अंतर्गत लाथाळ्या रोखण्यात भाजप नेते अपयशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2020 12:43 PM2020-01-11T12:43:28+5:302020-01-11T12:43:43+5:30
मिलिंद कुलकर्णी खान्देशातील भाजपमध्ये अंतर्गत लाथाळ्यांना ऊत आला असून त्याचे प्रदर्शन जळगावात झालेल्या जिल्हाध्यक्ष निवडीच्या बैठकीत झाले. या घटनेचे ...
मिलिंद कुलकर्णी
खान्देशातील भाजपमध्ये अंतर्गत लाथाळ्यांना ऊत आला असून त्याचे प्रदर्शन जळगावात झालेल्या जिल्हाध्यक्ष निवडीच्या बैठकीत झाले. या घटनेचे गांभीर्य असे की, प्रदेशाध्यक्षपद भूषविलेल्या केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, प्रदेश सरचिटणीस सुजितसिंह ठाकूर या नेत्यांच्या समोर जिल्हा सरचिटणीस या पदावरील नेत्याला मारहाण, शाईफेक झाली. प्रदेश नेत्यांसमोर भाजपमधील अंतर्गत गटबाजीचे वास्तव चित्र यानिमित्ताने आले. अर्थात या घटनेमागील कारणांविषयी वेगवेगळी चर्चा असली तरी प्राथमिक माहितीनुसार हा भुसावळातील अध्यक्षनिवडीचा वाद असल्याचे दिसते. मात्र त्याला अनेक पदर आहेत. अमळनेरपाठोपाठ जळगावात पक्षाच्या व्यासपीठावर हाणामारी झाली; त्या दोन्ही वेळेस गिरीश महाजन हे उपस्थित होते. युती सरकारच्या काळात ‘संकटमोचक’ म्हणून ओळखले गेलेले महाजन हे खान्देशात आणि विशेषत: स्वजिल्ह्यात मात्र प्रभाव दाखवू शकलेले नाही. जिल्ह्याचे नेतृत्व खडसे यांच्याकडून महाजनांकडे आल्यानंतरच्या घटना पाहिल्या तरी पक्षातील बेदिली वाढलेली दिसते. नेतृत्व करीत असताना सर्व गटांना, नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना सामावून घेण्याची कार्यपध्दती आणि मानसिकता हवी असते, पण तसे घडताना दिसत नाही. लोकसभा निवडणुकीत जळगाव मतदारसंघात दोनदा उमेदवार बदलण्याची नामुष्की आली. ए.टी.पाटील यांच्याविषयी कथित वाद हा पक्षांतर्गत गटबाजीतून घडल्याची कुजबूज पक्षात आहे. उमेदवार बदलाच्या वादातूनच अमळनेरात माजी आमदार बी.एस.पाटील यांना तत्कालीन जिल्हाध्यक्ष स्व.उदय वाघ यांनी व्यासपीठावर मारहाण केली होती. विधानसभा निवडणुकीत उमेदवारीवरुन मुक्ताईनगरात कार्यकर्त्यांनी केलेले ठिय्या आंदोलन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जळगावातील सभेपूर्वी मित्रपक्ष असलेले शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केलेला तीव्र संताप, आमदारांचे घटलेले संख्याबळ, रोहिणी खडसे यांच्या पराभवाने संतापलेल्या खडसेंनी पक्षनेतृत्वावर केलेली प्रश्नांची सरबत्ती, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व गिरीश महाजन यांनी कोअर कमिटीच्या बैठकीत आपल्या नावाला विरोध केल्याचा गौप्यस्फोट, जिल्हा परिषदेच्या सभापती निवडीच्यावेळी रवींद्र पाटील या निष्ठावंत कार्यकर्त्यांने घातलेला गोंधळ आणि अर्ज भरण्यातील सावळागोंधळ आणि बंडखोरांपुढे नमते घ्यावे लागणे आणि आता संघटनात्मक निवडणुकांमध्ये पारोळा, भुसावळ, चाळीसगावात निर्माण झालेला असंतोष या सगळ्या घटनांमध्ये महाजन यांना प्रभावशाली आणि दमदार भूमिका निभावता आलेली नाही. त्यांच्या नेतृत्वाची मर्यादा या घटनांमधून अधोरेखित झाली.
अमळनेर आणि जळगाव या दोन्ही मारहाणीच्या घटनांच्यावेळी खडसे हजर नव्हते, हेदेखील लक्षात घ्यायला हवे. खडसे-महाजन वादामुळे भाजपमध्ये जळगाव आणि रावेर या दोन लोकसभा मतदारसंघानुसार दरी निर्माण झाल्याचे दिसून येते. महाजन यांचा जामनेर मतदारसंघ हा रावेर क्षेत्रात येत असला तरी ते रावेर मतदारसंघात फारसे लक्ष घालत नाही. आणि खडसे हे जळगाव मतदारसंघाकडे शक्यतो कानाडोळा करतात, असे दिसून आले आहे.
भुसावळ तालुकाध्यक्ष निवडीच्या बैठकीच्यावेळी कुºहे पानाचे येथे वाद झाला होता. त्याची दखल जिल्हास्तरीय नेत्यांनी घेणे अपेक्षित असताना दुर्लक्ष केले गेले. पारोळा, चाळीसगावातही तसेच घडले. परंतु, पक्षनेतृत्वाला तालुकापातळीवर घडणाऱ्या घटनांची माहिती मिळत नाही, की जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते हे कळायला मार्ग नाही. परंतु, भुसावळात जिल्हा सरचिटणीस सुनील नेवे यांच्या कार्यपध्दतीबद्दल तीव्र नाराजी आहे. संघटनात्मक बाबी असो की, भुसावळ पालिकेचा कारभार असो नेवे हे मनमानी करीत असल्याची तक्रार आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत रावेर लोकसभा मतदारसंघ तसेच भुसावळ व मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघाचे नियोजन नेवे हे करीत होते. त्यावेळीदेखील नेते व कार्यकर्त्यांना नेवेंनी डावलल्याची तक्रार होती. मात्र एकनाथराव खडसे यांचे निकटवर्तीय असल्याने नेते आणि कार्यकर्ते उघडपणे बोलत नसत. जळगावच्या बैठकीला खडसे येणार नाही, हे आदल्यादिवशी स्पष्ट झाल्याने भुसावळच्या असंतुष्ट कार्यकर्त्यांनी नियोजनपूर्वक हे घडवून आणले, असे आता समोर येत आहे. खडसे समर्थकाला मारहाणीपर्यंत मजल जाते, यावरुन भाजपमधील सुंदोपसुंदी कोणत्या थराला पोहोचली आहे, हे स्पष्ट होते.
प्रदेश नेतृत्वाने आता याठिकाणी लक्ष न घातल्यास परिस्थिती हाताबाहेर गेल्याशिवाय राहणार नाही, ही सर्वसामान्य कार्यकर्त्याची भावना रास्त आहे.