भाजप व भाजपेतर पक्षातील चढाओढी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 05:45 AM2019-04-12T05:45:55+5:302019-04-12T05:46:09+5:30
जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या सीमेवरील तिन्ही राज्यांत भाजपचे बऱ्यापैकी अस्तित्व आहे.
जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या सीमेवरील तिन्ही राज्यांत भाजपचे बऱ्यापैकी अस्तित्व आहे. भाजप जम्मू-काश्मीरमध्ये सत्ताधारी होते. तर हिमाचल व उत्तराखंडमध्ये सध्या भाजप सत्ताधारी आहे. या तिन्ही राज्यांत सतराव्या लोकसभेच्या पंधरा जागांसाठी चुरस आहे. जवळपास लोकसभेच्या तीन टक्के जागा या तीन राज्यांत आहेत. सोळाव्या लोकसभा निवडणुकीत भाजपला या तीन राज्यांत झुकते माप मिळाले होते. परंतु सध्या भाजपला विरोधी पक्ष चांगली लढत देत आहेत. सोळाव्या लोकसभा निवडणुकीप्रमाणे येथे भाजपेतर पक्षांचे पानिपत होणार नाही. निम्म्या जागांवर भाजपेतर पक्षांचे पुनरागमन होईल.
जम्मू-काश्मीर खोरे व लडाख या तीन भागांत मिळून सहा लोकसभेच्या जागा आहेत. जम्मू हिंंदूबहुल, काश्मीर खोरे मुस्लीमबहुल आणि लडाख बौद्धबहुल भाग आहे. या तिन्ही भागांमध्ये खुली स्पर्धा असते. एकूण तीन भागांत मुस्लीम बहुसंख्य असला तरी त्यांचे राजकारण वेगवेगळे आहे (६४ टक्के). जम्मू भागात कश्मीरियत ही संकल्पना सामाजिक सौहार्दवाचक आहे. या संकल्पनेच्या त्रिसूत्राचे राजकारण अटलबिहारी वाजपेयी यांनी घडवले होते (मानवता, लोकशाही व हिंंदू-मुस्लीम मैत्रीभाव). कश्मीरियत ही संकल्पना जम्हूरियेत आनिती या कमाल पाशा यांच्या विचारांशी सुसंगत संकल्पना आहे. ही संकल्पना लोकतंत्र, मानवतावाद आणि सामाजिक सलोख्यांचे प्रतीक आहे. ही एक सामाजिक जाणीव आहे. म्हणून कश्मीरियत ही संकल्पना शतकानुशतके सलोखावाचक अर्थाने राहिलेली आहे. या भागातील जम्मू-पुंछ, उधमपूर-डोडा या दोन मतदारसंघांवर भाजपचे नियंत्रण आहे. या दोन्ही मतदारसंघांत काँग्रेस व भाजप अशी दुरंगी स्पर्धा आहे. या भागात रजपूत डोग्रा समाज प्रभावशाली आहे. उधमपूरमध्ये रजपूत डोग्रा समाजात सत्ता स्पर्धा आहे. ही स्पर्धा काँग्रेस व भाजपपेक्षा रजपुतांच्या अंतर्गत जास्त आहे. या मतदारसंघात नेका, पीडीपीचा काँग्रेसला पाठिंंबा आहे. काँग्रेसने महाराजा हरिसिंंहांचा पणतू विक्रमादित्य सिंह यांना उमेदवारी दिली आहे. विक्रमादित्य हे काँग्रेसचे नेते कर्ण सिंहाचा मुलगा आहे. त्यांचा दुसरा मुलगा भाजपमध्ये आहे. जम्मू-पुंछमध्ये काँग्रेसचा उमेदवार रमन भल्ला हे आहेत. लडाखमध्ये एक जागा आहे. हा मतदारसंघ सर्वांत मोठा आहे. बौद्ध मते येथे निर्णायक आहेत. भाजपने गेल्या वेळी बौद्धांशी जुळवून घेतले होते. काश्मीर खोºयात तीन लोकसभा मतदारसंघ आहेत. अनंतनाग-पुलवामा, बारामुल्ला, श्रीनगर-बडगाम या तीन मतदारसंघांत मुस्लीम विरोधी मुस्लीम स्पर्धा आहे. त्यामुळे मुस्लीम समाजाची मतपेटी दोन गटांमध्ये विभागली जाते. नेका, काँग्रेस व पीडीपी अशी येथे आघाडी नाही. त्यामुळे येथे चौरंगी सत्तास्पर्धा आहे.
