बिहारी रणधुमाळी

By admin | Published: August 13, 2015 05:08 AM2015-08-13T05:08:35+5:302015-08-13T05:08:35+5:30

नरेंद्र मोदी ज्या ‘विकासा’च्या लाटेवर स्वार होऊन पंतप्रधानपदावर जाऊन बसले, ती लाट कायम राहील, असा कारभार जर त्यांच्या हातून झाला असता, तर गेल्या आठवड्यात बिहारमधील गया

Bihari Rindhoomali | बिहारी रणधुमाळी

बिहारी रणधुमाळी

Next

नरेंद्र मोदी ज्या ‘विकासा’च्या लाटेवर स्वार होऊन पंतप्रधानपदावर जाऊन बसले, ती लाट कायम राहील, असा कारभार जर त्यांच्या हातून झाला असता, तर गेल्या आठवड्यात बिहारमधील गया येथे झालेल्या सभेत त्यांना ‘जगल राज’चा जुनाच राग आळवावा लागला नसता. ‘विकासा’चा मुद्दा निष्प्रभ ठरणार, याची जाणीव असल्याने, लालूप्रसाद-नितीशकुमार यांच्या हातमिळवणीवर हल्ला करण्याविना दुसरा मुद्दाच मोदी यांच्यापाशी उरलेला नाही. बिहारमधील राजकीय गुंतागुंत इतकी की, या ‘जंगल राज’च्या विरोधात भाजपा आणि आज मुख्यमंत्री असलेले जनता दल (संयुक्त)चे नेते नीतीशकुमार हे एकत्र आले होते आणि २००५ साली त्यांनी सत्ता काबीज केली होती. याच नितीशकुमार यांनी गेल्या १० वर्षांत हे ‘जंगल राज’ बहुतांशी संपवले आणि ‘बिमारू’ राज्यांच्या यादीतून बिहारला बाहेर काढले. तेव्हा भाजपाने त्यांना साथ दिली. किंबहुना नितीशकुमार यांची साथ नसती, तर बिहारमध्ये भाजपाला सत्तेच्या जवळ जाता येणे शक्य नव्हते. याचे महत्वाचे कारण म्हणजे बिहारमधील जातीच्या राजकारणाचा तिढा. तो सोडविण्यासाठी गरज असते, ती सत्तेच्या राजकारणातील जातींचे महत्व व त्यांच्या आशा-आकांक्षा समजून घेण्याची आणि त्यानुसार ज्या जातींची मोट एकत्र बांधायची आहे, त्यांना भावणारा चेहरा प्रचाराच्या अग्रस्थानी असेल, अशी व्यूहरचना करण्याची. बिहारमधील सत्तेच्या राजकारणाचा अलीकडच्या काळातील इतिहास हा ओबीसींच्या वर्चस्वाचा आणि त्यांनी इतर जातींना सोबत घेत उभ्या केलेल्या सत्तेच्या चौकटीचा आहे. एकेकाळी उच्चवर्णीयांच्या बळावर आणि दलित व मुस्लिम यांना जोडीला घेऊन काँगे्रसने उत्तर भारतात जे जातीचे समीकरण बसवले होते, ते ऐंशीच्या दशकापासून निष्प्रभ होत गेले आणि हे ओबीसी वर्चस्वाचे पर्व सुरू झाले. लालूप्रसाद यादव यांंचा उदय, त्यांनी बसवत नेलेले स्वत:चे बस्तान आणि नंतर त्यांचे निर्माण झालेले वर्चस्व हा याच राजकीय प्रक्रि येचा भाग होता. लालूप्रसाद यांनी यादवांच्या जोडीला कुर्मी, कोयरी इत्यादी दुय्यम स्तरांवरचे ओबीसी गट आणि दलित व मुस्लिमांची मोट यशस्वीपणे बांधली होती. पण सत्तेने उतून मातून जाऊन त्यांनी ही मोट स्वत:च्या हाताने उद्ध्वस्त करून टाकली. त्यामुळे आधी एकत्र असलेले नितीशकुमार, शरद यादव प्रभृती लालूप्रसाद