विजय जनतेचा उत्सव भाजपाचा!
By admin | Published: February 12, 2016 04:09 AM2016-02-12T04:09:55+5:302016-02-12T04:09:55+5:30
कोल्हापुरकरांच्या प्रखर आंदोलनामुळे राज्य सरकारला टोल रद्द करावा लागला. विजय खेचून आणला कोल्हापूरच्या जनतेने, मात्र उत्सव साजरा केला भाजपाने.
- वसंत भोसले
कोल्हापुरकरांच्या प्रखर आंदोलनामुळे राज्य सरकारला टोल रद्द करावा लागला. विजय खेचून आणला कोल्हापूरच्या जनतेने, मात्र उत्सव साजरा केला भाजपाने.
कोल्हापूर महापालिका क्षेत्रातील रस्त्यांचे काम खासगी क्षेत्राच्या सहभागातून पूर्ण झाले, मात्र या प्रकल्पाच्या प्रारंभापासूनच वाद सुरू झाला होता. महापालिका क्षेत्रातील रस्ते खासगीकरणातून नको, तसेच त्यासाठी पुढील तीस वर्षे शहरवासीयांना टोलचा भुर्दंड कशासाठी, असे सवाल उपस्थित करण्यात आले होते. कोल्हापूर महानगरपालिकेच्या सदस्यांचाही विरोध होता. मात्र त्यांच्या कारभाऱ्यांनी शहर सुधारणेच्या भव्यदिव्य कल्पनेनुसार हा प्रकल्प झालाच पाहिजे, अशी भूमिका घेतली. परिणामी, वाद वाढत गेला. रस्ते झाले, त्यात अनेक चुका आढळून आल्या. मात्र टोल सुरू होताच जनतेचा उद्रेक झाला. दररोज शहरात येण्यासाठी किंवा बाहेर जाण्यासाठी टोल ही कल्पनाच न पटणारी होती.
सामान्य जनतेच्या जोरावर सर्व पक्षांच्या कार्यकर्त्यांनी टोलविरोधी जोरदार आंदोलन केले. संपूर्ण महाराष्ट्रात टोलचे धोरण असताना कोल्हापूरकरांची मागणी चुकीची आहे, हा आडदांडपणा आहे, अशी हेटाळणीही झाली. ्नराज्यातील सत्तारुढ पक्षांच्या कारभाऱ्यांनी हीच भूमिका घेत टोल द्यावाच लागेल, अशी जेव्हा भूमिका मांडली तेव्हा मात्र कोल्हापूरकरांचा स्वाभिमान डिवचला गेला. काहीही करा, ‘टोल देणार नाही’ अशी आंदोलनाची घोषवाक्येच प्रत्येक वाहनावर दिसू लागली. तरीदेखील काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारच्या लक्षात ही गोष्ट आली नाही. या असंतोषाचा राजकीय लाभ उठवित भाजपा-शिवसेनेने आंदोलकांना भरपूर समर्थन दिले. विधानसभेच्या निवडणुकीत हा कळीचा मुद्दा ठरला, तेव्हाच भाजपाचे नेतृत्व करीत असलेले देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेवर येताच टोल रद्द करू असे जाहीर करून टाकले होते. काँग्रेसने धरसोडवृत्तीचे धोरण घेतले. राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार यांनी पुुन्हा सत्ता द्या, टोल घालवितो, असे वेळ निघून गेल्यावर सांगितले. तेव्हा कोल्हापुरात चेष्टेने म्हटले जात होते की, टोल भरतो पण तुमची सत्ता परत नको.
हा वाद राज्यात गाजत असला तरी कोल्हापूरच्या जनतेच्या स्वाभिमानाचा मुद्दा होता. या मुद्यावर जेव्हा कोल्हापूरचे आंदोलन जाते, तेव्हा त्या आंदोलनाचा पराभव होत नाही, हे आजवरच्या इतिहासावरून महाराष्ट्रातील जाणकार राज्यकर्त्यांना माहीत आहे. आज जो तोडगा काढून टोल रद्द केला गेला तो व्यावहारिक भाग होता. यापूर्वीच्या सरकारलाही ते करता आला असते, मात्र त्यांनी आडमुठेपणाचीच भूमिका घेतली. त्यामुळे हा विजय कोल्हापूरच्या सर्वसामान्य जनतेचा आहे. त्याचा उत्सव साजरा करून भाजपाने विजयी चौकार ठोकला. गेल्या रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नागरी सत्कार करण्यात आला. तेव्हा त्यांनाही हा विजय कोल्हापूरच्या जनतेचा आहे, म्हणून अर्पण करावा लागला. मात्र, भाजपाने ही संधी साधली. वास्तविक कोल्हापूर शहर किंवा जिल्ह्यात भाजपाची पक्षीय शक्ती चौथ्या क्रमांकाची आहे. त्यांचे टोलविरोधी आंदोलनातील योगदानही त्याच तोलामोलाचे होते. मात्र विजयी चषक हिरावून घेण्यात त्यांना यश आले. कारण राज्यात परिवर्तन झाले आहे आणि जाहीर आश्वासन दिले होते ते पूर्ण केले नसते, तर आगामी राजकारणातील भाजपाचे स्थान नगण्य राहिले असते. विजयश्री खेचून आणली कोल्हापूरच्या जनतेने, मात्र उत्सव साजरा करण्याची संधी भाजपाने साधली. तो नैसर्गिक तत्त्वानुसार त्यांना हक्कही पोहोचतो. कारण त्यांनी निर्णय घेण्याचे धाडस केले. त्याचा राजकीय लाभ राजकीय पक्ष म्हणून उठविण्यात काही गैर नाही, पण सर्व पक्षाच्या लोकाना सोबत घ्यायला हरकत नव्हती.
एकूणच काय तर कोल्हापुरकरांच्या टोलविरोधी आंदोलनामुळे राज्य सरकारला राज्याच्या टोल धोरणाचाच फेरविचार करणे भाग पडले. येथून पुढे होणाऱ्या रस्त्यावरील टोल नाक्यांवर सर्व प्रकारची चार चाकी वाहने टोलमुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केवळ जड वाहनांवरच टोल आकारणी केली जाणार आहे. त्याचबरोबर कोल्हापुरकरांच्या आंदोलनामुळे शहरांतर्गत रस्त्यांची बांधणी बीओटी तत्वावर करुन शहरातच टोल आकारणी करण्याचे धोरणही शासनाला बासनात गुंडाळून ठेवावे लागले आहे.