भाजपाला इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2018 05:16 AM2018-06-01T05:16:50+5:302018-06-01T05:16:50+5:30
लोकसभा निवडणुकीला जेमतेम वर्ष उरले असताना झालेल्या चार लोकसभा आणि विधानसभांच्या ११ पोटनिवडणुकात मतदारांनी दिलेला कौल मोदी सरकार आणि सत्ताधारी भाजपाचे वारू जमिनीवर आणणारा आहे
लोकसभा निवडणुकीला जेमतेम वर्ष उरले असताना झालेल्या चार लोकसभा आणि विधानसभांच्या ११ पोटनिवडणुकात मतदारांनी दिलेला कौल मोदी सरकार आणि सत्ताधारी भाजपाचे वारू जमिनीवर आणणारा आहे. कर्नाटक पाठोपाठ आलेल्या या निकालाने देशाची राजकीय हवा सध्या कोणत्या दिशेने वाहत आहे, याचा अंदाज यावा. विशेषत: योगी आदित्यनाथांच्या उत्तर प्रदेशात लागोपाठ तीन पोटनिवडणुकांमध्ये बसलेला जबर फटका आणि महाराष्टÑातील भंडारा-गोंदियाची गमावलेली जागा भाजपाच्या धुरिणांची काळजी वाढविणारा आहे. फुलपूर आणि गोरखपूर पाठोपाठ कैराना मतदारसंघात झालेला पराभव योगी आणि त्यांना पाठिशी घालणाऱ्या संघाच्या धुरिणांना मोठा धक्का आहे. स्वत: मुख्यमंत्री योगींसह अर्धेअधिक मंत्रिमंडळ आणि केंद्रीय मंत्री कैरानात अक्षरश: तळ ठोकून होते. तरीही तेथील जनतेने अजितसिंह यांच्या राष्टÑीय लोकदलाच्या उमेदवाराला मोठ्या फरकाने विजयी केले. योगींना अतिआत्मविश्वास नडला, की लोकांना त्यांचा कारभार पसंत नाही? खरे तर या प्रश्नाचे उत्तर मोदी-शहांनी शोधायचे आहे. पालघरचा विजय मात्र त्यातल्या त्यात दिलासा देणारा आहे. शिवसेनेने तशी जोरदार टक्कर दिली. मात्र बहुजन विकास आघाडीच्या उमेदवाराने त्यांचे मनसुबे उधळून लावले. काँग्रेसने तर आपले हसेच करून घेतले. वास्तविक, भाजपाला रोखण्यासाठी काँग्रेसने पुढाकार घेऊन सर्वपक्षीय आघाडी उभी केली असती, अथवा सेनेने बविआच्या उमेदवारास पाठिंबा दिला असता, तर कदाचित यापेक्षा वेगळा निकाल हाती आला असता. पण निवडणुकीनंतर अशा जर-तरला काही अर्थ नसतो. शिवसेनेने या पराभवातून धडा घेऊन नव्या जोेमाने पुढच्या तयारीला लागण्याऐवजी निवडणूक यंत्रणांवर खापर फोडले. निवडणूक काळात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ज्या त्वेषाने भाजपावर तुटून पडले होते, ते बघता निकालानंतर सत्तेशी फारकत घेतील अशी अटकळ काहीनी बांधली होती. मात्र ठाकरे यांनी त्याबाबत चकार शब्दही उच्चारला नाही. सत्तेत राहून सत्ताधाºयांशी उभा दावा मांडण्याचा शिवसेनेचा प्रयत्न लोकांनीही आता समजून घेतला आहे. भंडारा-गोंदियात दोन्ही काँग्रेस एकत्र आल्याचा फायदा राष्टÑवादीचे मधुकर कुकडे यांना झाला. वास्तविक, सध्या काँग्रेसमध्ये आलेले नाना पटोले यांनी भाजपाकडून ही जागा जिंकली होती. पण पक्षात वितुष्ट आल्यामुळे त्यांनी राजीनामा दिल्याने ही पोटनिवडणूक झाली. या जागेवर त्यांचाही दावा होता. पण प्रफुल्ल पटेल यांनी यशस्वी शिष्टाई करून ही जागा आपल्या पक्षाकडे ठेवली. आजवरचा अनुभव लक्षात घेता, दोन्ही काँग्रेसचे नेते एकत्र आले तरी कार्यकर्त्यांची दुभंगलेली मने एक होत नाहीत. मात्र या ठिकाणी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम करून विजय खेचून आणला. समविचारी पक्षांनी आघाडी केली तर भाजपाचा पराभव शक्य आहे, हे या पोटनिवडणुकीतून दिसून आले. उत्तर प्रदेशातील नूरपूर, बिहारातील जोकीहाट, प. बंगालमधील महेशतला, कर्नाटक, पंजाब आणि मेघालयातील विधानसभांच्या जागा भाजपाविरोधी पक्षांनी जिंकल्या आहेत. बिहारमध्ये लालूप्रसाद यादव यांच्या राष्टÑीय जनता दलाने मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या उमेदवाराचा केलेला दारुण पराभव बिहारच्या राजकरणाची दिशा स्पष्ट करणारा आहे. बिहारला विशेष राज्याचा दर्जा मिळायला हवा, अशी मागणी नितीशकुमार यांनी नुकतीच केली आहे. या मागणीच्या आडून ते केंद्रावर दबाव आणू इच्छितात किंवा रालोआतून बाहेर पडण्याचा ते मार्ग शोधत असावेत असा कयास आहे. मेघालयाच्या आजच्या विजयाने काँग्रेस तिथे आता सर्वात मोठा पक्ष बनला आहे. पंजाबात अजून मुख्यमंत्री कॅप्टन अमरेंद्रसिंग यांची जादू कायम आहे. झारखंड मुक्ती मोर्चाने दोन जागा जिंकून आपण अजून शर्यतीत असल्याचे दाखवून दिले. या पोटनिवडणुकीने भाजपाला दिलेला इशारा खूप काही सांगून जातो.