यांच्या विरोधात गेले आणि सत्ता हस्तगत करण्यासाठी त्यांनी भाजपाची मदत घेतली. भाजपाला पाठबळ देणारा समाजघटक हा मुख्यत: उच्चवर्णीयांचाच असल्याने अशी साथ त्या पक्षाला हवीच होती. त्यातूनच हे उच्चवर्णीय व ओबीसीतील यादवांपैकी काही गट व इतर दुय्यम ओबीसी गट एकत्र आले आणि नितीशकुमार यांनी दलित, अतिमागास दलित, मुस्लिम यांनाही साद घातली. हे जातीचे समीकरण राजकीयदृष्ट्या वरचढ ठरले आणि मग ‘जंगल राज’ बहुतांशी संपवण्यासाठी सत्ता नितीशकुमार यांच्या हाती आली. आज हेच नितीशकुमार भाजपाच्या विरोधात उभे आहेत आणि त्यांनी लालूप्रसाद यादव यांच्याशी हातमिळवणी केली आहे. अशी अदलाबदल घडण्यास कारणीभूत ठरले, ते नरेंद्र मोदी. सत्ता मिळविण्यासाठी भाजपाने वाजपेयी नावाचा मुखवटा घालून राष्ट्रीय लोकशाही आघाडी स्थापन केली आणि जे पक्ष काँगे्रस विरोधात होते, त्यांना साथीला घेतले. त्यात लालूप्रसाद यांच्याशी वितुष्ट आल्याने जनता दलातून फुटून निघालेला जॉर्ज फर्नांडिस, शरद यादव, न्नितीशकुमार इत्यादींचा गटही होता. मात्र या पूर्वाश्रमीच्या समाजवाद्यांचा कट्टर हिंदुत्वाला विरोध होता व आहे. पण सत्तेसाठी भाजपाशी सोयरीक करायला त्यांची ना नव्हती. फक्त अट होती, ती कट्टर हिंदुत्व मागे ठेवण्याची. समाजवाद्यांच्या या संधीसाधूपणाचा फायदा घेऊन वाजपेयी यांनी ते केले. नंतर सत्तेसाठी अडवाणीही ते करायला तयार झाले. पण सत्ता हाती येईना. तेव्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भाजपाला नवा ‘विकासा’चा मुखवटा चढवण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी मोदी यांच्या ‘गुजरात मॉडेल’चा उपयोग करण्याचे ठरले. तेथेच वाद उद्भवला आणि मोदी असतील, तर आम्ही आघाडीत नाही, अशी भूमिका जनता दल (संयुक्त)ने घेतली. त्यामुळे भाजपा व नितीशकुमार याच्यात राजकीय फारकत झाली. पुन्हा एकदा जातींचे समीकरण जमवायचे, तर भाजपामुळे मिळणाऱ्या उच्चवर्णीयांच्या पाठिंब्याला पर्याय म्हणून यादवांचे जे गट लालूप्रसद यांच्या मागे आहेत, त्यांचे पाठबळ मिळवणे नितीशकुमार यांना गरजेचे बनले. त्यातून नितीशकुमार, लालूप्रसाद आणि आता काँगे्रस अशी आघाडी झाली आहे. अशावेळी खरे तर लोकसभा निवडणुकीत अतिशय प्रभावीपणे वापरलेला विकासाचा मुद्दा लावून धरत, हे जातीचे समीकरण निष्प्रभ करणे मोदी यांना अशक्य नव्हते. त्यांनी गया येथे झालेल्या सभेत ‘जंगल राज’चा राग आळवला व त्याला उत्तर म्हणून नीतिशकुमार ‘बिहारी अस्मिते’चा नारा देत आहेत. अशा रीतीने बिहारच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकून रणधुमाळीला सुरूवात झाली आहे.

Web Title: Bihari Rindhoomali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.