भाजपा श्रेष्ठी अस्वस्थ, मित्रपक्षाची विरोधात भूमिका; चिराग पासवान यांच्या मनात काय?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2024 07:33 AM2024-09-12T07:33:53+5:302024-09-12T07:37:14+5:30
सत्तारूढ आघाडीतील असा पाठिंबा देणारा त्यांचा एकमेव पक्ष होता.
हरीष गुप्ता, नॅशनल एडिटर, लोकमत, नवी दिल्ली
बांगलादेशमध्ये झालेली निदर्शने, उसळलेला हिंसाचार, त्यात झालेले मृत्यू या पार्श्वभूमीवर पंतप्रधान शेख हसीना यांना देश सोडणे भाग पडले. त्या अचानक आपल्या बहिणीसोबत भारतामध्ये उतरल्या. त्यांना ब्रिटनला जायचे होते; परंतु त्यात अडचणी उद्भवल्यामुळे त्यांचा भारतातला मुक्काम वाढला आहे. आता त्यांना परत पाठवा, जेणेकरून त्यांच्याविरुद्ध गुन्हेगारी स्वरूपाचे खटले भरता येतील, अशी मागणी वांगलादेशमधून जोर धरू लागली आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यात प्रत्यार्पण करार आहे. "भारतात शांततेत राहायचे असेल तर बोलणे बंद करा' असे बांगलादेशच्या नव्या पंतप्रधानांनी त्यांना सांगितले आहे.
यापूर्वी कुटुंबीयांचे हत्याकांड झाल्यानंतर हसीना भारताच्या आश्रयाला आल्या होत्या. वर्ष १९७५ मध्ये त्यांचे पिता शेख मुजीबुर रहमान यांची हत्या झाल्यावर पती, मुले आणि बहिणीसोबत हसीना भारतात आल्या होत्या. दिल्लीतील पंडारा रोडवर १९७५ ते १९८१ अशी सहा वर्षे वेगळे नाव धारण करून त्या राहिल्या; यावेळी मात्र गाझियाबादमधील हिंडन विश्रामगृहावर त्यांना थांवावे लागले. आता शेख हसीना दिल्लीत कुठे आहेत, हे कोणालाच माहीत नाही. यावेळी कुठल्याही सरकारी बंगल्यात न राहता ल्युटेन्स दिल्लीतील एका खासगी बंगल्यात त्यांचा मुक्काम असल्याचे कळते. बदललेल्या परिस्थितीत त्यांच्या जीवाला असलेला धोका लक्षात घेऊन याविषयी कमालीची गुप्तता पाळण्यात येत आहे.
अमित शाह यांची जादू
अविश्वसनीय वाटले, तरी बातमी खरी आहे, असे भाजपतील अंतस्थ सूत्रे सांगतात. अतिशय अस्वस्थ असलेले गृहमंत्री अमित शाह यांनी केंद्रीय अन्नप्रक्रिया मंत्री चिराग पासवान यांना त्यांच्या पक्षाच्या खासदारांसह तडकाफडकी आपल्या निवासस्थानी बोलावून घेतले. चिराग हे लोकजनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आहेत. चिराग यांनी जाहीरपणे केलेल्या काही वक्तव्यांमुळे भाजप श्रेष्ठी अस्वस्थ होते. वक्फ विधेयकाला विरोध करताना चिराग यांनी ते संसदीय समितीकडे पाठवावे, अशी मागणी केली. थेट पद्धतीने काही सरकारी पदे भरण्याच्या प्रस्तावालाही त्यांनी विरोध केला, जातीनिहाय जनगणना करण्याच्या मागणीला पाठिंबा दिला. अनुसूचित जाती जमातींच्या उपवर्गीकरणाविषयी सर्वोच्च न्यायालायाने दिलेल्या निकालाविरुद्ध पुकारण्यात आलेल्या 'भारत बंद'लाही त्यांनी पाठिंबा दिला. सत्तारूढ आघाडीतील असा पाठिंबा देणारा त्यांचा एकमेव पक्ष होता.
