ठाकरी शालजाेडे!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2021 07:30 AM2021-06-21T07:30:36+5:302021-06-21T07:30:46+5:30

जाेड्यातून मारणे ही खरे तर ठाकरे कुटुंबीयांची पद्धत नाही. ते थेटच मारतात.

The BJP is deeply saddened by the loss of the most important state in the country like Maharashtra. | ठाकरी शालजाेडे!

ठाकरी शालजाेडे!

Next

जाेड्यातून मारणे ही खरे तर ठाकरे कुटुंबीयांची पद्धत नाही. ते थेटच मारतात. परिणामांची फिकीर करीत नाहीत. भाजपसारख्या पक्षाला त्याची सवय आहे. सुमारे तीन दशकांच्या राजकारणात भाजपने शिवसेनेबराेबर युती करून महाराष्ट्राने आपणास स्वीकारावे यासाठी आटाेकाट प्रयत्न केला. शिवसेना जाेडे काढून हाती घेणार असे समजताच प्रमाेद महाजन-गाेपीनाथ मुंडे धावत माताेश्रीवर पाेहोचत हाेते. ताेच भाजप आज शिवसेनेच्या आधारे महाराष्ट्रात सर्वात माेठा पक्ष बनल्याने, आम्ही ठरवू ते धाेरण अन्‌ बांधू ते ताेरण अशा अविर्भावात वावरत आहे. त्याला शिवसेनेने छेद दिल्याने त्यांचा जळफळाट हाेत आहे.

महाराष्ट्रासारखे देशातील सर्वात महत्त्वाचे राज्य आपल्या हातून गेले, याचे भाजपला फार माेठे दु:ख आहे. गेल्या तीस वर्षांचा मित्रवर्य आपल्याला सोडून गेला, हे तर भाजपला फार बाेचते आहे. यामुळेच तीन पक्षांची महाआघाडी करून स्थापन केलेल्या सरकारला कधी एकदा खाली खेचताेय आणि आपण सत्तेवर जाऊन बसताेय, अशी घाई देवेंद्र फडणवीस-चंद्रकांत पाटील यांना झाली आहे. त्यातच काँग्रेसने वेगळा सूर लावला आहे.

महाराष्ट्रासह अनेक राज्यांतील काँग्रेसचे संघटन खिळखिळे झाले आहे. अशा परिस्थितीत स्वबळाचा नारा विदर्भाच्या एका कोपऱ्यातील नेते नाना पटाेले कसे देत आहेत? त्यासाठी पक्षश्रेष्ठींची परवानगी घेतली आहे का? स्वबळावर काेणत्या निवडणुका लढविणार आहेत? त्या निवडणुका कधी हाेण्याची शक्यता आहे आदी सर्व प्रश्न उपस्थित हाेतात. हेच प्रश्न महाराष्ट्रातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी विचारले तर नाना पटाेले यांना टिळक भवनात बसून त्याची उत्तरे देता येणार नाहीत.

संघटना खिळखिळी झाली असताना, गमावलेले पहिल्या क्रमांकाचे स्थान मिळविण्यासाठी पक्षसंघटनेची बांधणी करण्याऐवजी स्वबळाचा नारा देत ते कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करीत आहेत. भाजप आणि मित्रपक्ष काँग्रेस सध्याच्या काेराेना प्रादुर्भावाच्या काळात करीत असलेल्या राजकारणाचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना स्टाइलने समाचार घेतला आहे. काेराेना महामारीच्या संकटाचा सामना करण्याऐवजी राजकारण करीत फिरू लागलो, तर जनता जाेड्याने हाणेल, हे त्यांचे प्रतिपादन स्पष्टपणे बाेलण्याच्या स्वभावानुसार याेग्यच आहे! वास्तविक काेराेनाच्या दुसऱ्या लाटेवेळी जनताच थाेडी बेशिस्त वागू लागली. राज्यकर्ते आणि लाेकप्रतिनिधींनी यावरून जनतेला ऐकवण्याची भाषा सुरू करायला हवी हाेती.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ती भाषा वापरायला सुरुवात केली आहे. त्यांच्यापुढे निर्बंध उठवा किंवा लाॅकडाऊन लावू नका, असे सांगायलादेखील शिष्टमंडळे जात नाहीत. हा आरोग्य आणि विज्ञानाशी निगडित विषय आहे. जे निकष निश्चित केले आहेत, त्या निकषांच्या आधारे निर्णय घेतले जाणार, कोणी विरोध केला तर मोडून काढला जाईल, असे त्यांनी स्पष्ट बजावले. राजकारण्यांनी नाही म्हणायला आणि नोकरशहांनी होय म्हणायला शिकले पाहिजे, असे महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण म्हणायचे. त्याची या दोघांच्या वक्तव्यावरून आठवण येते.

कोल्हापुरात आले होते तेव्हा अजित पवार यांचा सूर पाहूनच व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाने निर्बंध उठविण्याच्या मागणीच्या निवेदनाचा कागद खिशात ठेवून पळ काढला होता. उद्धव ठाकरे यांनी १९ जूनला शिवसेनेला पंचावन्न वर्षे झाल्याच्या निमित्ताने कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले, तेव्हा थेट जोड्यांची भाषा वापरली. काँग्रेसला थेटच सुनावले आणि भाजपला त्यांनी अप्रत्यक्ष शालजोडे मारत, ही राजकारण करायची वेळ नाही, हे स्पष्टपणे सांगितले आहे. ही भूमिका त्यांनी महाराष्ट्रातील जनतेला एखाद्या कुटुंबप्रमुखासारखी

सुरुवातीपासूनच सांगितली आहे. ‘आधी माणसांना जगवूया, मग अर्थव्यवस्था कशी उभी करायची ते पाहू’, ही त्यांची पहिली भूमिका होती. त्यावर आजही ते ठाम आहेत. राजकारण करण्याची ही वेळ नाही. आता एकच ध्येय आहे की, कोरोनाचा संसर्ग रोखण्याचे, असे सांगत त्यांनी गाव आणि शहरी भाग, प्रभाग येथे कोरोनामुक्तीचा कार्यक्रम राबविण्याचा आग्रह धरला आहे. महाराष्ट्रातील जनतेनेदेखील याला प्रतिसाद देण्याची गरज आहे.

राज्यात कोरोनाची गंभीर परिस्थिती असताना सरकार पाडण्याच्या गोष्टी करता? उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केलेला हा प्रश्न खरंच गंभीर आहे. काही ठिकाणी सहकारी संस्था तसेच स्थानिक संस्थांच्या निवडणुका घेण्याचा अट्टाहास चालू आहे. त्यावरही बंदी घातली पाहिजे. कोरोना संसर्ग लवकरात लवकर आटोक्यात आणला नाही तर समाजाचे अतोनात नुकसान होणार आहे. त्यासाठी जोड्यांच्या भाषेत सांगणे योग्यच आहे.

Web Title: The BJP is deeply saddened by the loss of the most important state in the country like Maharashtra.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.