बिटकॉइनचा भूलभुलैया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2018 04:48 AM2018-04-09T04:48:13+5:302018-04-09T04:48:13+5:30
पैशाच्या देवाणघेवाणीसाठी वापरले जाणारे माध्यम म्हणजे पैसा. सुवर्णमोहरा ते तांब्या-पितळेची नाणी, नोटांपासून ते चेक, बॉँडचे खरे रूप पैसाच.
पैशाच्या देवाणघेवाणीसाठी वापरले जाणारे माध्यम म्हणजे पैसा. सुवर्णमोहरा ते तांब्या-पितळेची नाणी, नोटांपासून ते चेक, बॉँडचे खरे रूप पैसाच. कौटिल्याच्या अर्थशास्त्रातही नाण्यांची विविध रूपे सांगितलेली असून, त्यातल्या रुप्यरूप या नाण्यावरूनच रुपया हा शब्द आला. वेगवेगळ्या धातूंनी नाणी बनविली जात; पण एकच पथ्य पाळणे आवश्यक असायचे, की नाण्याचे जे मूल्य राज्यव्यवस्थेने ठरविले आहे त्या धातूच्या तुकड्याचीही बाजारात तीच किंमत राहिली पाहिजे. महंमद तुघलक या राज्यकर्त्याने हे पथ्य पाळले नाही आणि दर्शनी मूल्य जास्त असलेली लोखंडाची नाणी सुरू केली. याचा फायदा घेऊन काहींनी स्वत:च्या टांकसाळी सुरू करून नाणी पाडली. त्यामुळे अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाली, असे इतिहास सांगतो. विनिमयाचे साधन म्हणून पैसा वापरताना त्याची रूपे काळानुसार नेहमीच बदलत गेली आहेत. राज्यसंस्थेने त्यावर कायमच अंकुश ठेवण्याचा प्रयत्न केला; परंतु तो यशस्वी होऊ शकला नाही. सध्या चर्चेत असलेले बिटकॉइन हेदेखील पैशाचे असेच एक रूप. येथे तर धातूही नाही. ही एक व्हर्च्युअल करन्सी आहे. कागदोपत्री कोणतेही व्यवहार न करता एक खास अॅप डाऊनलोड करून त्याद्वारे खात्यातले पैसे वर्ग केल्यास बिटकॉइन खरेदी अथवा विक्रीही करता येते. हे सगळे व्यवहार आॅनलाइन चालतात. एका ब्लॉकचेन नेटवर्कवर असलेल्या दोन व्यक्तींमध्ये ते होतात. यामुळे त्यावर इतर कुणाचे, अगदी सरकारचेही नियंत्रण नसते. हीच त्याची ताकद ठरली. विशिष्ट संख्येचीच बिटकॉइन उपलब्ध असल्याचे सांगितले गेल्याने किमतीत प्रचंड वाढ झाली. दहा-वीस पट नफा मिळू लागला. अमिताभ बच्चन यांना ११० कोटी रुपये नफा झाल्याचे वृत्त झळकले. अनेकांनी लाखो रुपये कमावल्याच्या कहाण्या प्रसृत झाल्या; पण त्यातही अनेकांचा मोह सुटला नाही. भारद्वाज नावाच्या बंधूंनी गेनबिटकॉइन नावाची कंपनी स्थापन केली. तुमचे बिटकॉइन त्यांच्याकडे दिले, तर दरमहा ठरावीक रक्कम मिळण्याचे आश्वासन देण्यात आले. मात्र, यामध्ये हे समजले नाही, की आपल्याकडील किमती बिटकॉइन घेऊन एम कॅप हे नाणे दिले जात होते. त्याची किंमत अत्यंत किरकोळ झाली आहे. आभासी जगात पैशांचा आभास निर्माण करून फसवणुकीचे हे उदाहरण. विशेष म्हणजे, फसवणूक झालेल्यांपैकी बहुतेक जण सुशिक्षित आणि तंत्रस्नेही आहेत. पण पैशाची भूल पडली, की सारासार विवेक हरवतो. मग, ‘दुनिया झुकती है, झुकानेवाला चाहिए’ हीच म्हण खरी ठरते!