धार्मिक बंधने, संस्कृतीतून साकारलेली जैवविविधता, निसर्गाचे संवर्धन

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2019 04:10 AM2019-04-23T04:10:47+5:302019-04-23T04:13:00+5:30

निसर्ग साधनसंपत्तीचा वापर मोठ्या प्रमाणात व्यापारीकरणासाठी होऊन नैसर्गिक संपदा धोक्यात येऊ लागली आणि जैव विविधतेचा व्यापार सुरू झाला.

Biodiversity and conservation of nature through Religious restrictions and culture | धार्मिक बंधने, संस्कृतीतून साकारलेली जैवविविधता, निसर्गाचे संवर्धन

धार्मिक बंधने, संस्कृतीतून साकारलेली जैवविविधता, निसर्गाचे संवर्धन

googlenewsNext

- डॉ. महेश गायकवाड 

आजच्या निसर्ग संवर्धनासाठी अनेक लोकांनी मोलाचे प्रयत्न केल्याचे दिसून येते, यात अगदी रामायण काळापासून ते आजच्या पिढीपर्यंत निसर्ग संवर्धन विविध प्रकारे केल्याचे काळानुसार दिसून येते. अलीकडील ५०० वर्षांपासून म्हणजे मोघल काळापासून ते ब्रिटिश काळापर्यंत अनेक नैसर्गिक प्राणी आणि वनस्पतींचे व्यापारीकरण झाल्याचे दिसून येते. अर्थात याच काळात निसर्ग साधनसंपत्तीचा वापर मोठ्या प्रमाणात व्यापारीकरणासाठी होऊन नैसर्गिक संपदा धोक्यात येऊ लागली आणि जैव विविधतेचा व्यापार सुरू झाला.



मात्र अधिवासी संस्कृती, रामायण काळात, बुद्धकालीन, जैनकालीन संस्कृतीत नैसर्गिक संपदा जतन केल्याचे मोठ्या प्रमाणात पाहावयास मिळते. यात प्रत्येक वनस्पती, प्राणी, जमीन, जंगल, पाणी, पर्वत यांना देवाचे स्थान दिले असल्यामुळे ही नैसर्गिक संपत्ती वाचविता आली हे विशेष. अगदी आपण ५०-६० हजार वर्षांपूर्वीचा विचार केल्यास त्या काळातील मानवाने देवराईच्या नावाने अनेक ठिकाणी वने राखून ठेवली आहेत : भारतातील महाराष्ट्र, झारखंड, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश या राज्यांसह जवळपास १ लाखापेक्षा जास्त देवराई संरक्षित होत्या, मात्र अलीकडे आपल्या विकासाच्या नादात बहुतांश नष्ट होत आहेत. बहुतांश लोकांनी किंवा समूहाने अशा देवराया नष्ट करून त्या ठिकाणी कारखानदारी सुरू केली, हे दुर्दैव. तळी, झरे पाणवठे, पर्वत अशी ठिकाणेसुद्धा संरक्षित केल्याच्या नोंदी आहेत. तुळस आणि मोहाची झाडेसुद्धा तोडायची नाहीत अशी धार्मिक बंधनेही पूर्वीच्या लोकांनी घातली होती.



अगदी ५ ते ६ हजार वर्षांपूर्वीपासून आपल्या पूर्वजांनी शेतीचा शोध लावला आणि खरी जंगलतोड सुरू झाली. विविध मसाल्याच्या पदार्थांचा मानवी जीवनात वापर होऊ लागला. शिवाय अनेक वन्यप्राणी पाळीव करण्याची पद्धत सुरू झाली. तसेच शेतीमधील पिकांची विविधता वाढीस लागली. सुमारे २६०० वर्षांपूर्वी सिंधू नदीच्या किनारी मानवी लोकसंख्या वाढीस लागली. साधारणपणे १००० ते ६०० वर्षांपूर्वी आर्य लोकांचा कालखंड सुरू आणि यात युद्धासाठी घोड्यांचा वापर होऊ लागला. याच काळात वेद, महाभारत आणि रामायण यातील अनेक काव्यांतून निसर्ग संवर्धनासाठी प्रयत्न सुरू झाल्याचे आढळते. याच काळात आर्य लोकांनी शेतीची लोखंडी अवजारे शोधण्यात यश मिळवले आणि शेती व मानवी जीवन यांचा विकास होत गेला.

