विशेष लेख: बिल गेट्स म्हणतात, आता ‘घरी’च बसायची वेळ!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2025 09:27 IST2025-04-04T09:21:40+5:302025-04-04T09:27:04+5:30
Bill Gates: बिल गेट्स त्यांच्या मते लोकांनी किती तास काम करावं, करावं की नाही, कामाचा आठवडा किती दिवसांचा असावा, कोणाची किती तास काम करण्याची तयारी आहे, Bill Gates: यापेक्षाही तुमच्या हातात काम आहे का, असेल का आणि किती वेगानं काम तुमच्या हातातून निसटतं आहे, याचा विचार करण्याची ही वेळ आहे.

विशेष लेख: बिल गेट्स म्हणतात, आता ‘घरी’च बसायची वेळ!
गेल्या वर्षी नारायण मूर्ती यांनी तरुणांनी आठवड्याला किमान ७० तास काम करावं, असा सल्ला दिला होता. त्यावरून खूप मोठं वादळं उठलं होतं; पण हे वादळ शमत नाही तोच लार्सन ॲण्ड टुब्रोचे चेअरमन एस. एन. सुब्रमनियन यांनी तर शनिवारी आणि रविवारीसुद्धा काम करताना आठवड्याला ९० तास काम करण्याची अपेक्षा व्यक्त केली होती.
यावरुन संपूर्ण जगभरात अनेक दावे-प्रतिदावे, मत-मतांतरे व्यक्त करण्यात आली होती, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या होत्या.
दोन्ही बाजू खऱ्या, बरोबर आहेत, असं आपण वादासाठी काही वेळ मान्य करू; पण मुख्य प्रश्न आहे, इतके तास काम करण्यासाठी यापुढील काळात काम तरी असेल का? कामासाठी पाच दिवसांचा आठवडा करा, चार दिवसांचा आठवडा करा, अशा मागण्याही वारंवार होत असतात; पण अपेक्षा आणि वास्तव यात कायमच खूप अंतर असतं. मायक्रोसॉफ्टचे चेअरमन बिल गेट्स यांनी नेमकं यावरच बोट ठेवलं आहे. त्यांचं म्हणणं आहे, तुम्ही लाख म्हणाल, जास्त वेळ काम करा, ज्यांची जास्त तास काम करण्याची तयारी आहे, तेही म्हणतील, आम्हाला काहीच अडचण नाही; पण प्रत्यक्षात येत्या भविष्यकाळात तेवढं कामच राहणार नाही असा काही तज्ज्ञांचा होरा आहे. त्यात बिल गेट्स अग्रक्रमावर आहेत. त्यांचं म्हणणं आहे, आठवड्याचे ९० तास जाऊ द्या, शनिवार, रविवार काम करण्याची अपेक्षा जाऊ द्या, आठवड्याचे ७० तास बाजूला ठेवा, प्रत्यक्षात आठवड्यात तीन दिवसांचं काम तरी तुमच्याकडे असेल का, राहील का हा महत्त्वाचा प्रश्न आहे. आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (एआय) सगळ्याच कामांचा फन्ना पाडतं आहे, झपाट्यानं नोकऱ्या कमी होताहेत, लोकांच्या हातातला रोजगार जातो आहे, दिवसेंदिवस त्यात वाढच होणार आहे; पण अगदी नजीकच्या भविष्यात म्हणजे जास्तीत जास्त दहा वर्षांच्या आत अशी परिस्थिती येईल की लोकांकडे आडवड्यातून दोन दिवसांपेक्षा जास्त कामच असणार नाही!
अलीकडेच बिल गेट्स यांनी म्हटलं होतं, सध्या तरी तीनच कामं अशी आहेत, ज्यांना एआयपासून धोका नाही. त्यात कोडर्स (कोडिंगचं काम करणारे) जीवशास्त्रज्ञ आणि ऊर्जातज्ज्ञ यांच्यापर्यंत अजून एआय पुरेशा वेगानं पोहोचलेलं नाही, त्यामुळे या क्षेत्रात काम करणाऱ्यांना त्यातल्या त्यात कमी धोका आहे, असं त्यांनी म्हटलं होतं; पण आता तर त्यांचं म्हणणं आहे, संपूर्ण जगभरात अनेकांच्या हाताला आता कामच राहणार नाही, त्यामुळे सगळ्यांना भविष्याचा आताच विचार करावा लागणार आहे.
त्यांच्या मते लोकांनी किती तास काम करावं, करावं की नाही, कामाचा आठवडा किती दिवसांचा असावा, कोणाची किती तास काम करण्याची तयारी आहे, यापेक्षाही तुमच्या हातात काम आहे का, असेल का आणि किती वेगानं काम तुमच्या हातातून निसटतं आहे, याचा विचार करण्याची ही वेळ आहे.
बिल गेट्स यांचं म्हणणं आहे, येत्या काळात माणसांची गरज अत्यंत वेगानं कमी होत जाईल. त्याचा सगळ्यात मोठा आणि सर्वांत पहिला परिणाम होईल तो आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रावर. एआयमुळे या क्षेत्रात आमूलाग्र बदल होईल. एआयला आपण नाकारू शकत नाही; पण त्याच्याच माध्यमातून जास्तीत जास्त हातांना आणि ‘डोक्याला’ काम कसं देता येईल हे पाहण्याची गरज आहे.