एवढे पुरेसे नव्हते म्हणून की काय, 'एनडीए'त जागावाटपाबाबत मतैक्य होणार नसेल तर झारखंड विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याचा इशाराही चिराग यांनी दिला. शाह २६ ऑगस्टला पशुपती पारस यांना भेटले होते. चिराग यांचे ते काका, मात्र दोघांमधून विस्तव जात नाही. या भेटीतूनच भाजपने चिराग यांना काय तो संदेश दिलाच होता. लोकसभा निवडणुकीच्या वेळी भाजपने पारस यांना बाजूला करून चिराग यांना जवळ केले. त्यांनी पाच जागा जिंकल्या. ३० ऑगस्टला चिराग पासवान त्यांच्या तीन खासदारांसह अमित शाह यांच्या निवासस्थानी पोहोचले. चिराग यांना एकट्याला आत बोलावण्यात आले. अगदी मोजक्या शब्दांत शाह यांनी त्यांना फैलावर घेतले असावे. चिराग यांना हा अनुभव नवा होता. 'चिराग एनडीएबाहेर जाऊ शकतात; पण त्यांचा कोणीही खासदार त्यांच्याबरोबर येणार नाही, हे त्यांनी लक्षात ठेवावे,' एवढेच शाह यांनी त्यांना बजावले म्हणतात. नंतर चिराग यांनी 'पीटीआय'शी बोलताना कोलांटउडी मारली. भाजपची तशी इच्छा असेल तर बिहारमधली विधानसभा निवडणूक 'एनडीए'चा घटकपक्ष म्हणून लढण्यास आपण तयार आहोत, असेही त्यांनी सांगून टाकले.
राहुल यांची गुगली
लागोपाठ दोनवेळा हरियाणात भाजपने सरकार स्थापन केले. त्यामुळे काँग्रेस पक्षातील मंडळी एक प्रकारे आराम करत होती. आता मात्र काँग्रेस नेतृत्वासाठी हरियाणात जिंकू किंवा मरू अशी स्थिती आहे. काँग्रेस नेतृत्वात यावेळी उत्साह संचारलेला असून भाजपला अँटी इन्कम्बन्सी त्रास देत आहे. पक्षांतर्गत बंडाळीनेही रान माजवले आहे. तिकीट वाटपाचा प्रश्न मुख्य समितीपुढे आला तेव्हा राहुल गांधी यांनी सांगितले की, १० पैकी काही जागा आप तसेच समाजवादी पक्षासाठी बाजूला ठेवाव्यात. या दोन्ही पक्षांचा राज्यात कुठेच प्रभाव नसल्यामुळे राहुल यांच्या सूचनेचे पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यालाही आश्चर्य वाटले. लोकसभा निवडणुकीत कुरुक्षेत्रची जागा 'आप'ला सोडण्यात आली होती; पण तेथे काही हाती लागले नाही. हे नेत्यांनी निदर्शनास आणून दिले. पक्षाने राज्यात पाच लोकसभा जागा जिंकल्यामुळे उत्साहाचे वातावरण असताना विधानसभा निवडणूक सहज खिशात टाकण्याचे मनसुबे पक्ष रंगवत आहे; परंतु राहुल गांधी यांच्या मनात दुसरेच काहीतरी चालले आहे. ते म्हणाले, मी काही काँग्रेसचा लोकसभेतील नेता नाही, तर विरोधी पक्षनेता आहे. इंडिया आघाडीतील सर्व पक्षांचे प्रतिनिधित्व माझ्याकडे आहे. भाजपचा पराभव करायचा असेल तर आपल्याला घटक पक्षांना बरोबर घ्यावेच लागेल! राहुल यांनी मित्रपक्षांना सुखावले असले तरी स्वपक्षीयांचा मात्र त्रिफळा उडवला आहे.