‘गोनीदां’ची जन्मशताब्दी

By admin | Published: January 6, 2016 11:16 PM2016-01-06T23:16:17+5:302016-01-06T23:16:17+5:30

मराठी साहित्यातील 'कलंदर फकीर' म्हणून ज्यांना साहित्य रसिक ओळखतात, मानतात ते दुर्गप्रेमी, सर्जनशील आणि प्रतिभासंपन्न व्यक्तिमत्त्व म्हणजे

Birthday of Gonyadan | ‘गोनीदां’ची जन्मशताब्दी

‘गोनीदां’ची जन्मशताब्दी

Next

मराठी साहित्यातील 'कलंदर फकीर' म्हणून ज्यांना साहित्य रसिक ओळखतात, मानतात ते दुर्गप्रेमी, सर्जनशील आणि प्रतिभासंपन्न व्यक्तिमत्त्व म्हणजे, गो. नी. दांडेकर अर्थात 'गोनीदा'! त्यांच्या प्रतिभा सामर्थ्यातून साकारलेल्या वाङ्मयवैभवाने मराठी साहित्यविश्वाच्या समृद्धतेत भर तर घातलीच पण शब्दांच्या अमृतस्पर्शातून इतिहासालाही जिवंत केले. शिवराय हा तर त्यांच्या जगण्याचा श्वास होता. अस्सल मराठी मातीतला हा माणूस गड, किल्ले, दरीखोरी आणि अनवट वाटांमध्येच रमला. ही अनुभवाची शिदोरी शब्दवैभव घेऊन कागदावर उतरली आणि त्यातून समृद्ध साहित्य प्रसवले. 'बिंदूची कथा' ही त्यांची पहिली कादंबरी. मग 'माचीवरला बुधा', 'पूर्णामायेची लेकरं','आम्ही भगीरथाचे पुत्र', 'मोगरा फुलला', 'पडघवली', 'शितू', 'पवनाकाठचा धोंडी', 'जैत रे जैत', 'मृण्मयी' अशा एकाहून एक सरस कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या. काही कादंबऱ्यांवर चित्रपटही निघाले. त्यांच्या अनेक साहित्यकृतींना पुरस्कार, सन्मानही लाभले. अशा या सारस्वताची मुलगी आपल्या वडिलांच्या प्रतिभेचा आणि सर्जनशीलतेचा वारसा घेऊनच आली. डॉ. वीणा देव या त्यांच्या कन्येने वडिलांची खरी संपत्ती जाणली. आपले पती प्रा. डॉ. विजय देव व सर्व कुटुंबियांसह हे सारे अक्षरधन कसोशीने जपण्याचा आणि जनमानसापर्यंत घेऊन जाण्याचा मन:पूर्वक प्रयत्न केला, हे खरोखर दुर्मीळ आहे. कुणालाही हेवा वाटावा इतक्या आत्मीयतेने, जिव्हाळ््याने त्यांनी पित्याचे हे संचित जतन केले आहे. हे शब्दरुपी अमृतधन अधिकाधीक लोकांपर्यंत जावे म्हणून अभिवाचनाचे कार्यक्रम सुरू केले. गोनिदांवर प्रेम करणाऱ्या चोखंदळ व रसिक वाचकांनी या अभिनव प्रयोगाला डोक्यावर घेत भरभरून प्रतिसाद दिला. वडिलांचा साहित्यवारसा पुढे नेताना सांस्कृतिक आणि साहित्यविश्वात या दांपत्याने स्वत:ची एक स्वतंत्र ओळख आणि उंची प्राप्त केलेली आहे. हे दोघे मिळून गोनीदांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने त्यांची पुस्तके नव्या स्वरुपात आणत आहेत. वडिलांची ग्रंथसंपदा जतन करीत सांस्कृतिक व साहित्यवैभवात मोलाची भर घालणाऱ्या या दांपत्याच्या कृतज्ञ भावनेला सलाम!
'गाजवणे नको'; 'जागवणे' व्हावे
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे पडघम वाजू लागले असतानाच वादविवादांचाही डंका जोरात पिटला जाऊ लागला आहे. एका बाजूला साहित्यिकांनी इतरांचीही सामाजिक प्रतिष्ठा जपावी अशी आग्रही मागणी आहे तर दुसऱ्या बाजूला साहित्यिकांचाही मान राखला जावा अशी रास्त अपेक्षा आहे. परंतु साहित्य संमेलनात नुसचा वादांचा गजर न होता हा साहित्यविचारांचा जागर व्हावा ही खरी अपेक्षा आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रत्येकवेळी दंड थोपटून आमनेसामने उभे ठाकण्यापेक्षा सर्वांनीच चर्चेतून, संवादातून अधिक निकोप, निखळ व साहित्यविचारांसाठी पोषक वातावरण निर्माण करता येईल का हे पाहायला हवे. समाज आणि साहित्यिक या दोघांनीही त्याकडे अधिकाधीक समजूतदार आणि व्यापक भूमिकेतून पाहायला हवे. समाजाला अधिक सजग, संवेदनशील, समृद्ध करण्याचे काम साहित्यिक, कलावंत करतात. साहित्यिकही समाजाशिवाय अपूर्णच असतो. विरोधाची व आक्रमक विचारांची धार प्रसंगी तीव्र झाली तरीही संवाद, समन्वय आणि नंतर अटळ असला तरच संघर्ष अशा टप्प्यांनी पुढे जायला हवे. मराठी साहित्य विश्वातील सर्वात मोठ्या महोत्सवाला नुसते वादाचे रंग न चढता संवादाचे पदर उलगडावे व साहित्याचे चौफेर मंथन व्हावे. साहित्य संमेलन नुसते वादविवादांनी 'गाजवले' जाण्यापेक्षाही मराठी साहित्यविश्वाला दिशादर्शक ठरणाऱ्या नव्या विचारांनी 'जागवावे' ही माफक अपेक्षा आहे.
- विजय बाविस्कर

Web Title: Birthday of Gonyadan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.