघू लागलो...