यह तो बिहार है भाई!
By admin | Published: October 10, 2015 05:31 AM2015-10-10T05:31:35+5:302015-10-10T05:31:35+5:30
असं म्हणतात की, गुजरात ही भाजपा आणि संघ परिवाराची प्रयोगशाळा आहे. असेल किंवा नसेलही. पण लोकशाहीच्या नावाखालील वाट्टेल ते प्रयोग जिथे चालतात, चालू शकतात
असं म्हणतात की, गुजरात ही भाजपा आणि संघ परिवाराची प्रयोगशाळा आहे. असेल किंवा नसेलही. पण लोकशाहीच्या नावाखालील वाट्टेल ते प्रयोग जिथे चालतात, चालू शकतात आणि चालवून घेतलेही जातात अशी, इतक्या मोठ्या अवजड देशातली एकमात्र प्रयोगशाळा बनण्याचा मान मात्र केवळ बिहारकडेच! या राज्यात गुंड सरकार बनवितात आणि मोडतात. तुरुंगात राहूनही अविरोध निवडून येतात. मतदारही त्यांना आपुलकीने आणि प्रेमाने निवडून देतात. पत्नी, मुलगा आणि मुलगी सोडले तर इथल्या राजकारणात अन्य कुणीही विश्वासपात्र मानले जात नाही. नेत्यांचा थोरला मुलगा नंतर तर धाकला त्याच्या आधी जन्माला येऊ शकतो आणि इथले राजकारणी मोठ्या आवडीने जनावरांचा चारादेखील खाऊ शकतात. स्वत:च्या राज्याइतकेच किंबहुना त्याच्याहीपेक्षा कांकणभर अधिकच आणि मनस्वी प्रेम करणारे लोकदेखील याच राज्यात आढळून येतात आणि म्हणूनच मग ते जिथे जातील तिथे ‘नवबिहार’ निर्माण करतात. आज या घडीलाही त्या राज्यात नवा किंवा नवे प्रयोग सुरु आहेत. पण त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे अन्य प्रयोगांसारखे ते रटाळ आणि रुक्ष नसून मोठे करमणूकप्रधान आहेत. अतिशयोक्ती, अतिरंजीतपणा आणि कल्पनातीतता या कोणत्याही करमणुकीच्या कार्यक्रमासाठीच्या अत्यंत आवश्यक अशा मूलभूत बाबी वा पूर्वशर्ती. त्यामुळे सध्या तिथे विधानसभेच्या निवडणुकीचा जो हंगामा सुरु आहे, तो सुरु होण्यापूर्वी अशीच एक कल्पनातीत बाब तिथे घडवून आणली गेली. ती म्हणजे लालूप्रसाद यादवांचे आणि नितीशकुमारांचे सहचर्य. (उभयता त्या राज्याचे अनुक्रमे माजी आणि आजी मुख्यमंत्री आहेत, हे वाचक जाणतातच) त्यांना जोड मिळाली नुसत्या नावापुरत्याच मुलायम असलेल्या बाजूच्या राज्यातील आणखी एका यादवाची. तीन तिघाडा होऊ नये असा विचार करुनच की काय मग त्यांनी काँग्रेस आणि तिचेच राष्ट्रवादी नावाचे एक पोटकलमही सोबत घेतले. (की काँग्रेसच त्यांना चिकटली?) हा सारा खटाटोप कशासाठी तर नरेन्द्र मोदीरुपे उधळलेल्या भाजपाच्या अश्वमेधी अश्वाला काबूत आणण्यासाठी. लक्ष्य ठरले आणि लक्ष्यपूर्तीची मंत्रणाही निश्चित झाली. पण कुठेतरी काहीतरी बिनसले. आधी राष्ट्रवादी आणि नंतर समाजवादी म्हणजे मुलायम पार्टी काडीमोड घेऊन बाहेर पडले. का तर म्हणे त्यांच्या तोंडावर केवळ एका हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्याच जागा फेकल्या गेल्या. सात्विक संताप म्हणून काही असतो