छोट्या शहरांत मोठे भविष्य!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2020 05:09 AM2020-10-10T05:09:24+5:302020-10-10T05:09:51+5:30
छोटी शहरे आणि खेड्यांना ऊर्जितावस्था हवी
- डॉ. भारत झुनझुनवाला, आर्थिक विषयाचे तज्ज्ञ
एखादी वस्तू खेड्यात उत्पादित होणार की शहरात हे दळणवळणाच्या सोयींवर ठरते हे वास्तव आहे. हे सोदाहरण दाखवता येईल. ग्रामीण भागात खाल्ला जाणारा तांदूळ तिथल्याच भात गिरण्यात तयार होतो; पण शहरात खपणारा तांदूळ जवळपासच्या मोठ्या भातगिरण्यात तयार होतो. तांदूळ खेड्यातून या गिरण्यांपर्यंत वाहून न्यावा लागतो. खेड्याताल्याच गिरण्यात तांदुळावर प्रक्रिया करून तो शहरात नेता येऊ शकतो किंवा शहराजवळच्या गिरण्यात नेऊन प्रक्रिया झालेला तांदूळ शहरात पुरवता येतो.
खेड्यातच पिकलेला तांदूळ तिथेच पुरवायचा असेल तर छोटी गिरणी पुरते. छोट्या गिरणीत तांदुळावर प्रक्रिया करण्याचा खर्च जास्त पडतो. शिवाय तांदुळाची गुणवत्ताही चांगली नसते. भाताची तुसेही वाया जातात. हे लक्षात घेऊन धंदेवाईक माणूस तांदूळ शहरातल्या मोठ्या गिरणीत नेणे पसंत करतो. याच्या उलट साखर कारखाने ग्रामीण भागातच काढले जातात. कारण एक किलो साखर उत्पादन करायला १० किलो ऊस लागतो. शहराजवळच्या कारखान्यात दहापट ऊस न्यायला खूपच जास्त खर्च येईल. लांबच्या कारखान्यात ऊस नेऊन तयार झालेली १ किलो साखर लगतच्या शहराकडे न्यायला तुलनेने अधिक खर्च येतो. ऊस आणि साखर अशा दोन्हींच्या वाहतुकीवर होणारा एकत्रित खर्च कारखाना गावाकडेच असेल तर कमी होतो. यामुळेच आपण पाहतो की भात गिरण्या शहराजवळ आणि साखर कारखाने गावाकडे असतात. कृषी उत्पादनावर अवलंबून असणारे कारखानेच फक्त ग्रामीण भागात काढणे परवडते. याचा अर्थ एक प्रकारे वाहतूक तंत्रज्ञानामुळे ग्रामीण भागाचे नुकसान झाले आहे.
शेतीतून जे जादाचे उत्पन्न निघेल त्यातूनच उद्योगात मुख्यत्वेकरून गुंतवणूक करावी असे चाळीसच्या दशकात तत्कालीन नेत्यांनी बॉँबे प्लॅनमध्ये सांगितले. यातून दोन पर्याय निघाले. एक तर जादाचे उत्पन्न उद्योगात गुंतवताना आपल्याला खेड्यांचे शोषण करावे लागेल म्हणजे परकी गुंतवणुकीपासून मुक्तता होईल. दुसरे म्हणजे आपले आर्थिक सार्वभौमत्व जागतिक भांडवलाच्या चरणी अर्पण करून ग्रामीण विकासावर भर देता येईल.
मोठ्या शहरांवर भर देण्यापेक्षा छोटी शहरे विकसित करणे हा एक मधला मार्ग निघतो. मोठ्या शहरात वीज, पाणी, बससेवा पुरवण्यापेक्षा याला जास्त खर्च येणार तरी ग्रामीण भागात या सेवा देणे अधिक महाग होते.
वीस वर्षांपूर्वी मला राजस्थान सरकारची काही कागदपत्रे पाहता आली. त्यात असे म्हटले होते की, ग्रामीण भागात नळपाणी पुरवणे शहरी भागाच्या दहा पट खर्चिक आहे. छोट्या शहरात हेच पाणी पुरवण्यासाठी शहराच्या फक्त दुप्पट खर्च येईल.
छोट्या शहरातून संगीत, कॉल सेन्टर्स, आॅनलाइन ट्युटोरियल्स, अनुवाद अशा सेवा घेता येतील. प्रदूषणमुक्त वातावरणासारख्या गुणवत्तापूर्ण राहणीमानाची उपलब्धता येथे असेल. राहिवाशात चांगला संवाद असेल. छोट्या ठिकाणी भाजीविक्रेता नावाने ओळखला जातो. प्रगत देशात याच कारणांनी मुख्य शहरातून उपनगरात मोठी येजा होते. मुळात शेती फार उत्पन्न देत नाही. मात्र नेदरलँड ट्युलिप्स पिकवतो, फ्रान्समध्ये उत्तम प्रतीची द्राक्षे तर इटलीत आॅलीव होतात, या सगळ्याला आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळते. छोटी शहरे आणि खेड्यांना ऊर्जितावस्था देण्याचा मार्ग म्हणजे केरळसारख्या राज्यात मिरी, कुलूत सफरचंदावर संशोधनाची व्यवस्था करणे. उत्तर प्रदेशच्या छुटमलपूरमधून खूप भाजीपाला येतो, तो आसपास पिकलेला असतो. अशा छोट्या गावातूनच गुलाब, ग्लॅडिओलासारखी फुले येतात. ही छोटी शहरे विकसित केली पाहिजेत.