हिमाचल प्रदेश हे उच्च जातींच्या राजकारणासाठी प्रसिद्ध आहे. येथे चार लोकसभेच्या जागा आहेत (कांगडा-चंबा, मंडी, हमीरपूर, शिमला). यापैकी शिमला ही राखीव जागा आहे. हिमाचल प्रदेशचे राजकारण उच्च जातीसाठी लोकप्रिय आहे. काँग्रेसने कांगडा-चंबा येथे ओबीसी उमेदवार दिला आहे (पवन काजल). भाजपने येथे गद्दी समाजाचा उमेदवार दिला आहे. येथे चौधरी सरवण हे दोन वेळा ओबीसी नेता निवडून आले होते (१९८० व १९८४). चंद्रकुमार हे ओबीसी नेते निवडून आले होते (२००४). मंडीमध्ये काँग्रेसने आश्रय शर्मा यांना उमेदवारी दिली आहे. ते सुखराम यांचे नातू आहेत. त्यांचे वडील भाजपचे मंत्री आहेत. भाजपचे उमेदवार रामस्वरूप शर्मा आहेत. माकपने येथे उमेदवार उभा केला आहे. हमीरपूर येथे दोन्ही उमेदवार ठाकूर आहेत. अनुराग ठाकूर (भाजप) व रामलाल ठाकूर (काँग्रेस). दोन्ही ठाकूर राजपूत आहेत. शिमला मतदारसंघात धनीराम शांडिल (काँग्रेस) विरोधी सुरेश कश्यप (भाजप) अशी स्पर्धा आहे. पंडित सुखराम व वीरभद्र यांचे ऐक्य नव्याने झाले आहे. आम आदमी पक्षाने अपक्ष उमेदवारांना पाठिंंबा दिला आहे. या तपशिलाचा अर्थ म्हणजे राज्यात तिरंगी स्पर्धा आहे. भाजप सत्ताधारी पक्ष आहे. त्यामुळे भाजप राज्यात वरचढ आहे.
हिमाचलप्रमाणे उत्तराखंडात राजकारण उच्च जातींसाठी प्रसिद्ध आहे. कारण येथे ७५ टक्केसवर्ण मतदार आहेत. येथे पाच लोकसभेच्या जागा आहेत (नैनीताल, हरिद्वार, पौडी गढवाल, टिहरी गढवाल, अल्मोडा). भाजपने गेल्या वेळी पाच जागा जिंंकल्या होत्या. सतराव्या लोकसभेसाठी भाजप व काँग्रेस अशी दुरंगी तीव्र स्पर्धा आहे. नैनीतालमध्ये काँग्रेसने माजी मुख्यमंत्री हरीश रावत यांना उमेदवारी दिली आहे. भाजपपुढे मोठे आव्हान आहे (अजय भट्ट). हरिद्वार या मतदारसंघात डोंगरी विरोधी पठारी असा वाद आहे. काँग्रेसचे अंबरीश कुमार पठारी भागातील आहेत. रमेश पोखरियाल हे डोंगरी आहेत (भाजप). येथे ऊस उत्पादक शेतकरी व मुस्लीम (३० टक्के) हे घटक प्रभावी आहेत. येथे पाचवा धाम म्हणजे सैनिक धाम आहे. माजी सैनिकांचा निवडणुकीवर प्रभाव पडतो. पौडी गढवाल येथे माजी मुख्यमंत्री बी.सी. खंडुरीचा मुलगा मनिष खंडुरी उभा आहे (काँग्रेस). भाजपने येथे तीरथ सिंंह रावत उमेदवार दिला आहे. या मतदारसंघात संघाचे जाळे आहे. तसेच सैनिकांचे मतदान जवळपास एक लाख आहे. अल्मोडा मतदारसंघात रोटी हा मुख्य मुद्दा आहे. भाजपने अजय टम्टा व काँग्रेसने प्रदीप टम्टा उमेदवार दिले आहेत. या राज्यात बारा टक्केसैनिक आहेत. राष्टÑवादाचा मुद्दा आहे. परंतु काँग्रेसने उमेदवार प्रभावी दिले आहेत. त्यामुळे चढाओढ दिसते.
- प्रा. डॉ. प्रकाश पवार
राजकीय विश्लेषक