की नाही? आधीच्या पाचामुखी परमेश्वराच्या महाआघाडीत केवळ तीन तोंडे उरली. पण त्यातील एक लालंूचे एकट्याचे तोंड साऱ्यांना भारी पडणारे असल्याने तशी चिंता नव्हती. ते किती भारी पडणारे आहे वा पडू शकते याचा अंदाज अंमळ विलंबाने का होईना काँग्रेसलाही आला आणि मग काँग्रेसच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षांनी लालूंच्या समवेत जाहीर प्रचार करायचा नाही असा निर्णय घेऊन टाकला. एक तर बिचाऱ्या काँग्रेसला तिथे काही स्थान नाही. लालू-नितीश ओबीसींच्या गडावर त्यांचा हक्क आधीपासूनच सांगून बसलेले. रामविलास पासवान यांच्या रुपाने दलित आणि जीतनराम मांझी यांच्या रुपाने महादलित अगोदरच शत्रूच्या म्हणजे रालोआच्या म्हणजेच भाजपाच्या म्हणजेच मोदींच्या गटात जाऊन बसलेले. म्हणजे काँग्रेसला आधार म्हणजे संघाकडे न झुकलेल्या उच्चवर्णियांचा. (लालूंसोबत चारा खाल्लेल्या डॉ.जगन्नाथ मिश्र यांच्यामुळे तोही कितपत टिकून ही एक शंकाच) पण लालू आपले रात्रंदिवस उच्चवर्णियांच्या विरोधात तोफा डागत बसलेले. तेव्हां आहे त्यापेक्षा आणखी वाईट स्थिती होऊ नये म्हणून काँग्रेसने लालूबहिष्कारास्त्र उपसले. पण लालूंवर त्याचा परिणाम शून्य. आपण जे काही बोलतो त्याकडे लोक केवळ एक करमणूक म्हणून पाहतात हे विसरुन आपल्या प्रत्येक हुच्चगिरीतून आपला मताधार वाढतो असा समज ते करुन बसले. याच हुच्चेगिरीतून त्यांनी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांना चक्क नरमांसभक्षक अशी उपाधी बहाल करुन टाकली. त्यावरुन त्यांच्याविरुद्ध म्हणे गुन्हाही दाखल झाला आहे. पण गुन्हे, खटले, शिक्षा यांची मातब्बरी इतरांनी बाळगावी, लालूंनी थोडीच. त्यामुळे त्यांनी आणखी एक वाग्बाण सोडताना हिन्दूदेखील गोमांसभक्षक असल्याचे विधान केले! अरेरे, यदूवंशी म्हणून थेट त्या गोपाल कृष्णाशी नाते सांगणाऱ्या लालूंचे इतके का बरे पतन व्हावे? हे विधान मात्र अंगलट आले. उच्चवर्णीय सोडाच पण समस्त ओबीसी वर्गदेखील नाराज झाला. मग लालूंच्या नावे एक विधान माध्यमांनी प्रसिद्ध केले. ‘मेरे मुँहसे शैतान ने बीफवाली बात बुलवाई थी’! पण आपण तसे काही बोललोच नाही असे ते म्हणतात. आता तर थेट लालू आणि नितीश यांच्यातही बेबनाव आकारास येऊ लागला आहे. नितीश त्यांच्या पाच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळातील प्रगतीच्या आधारे मते मागू इच्छितात पण त्याला लालूंचा विरोध आहे कारण या पाच वर्षातील मोठा काळ नितीश यांचा जनता दल आणि भाजपा यांची सत्तेसाठीची युती होती. म्हणजे प्रचार नितीश यांचा पण लाभ भाजपाला ही भीती लालूंच्या मनात आहे. तरीही वाचकहो, कृपा करुन फसू नका. हे सारे बिहारच्या कल्याणासाठी सुरु आहे. ‘शायद इसी को बिहार मे विकास की राजनीती कहते है’!