अगदी ४०० वर्षांपूर्वी बौद्ध आणि जैन कालखंड सुरू झाला आणि निसर्ग संवर्धन चळवळ मोठ्या प्रमाणात सुरू झाली. त्या वेळचे त्यांचे विचार आजही उपयोगी येत आहेत. अगदी अभयारण्य ही संकल्पनेसहित जैवविविधता संवर्धन, अधिवास जतन अशा अनेक गोष्टी बौद्ध काळात उदयास आल्या की ज्याचा वापर आजही आपण निसर्ग संवर्धन प्रकल्पासाठी करीत आहोत. सम्राट अशोकाने बुद्धीसम आदर्श मानून शाकाहारी संस्कृतीला महत्त्व दिले आणि शिकार करण्यास बंदी घालण्यात आली.

इ.स.पूर्व ३०० वर्षांपूर्वी राजा चंद्रगुप्त मौर्य यांनी वन्यजीव आणि वनस्पतींची सूची तयार केली. शिवाय हत्तीची शिकार केल्यास मृत्युदंड शिक्षा देण्यात येत होती. १६ व्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या साम्राज्यात वृक्षतोड करू नये, जंगल वाचावे यासाठी आंबा, फणस यासारखी बहुपयोगी झाडे वाचविण्यासाठी आदेश काढून जनतेला पर्यावरण रक्षणाचा संदेश दिल्याचे आढळते. मात्र इंग्रजांनी आपल्या निसर्गाची प्रचंड हानी केल्याचे दिसून येते. पण त्यांनी आपल्या भूभागाचा खूप महत्त्वपूर्ण अभ्यास केल्याचे दिसून येते. त्यांनी केलेल्या नोंदी आपल्याला संशोधनासाठी उपयोगी येतील.



पक्षीतज्ज्ञ डॉ. सलीम अली यांनी बीएनएचएस या संस्थेमार्फत भारतात अनेक ठिकाणी पक्षी सर्वेक्षण करण्याचे काम केले आणि अनेक संस्थानांबरोबर काम करीत पक्षी संवर्धन चळवळ भारतभर राबविली. वन्यजीव आणि जंगल संरक्षण मोहीम राबविण्यात डॉ. सलीम अली यांच्याबरोबर अनेक जण होते. अगदी यात प्रकाश गोळे, अशद रहमानी, डॉ. एरीच भरुचा, भारत भूषण या सर्वांनी पक्षी संरक्षण, जैव विविधता संरक्षण आणि जनजागृतीपर खूप मोठे काम देशभर केल्याचे दिसून येते.

अलीकडच्या काळात मारुती चितमपल्लींनी अगदी सातत्याने ५० वर्षे जंगलात राहून जंगलातील अनेक निरीक्षणे जगासमोर मांडली आहेत. आपल्या नवीन पिढीला समजेल अशा सोप्या भाषेत त्यांचे लिखाण आज जगभर पसरले आहे. त्यांनी जंगलाचा शास्त्रीयदृष्ट्या केलेला अभ्यास आज आपल्याला वाचवू शकतो. गौतम बुद्ध ते मारुती चितमपल्ली यांच्यातील विचार साम्यच आहेत. जगाने या महान विचारांची ज्योत पुढे तेवत ठेवली तरच आपले जग तरू शकेल, अन्यथा विनाश अटळ आहे.

(लेखक निसर्ग जागरचे अध्यक्ष आहेत.)

Web Title: Biodiversity and conservation of nature through Religious restrictions and culture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Natureनिसर्ग