भाजपाला दिल्लीच्या तख्तावर बसायची घाई

By admin | Published: September 6, 2014 11:00 AM2014-09-06T11:00:34+5:302014-09-06T11:04:58+5:30

दिल्लीत भारतीय जनता पक्ष सरकार बनवणार असल्याची कुजबूज कानावर येत आहे. ही कुजबूज खरी असेल तर त्याचे अनेक अर्थ निघतात.

The BJP is in a hurry to sit on the Delhi board | भाजपाला दिल्लीच्या तख्तावर बसायची घाई

भाजपाला दिल्लीच्या तख्तावर बसायची घाई

Next
>-लोकमित्र,  राजकीय अभ्यासक
 
दिल्लीत भारतीय जनता पक्ष सरकार बनवणार असल्याची  कुजबूज कानावर येत आहे. ही कुजबूज खरी असेल तर  त्याचे अनेक अर्थ निघतात. गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये दिल्ली विधानसभेच्या एकूण ७0 जागांपैकी ३१ जागा  भाजपाला मिळाल्या होत्या. सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष म्हणून भाजपा पुढे आला होता. पण सरकार स्थापण्यास तेवढय़ा जागा पुरेशा नव्हत्या. चार आमदार कमी पडत होते. तेवढे आमदार भाजपाला जमवता आले नाहीत. त्यामुळे  भाजपाचे सरकार बनू शकले नाही. पण राजकीय क्षितिजावर प्रथमच  आलेल्या आम आदमी पार्टीने सरकार 
बनवून सार्‍यांना धक्का दिला. आम आदमी पार्टीला भाजपापेक्षा कमी म्हणजे २८ जागा मिळाल्या 
होत्या. काँग्रेसच्या बिनशर्त पाठिंब्यावर आम आदमीचे सरकार उभे झाले.  दिल्लीत सरकार स्थापून आम्ही काँग्रेसवर कृपा केली असाच आव सुरुवातीपासून आम आदमी पार्टीने आणला होता. सरकार बनवणे ही आमची नव्हे तर काँग्रेसची लाचारी आहे असे संकेत आम आदमी पार्टीवाले सुरुवातीपासून देत होते. पण हे सरकार फार  काळ चालले नाही. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीकरांना चमकवले आणि वैतागही आणला. केजरीवाल यांनी राजीनामा दिला तेव्हा   भाजपाने सरकार स्थापावे असे लोकांना वाटणे स्वाभाविक होते. भाजपाने बरीच खटपटही केली. पण आम आदमी पार्टी फोडणे त्यांना जमले नाही. आम आदमीत फूट पडली असती तर भाजपाला सरकार बनवणे सोपे गेले असते.  काँग्रेसने  भाजपाला पाठिंबा देण्याचा प्रश्नच नव्हता. त्याचा परिणाम असा झाला, की भाजपा सरकार बनवू शकला नाही.  दिल्लीसोबतच चार राज्यांत झालेल्या  निवडणुकीपैकी तीन राज्यांत भाजपाने प्रचंड विजय मिळवला होता. या पार्श्‍वभूमीवरही आमदारांची फोडाफोड केली तर पक्षाची मतदारांमध्ये प्रतिमा बिघडेल असे वाटून भाजपाने गप्प राहणे पसंत केले.  काही महिन्यांनंतर  सार्वत्रिक निवडणुका होऊ घातल्या होत्या. आपण सत्तेच्या मागे नाही हे दाखवणे भाजपाला आवश्यक होते.  दिल्लीत सरकार बनवले असते तर भाजपावर नक्कीच टीका झाली असती.  भाजपाने राजमोह टाळला. त्याचा भाजपाला मोठा फायदाही झाला. सिद्धांतावर चालणारा पक्ष म्हणून  दिल्लीकर भाजपाकडे पाहायला लागले. लोकसभा निवडणुकीत भाजपाला याचा प्रचंड फायदा झाला. इतिहासात कधी मिळाले नव्हते एवढे बहुमत मिळाले आणि देशात भाजपाचे सरकार आले. मोदी सरकारला १00 दिवस पूर्ण झाले आहेत. सामान्य माणसात उत्साह आहे.  