सत्तेसाठी कायपण... गोपीनाथ मुंडेंना 'हरवून' भाजपा जिंकला!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2018 05:59 PM2018-09-28T17:59:37+5:302018-09-28T18:12:30+5:30
गोपीनाथ मुंडे यांनी ज्या कलानी यांना लक्ष्य केले व जे कलानी सध्या आपल्या रक्तरंजित राजकारणाकरिता तुरुंगाची हवा खात आहेत, त्यांचे पुत्र ओमी यांचा पाठिंबा घेऊन दीड-दोन वर्षांपूर्वी भाजपाने सत्ता स्थापन केली.
>> संदीप प्रधान
भारतीय जनता पार्टीने उल्हासनगरातील डॉन पप्पू कलानी याची सून पंचम यांच्या विजयाकरिता लावलेली फिल्डींग यशस्वी झाली आणि पंचम या उल्हासनगराच्या महापौर झाल्या. वरकरणी ही अत्यंत साधी, सोपी घटना वाटत असली तरी, राज्यातील सत्ताधारी भाजपा सत्तेमुळे आणि सत्तेसाठी काहीही करू शकतो, त्याचा हा ढळढळीत पुरावा आहे. भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी १९९० च्या दशकात 'राजकारणाच्या गुन्हेगारीकरणा'चा मुद्दा उपस्थित करुन शरद पवार यांना लक्ष्य केले होते. त्यावेळी पवार काँग्रेसमध्ये होते व केंद्रात संरक्षणमंत्री होते. त्यांनी आपले वारस म्हणून सुधाकरराव नाईक यांना मुख्यमंत्रीपदी बसवले होते. मात्र 'घार हिंडते आकाशी चित्त तिचे पिलापाशी', उक्तीप्रमाणे पंतप्रधानपदाची स्वप्ने पाहणाऱ्या पवारांचा जीव महाराष्ट्रात आणि बारामतीत घुटमळत होता. उल्हासनगरात पप्पू कलानी आणि वसई-विरारमध्ये डॉन भाई ठाकूर हे दोन पवार यांचे विश्वासू चेले होते. त्याच सुमारास जे. जे. इस्पितळात घुसून गोळीबाराची घटना घडली होती. त्याचे धागेदोरे भिवंडीपर्यंत जोडले गेले होते. या कटातील आरोपींचा मुक्काम उल्हासनगरातील एका रिसॉर्टमध्ये होता, अशी चर्चा होती. कलानी उल्हासनगरचे १९९० मध्ये महापौर झाले. दीर्घकाळ तेच या पदावर होते. या काळात उल्हासनगरात कलानी यांचा शब्द अंतिम होता. या काळात कलानी विरुद्ध अन्य पक्षांमध्ये झालेल्या संघर्षात घनश्याम भतिजा, इंदर भतिजा, रिपाइंचे मारुती जाधव, शिवसेनेचे गोपाळ राजवानी, दीपक वाधवानी, अशोक बोकळे, माधव ठाणगे, रमेश चव्हाण, बाला सुर्वे, महेंद्र सिंग, अण्णा शेट्टी, सेंच्युरी कंपनीचे कामगार नेते यादव अशा अनेकांच्या हत्या झाल्या. त्यामुळे मुंडे यांनी उचललेला राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाचा मुद्दा चांगलाच तापला.
त्याचवेळी दाऊद इब्राहिमच्या बेकायदा इमारतींविरुद्ध तत्कालीन महापालिका उपायुक्त गो. रा. खैरनार यांनी कारवाईचा हातोडा उचलला. मात्र ही कारवाई रोखण्यात आली. त्यामुळे खैरनार यांनी पवार यांच्या विरोधात रणशिंग फुंकले. खैरनार हे तमाम महाराष्ट्राचे हिरो झाले होते. मुंबईसह महाराष्ट्रात ठिकठिकाणी खैरनार यांच्या जाहीर सभा होत होत्या. त्यामध्ये खैरनार बोलायला उभे राहिले की, खच्चून भरलेली सभागृह शेम शेमच्या घोषणांनी दुमदुमून जायची. कोपरा न् कोपरा माणसांनी भरलेला असायचा. खैरनार यांच्या आरोपांनी मुंडे यांच्या संघर्षाला बळ लाभले. त्याच सुमारास पवार व सुधाकरराव नाईक यांच्यात कमालीचे वितुष्ट निर्माण झाले. त्यामुळे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असताना नाईक यांनी भर पत्रकार परिषदेत पप्पू कलानीला तुरुंगात मारु नका, असा आदेश पवार यांनी दिल्लीला जाण्यापूर्वी विमानतळावर दिल्याचा गौप्यस्फोट केला. पवार यांच्या उरल्यासुरल्या विश्वासार्हतेच्या ठिकऱ्या नाईक यांनी उडवल्या. हे कमी म्हणून की काय त्यावेळी संरक्षण दलाच्या विमानातून कुख्यात गुंड शर्मा बंधूंनी केलेल्या प्रवासाचे प्रकरण मुंडे यांनी उघड केले. हे शर्मा बंधू मुंबईचे तत्कालीन महापौर रा. रा. सिंह यांचे खास असल्याचा दावा केला गेला. मात्र ते आपले कुणी नसून तत्कालीन आमदार रमेश दुबे यांचे विश्वासू असल्याचा दावा सिंह यांनी केला. परस्परांवरील चिखलफेकीत शर्मा बंधूंच्या प्रवासाला पुष्टी मिळाली.
