बाइक टॅक्सी : परवानगी दिली, तर तोल जाईल का?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2023 08:48 AM2023-07-25T08:48:06+5:302023-07-25T08:48:17+5:30

तांत्रिकदृष्ट्या बाइक हे प्रवासी वाहतुकीचे साधन मानले जात नाही; पण काही नियम सक्तीचे करून हा प्रयोग करायला काय हरकत आहे?

Bike Taxi : If Allowed, Will It Be Balanced? | बाइक टॅक्सी : परवानगी दिली, तर तोल जाईल का?

बाइक टॅक्सी : परवानगी दिली, तर तोल जाईल का?

googlenewsNext

- डॉ. एस. एस. मंठा, माजी अध्यक्ष, भारतीय तंत्रशिक्षण परिषद

ब्राझील, चीन, कंबोडिया आणि मेक्सिको यांसारख्या देशात बाइक टॅक्सी हे वाहतुकीचे लोकप्रिय साधन मानले जाते. आपल्याकडेही ते  लोकप्रिय झाले आहे. परंतु अलीकडेच सर्वोच्च न्यायालयाने एका आदेशान्वये दिल्ली उच्च न्यायालयाच्या एका आदेशाला स्थगिती दिली.
रॅपिडो, ओला आणि उबेर यांच्यासारख्या बाइक टॅक्सी उपलब्ध करून देणाऱ्या कंपन्यांना राजधानीच्या शहरात विनापरवाना बाइक टॅक्सी चालवण्याचा परवाना उच्च न्यायालयाने दिला होता. याआधी महाराष्ट्र, कर्नाटक या दोन राज्यांच्या सरकारांनी बाइक टॅक्सीवर बंदी आणली आहे; असे असले तरीही चेन्नईसारख्या शहरात महिलांनी चालविलेल्या बाइक टॅक्सीवर महिला प्रवाशांना प्रवास करण्यास मुभा आहे. चेन्नई मेट्रो रेल लिमिटेड आणि रॅपिडो यांनी प्रवाशांना त्यांच्या घरापर्यंत पोहचविण्यासाठी महिला बाइक टॅक्सी सेवा चालू केली.

तांत्रिकदृष्ट्या बाइक हे प्रवासी वाहतुकीचे साधन मानले जात नाही, कारण  बाइक चालवणाऱ्याच्या कौशल्यावर तिचा तोल न जाणे अवलंबून असते. टायर्सचे रस्त्याबरोबर होणारे घर्षण, त्यांचा आकार, स्थिती, वजन विभागले जाणे या सगळ्या गोष्टींवर बाइकचा तोल सांभाळला जाणे अवलंबून असते. यातून धडे कोणते घ्यावयाचे? तर बाइक उत्तम स्थितीत असलीच पाहिजे. तरच ती रस्त्यावर आणावी. चालवणाऱ्याचे कौशल्य चांगले असले पाहिजे;  रस्ते सुस्थितीत हवेत. सध्या या सगळ्या बाबतीत आपल्याकडे तसा आनंदच आहे! रस्त्यावरची इतर वाहने कशी चालतात यावर दुचाकी चालविणाऱ्याचे कौशल्य अवलंबून असते. अन्य वाहनांची गति, हालचाल लक्षात घेऊन त्याला बचावात्मकरीत्या मार्ग काढावा लागतो. त्यात भर म्हणजे रस्ते खोदलेले असतात, पावसाळ्यात तर अत्यंत वाईट स्थिती असते. या कारणांनी पावसाळ्याच्या दिवसात असंख्य माणसांना जीव गमवावा लागतो हे  आपण पाहत आलो. 

अशा परिस्थितीत बाइक टॅक्सीवर बंदी आणावी काय?  बंदीचे विरोधक म्हणतात, जास्त गर्दीच्या भागात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पोचत नाही, तिथे दुचाकीचा वापर करून पोहोचता येते. चालवणाऱ्याला या सेवेमुळे रोजगार उपलब्ध होतो.  स्थानिक अर्थव्यवस्थेला पाठबळ मिळते. दुचाक्या लहान असल्याने मोटारीपेक्षा त्या सहजपणे कुठेही चालवता येतात. वाहतूक खोळंब्यावर मात करण्यासाठी त्यांचा उपयोग होतो. विशेषत: शहरातील गर्दीच्या भागात हे अधिक जाणवते. अर्थातच सर्व प्रकारच्या वाहतूक साधनांमध्ये कोणता ना कोणता धोका असतोच; तसा बाइक टॅक्सीमध्येही असणार. परंतु रस्त्यावर चालणाऱ्या इतर वाहनांपेक्षा बाइकचा प्रवास हा जास्त असुरक्षित असतो हे येथे लक्षात घेतले पाहिजे. 

यातून मार्ग कसा काढणार? एकतर वाहन चालविणाऱ्यांना योग्य ते प्रशिक्षण दिले पाहिजे. त्या चालविण्याचा पुरेसा अनुभव त्यांच्याकडे असला पाहिजे. त्यांनी हेल्मेट वापरले पाहिजे. वाहतूक नियम पाळले पाहिजे. बाइक टॅक्सीवर एकदम बंदी घालण्याऐवजी योग्य ती नियंत्रणे आणून तसेच सुरक्षिततेचे उपाय अवलंबायला लावून यातील धोका कमी करता येईल हा एक पर्याय होऊ शकतो काय? त्यामध्ये दुचाकी चालवणाऱ्याला प्रवासी वाहतुकीचा परवाना असणे, सुरक्षिततेची साधने  वापरणे सक्तीचे असणे, वाहनाची देखभाल नियमितपणे करणे, इत्यादी गोष्टींचा त्यात समावेश करता येईल. दुचाकी चालवणारा आणि त्यामागचा प्रवासी यांचा समावेशक असा विमा असलाच पाहिजे. त्याचबरोबर वाहन कोठे आहे हे शोधणे, एसओएस बटन्स तसेच सुरक्षेची उपकरणे वापरणे या गोष्टीही पाळाव्या लागतील. ही सेवा देणाऱ्यांनी चालकाची ओळख बाळगणे, वाहन कुठून कुठे चालले आहे यावर लक्ष ठेवणे आणि आणीबाणीच्या परिस्थितीत मदत उपलब्ध करून देणे या गोष्टी केल्या पाहिजेत.

जर उपरोल्लेखित उपाय कायद्याने बंधनकारक केले गेले नाहीत आणि त्याची काटेकोर अंमलबजावणी केली गेली नाही तर बाइक टॅक्सीवर बंदी चालू ठेवणे हाच अधिक योग्य पर्याय ठरेल.
    

Web Title: Bike Taxi : If Allowed, Will It Be Balanced?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.