अशा हवेत दिल्लीत सरकार बनवले तर  लोकांना ते खटकणार नाही असे भाजपाला वाटते.  त्यामुळेच त्याने सरकार बनवण्याची धडपड नव्याने सुरू केली आहे. परिस्थिती बदललेली नाही. आधीच्या परिस्थितीत भाजपाची हिंमत होत नव्हती. आज  मात्र भाजपाचा दृष्टिकोन बदलला आहे.  
पूर्वी भाजपाकडे ३१ आमदार होते, आता २८ उरले आहेत. कारण तिघे खासदार बनले आहेत. त्यामुळे पूर्वीची रड आजही कायम आहे. सरकार बनवायला अजूनही संख्याबळ कमी पडते. त्यासाठी भाजपाला आणखी चार आमदार आणावे लागतील. आम आदमी पार्टीत फूट पडेल तरच हे शक्य आहे. आम आदमीचे रॉजर बिन्नी सुरुवातीपासून भाजपाच्या छावणीत आहेत. पार्टीने मागेच त्यांना काढून टाकले आहे. रामबिर शौकिन हे अपक्ष आमदारदेखील भाजपाकडे गेले आहेत. तरीही आम आदमी किंवा काँग्रेसमधून चार आमदार फुटेपर्यंत भाजपा सरकार स्थापन करू शकत नाही. मग कसे व्हायचे? या कोंडीतून बाहेर पडण्याचा मार्ग काय? 
आतापर्यंतच्या परंपरा तोडफोडीच्या आहेत.  तोडफोड करून लोकांनी सरकारं बनवली आहेत.  भाजपाला तसे वागायचे असेल तर प्रश्न येतो कुठे?  आदर्श गुंडाळून ठेवायचे असतील तर अडचण नाही. भाजपा आरामात सरकार बनवू शकते. पण  राजकारणाला तत्त्व आणि संवेदनशीलतेशी जोडायचे असेल तर, आदर्श निर्माण करायचा असेल तर भाजपाने सरकार बनवण्याच्या फंदात पडू नये. नव्याने निवडणुका घ्यायला राज्यपालांना सांगितले पाहिजे. जनतेचा विश्‍वास मिळवून मगच सरकार स्थापण्याचा प्रयत्न केला पाहिजे.  
पण दिल्लीत सध्या ज्या घडामोडी सुरू आहेत,  जी नव्याने राजकीय समीकरणे मांडली जात आहेत, ते पाहता भाजपाला दिल्लीच्या तख्तावर बसायची घाई झाली आहे.  लालकिल्ला जिंकला असल्याने आता आपल्याला आदर्श वगैरे पाळण्याची आवश्यकता नाही, असे भाजपा मानू लागला आहे असे दिसते. लोकसभेत मिळवलेल्या स्पष्ट बहुमतामुळे त्यांच्यात फाजील आत्मविश्‍वास आलेला दिसतो.  आदर्शाच्या मार्गावर चालण्याची आपल्याला आवश्यकता नाही  असे भाजपा मानत असेल तर तो मोठी चूक करतो आहे. मतदारांचे डोके फिरले तर एका रात्रीत ते भाजपाला जमिनीवर आणतील. राजकारणात सारेच क्षम्य आहे असे म्हटले जाते. असेलही. पण संवेदनाही काही चीज आहे. भावनांच्या लाटा काम करून जातात. सत्तेसाठी भाजपाही सरड्यासारखा रंग बदलतो हे लोकांच्या लक्षात आले तर अनर्थ होईल. त्यामुळे लोकांचा अपेक्षाभंग तर होईलच, पण लोकशाहीवरचा लोकांचा विश्‍वासही ढळेल. त्यामुळे दिल्लीत मागच्या दाराने सरकार बनवण्याचा प्रयत्न भाजपाने न केलेला बरा.  हा मोह  भाजपाला पुढच्या काळात महागात पडू शकतो.  

Web Title: The BJP is in a hurry to sit on the Delhi board

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.