विलासराव देशमुख, बॅ. ए. आर. अंतुले, रामराव आदिक वगैरे मंडळींनी पवार यांच्या विरोधात उघड बंड केले होतेच. पण पवार यांचे विश्वासू सुधाकरराव नाईक हेही त्यांच्या विरोधात उभे ठाकले होते. या साऱ्या राजकारणामुळेच १९९५ साली राज्यात शिवसेना-भाजपा युतीची सत्ता आली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व शरद पवार हे वरकरणी परस्परांचे विरोधक असल्याचे दाखवत आले, पण त्यांच्यातील मैत्रीचे संदर्भ आजही दिले जातात. भाजपामधील प्रमोद महाजन हेही पवार यांचे चांगले मित्र होते. मात्र मुंडे यांनी पवार यांच्याशी खराखुरा संघर्ष केला. (राज्यात शिवसेना-भाजपा युतीची सत्ता असताना अशाच प्रकारे छगन भुजबळ यांनी शिवसेनेबरोबर संघर्ष केला होता. हा संघर्ष इतका टोकाला गेला की, भुजबळ यांनी बाळासाहेब ठाकरे यांना अटक केली.)
मुंडे यांनी ज्या कलानी यांना लक्ष्य केले व जे कलानी सध्या आपल्या रक्तरंजित राजकारणाकरिता तुरुंगाची हवा खात आहेत. (इंदर भतिजा खून प्रकरणात पप्पूला शिक्षा झाली आहे.) त्यांचे पुत्र ओमी यांचा पाठिंबा घेऊन दीड-दोन वर्षांपूर्वी भाजपाने सत्ता स्थापन केली. महापौरपदाची पहिली टर्म भाजपाच्या मीना आयलानी यांनी उपभोगली. त्यानंतर पंचम कलानी यांना महापौरपद देण्याचा वादा भाजपाने केला होता. मात्र साई पक्षाच्या फुटीर गटाच्या ज्योती भतिजा (घनश्याम भतिजा यांच्या सून) यांना शिवसेनेनी पुढे करून भाजपाला खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला. अर्थात तो फसला. खुद्द ओमी यांच्यावरही भाजपाचे पदाधिकारी शुक्रमणी यांच्या भाच्यावर हल्ला केल्याचा गुन्हा होता. मात्र भाजपाने त्यांना आपल्या छत्रछायेखाली घेताना हे गुन्हे मागे घेतले गेले. उल्हासनगर महापालिका ही आजही गुन्हेगारी व सर्व अनैतिक गोष्टींचा अड्डा आहे. या महापालिकेत नगररचनाकार असलेले संजीव करपे हे गेली दोन वर्षे बेपत्ता असून त्यांचा तपास लागलेला नाही. अनेक अधिकाऱ्यांवर लाचलुचपतीसह अनेक गंभीर आरोप आहेत. काही निलंबित आहेत. गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या राजकीय नेत्यांच्या कब्जात ही महापालिका आहे. म्हणजे गोपीनाथ मुंडे यांची राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाची लढाई लढण्याकरिता उल्हासनगरात वाव आहे.
मात्र ते दूरच राहिले आता भाजपाने पप्पू कलानी यांचा वारसा चालवणाऱ्यांना पोटाशी घेतले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुंडे गटाचे म्हणून ओळखले गेले. उल्हासनगरात भाजपाच्यावतीने जुळवाजुळवी करीत असलेले राज्यमंत्री रवींद्र चव्हाण हे सध्या फडणवीस यांच्या गोतावळ्यात आहेत. चव्हाण यांनी मुंडे यांचा संघर्ष जवळून पाहिला नसेल पण फडणवीस यांनी तो नक्की पाहिला आहे. त्यामुळे एका महापालिकेतील सत्ता गेली तरी बेहत्तर, पण ज्या संघर्षाच्या पायावर पक्ष उभा राहिला तो पाय उखडून टाकणार नाही, अशी भूमिका फडणवीस यांनी घ्यायला हवी होती. मात्र या साऱ्यांनीच मुंडे यांचे चांगले पांग फेडले. मुंडे आज हयात असते तर त्यांनी कलानी यांच्या विजयावर कोणती प्रतिक्रिया दिली असती? त्यामुळे उल्हासनगरात गोपीनाथ मुंडे मृत्यूपश्चात पराभूत झाले आणि भाजपा जिंकला, असेच या निकालाचे वर्णन करावे लागेल.