येडियुरप्पा यांचे पंख दिल्लीने कापले, कारण...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2021 05:31 AM2021-08-10T05:31:53+5:302021-08-10T05:34:18+5:30
कर्नाटकात नवे मुख्यमंत्री बोम्मई यांना ताकद देतानाच भाजप पक्षश्रेष्ठींनी येडियुरप्पा यांचे महत्त्व कमी कसे होईल याची पूर्ण काळजी घेतली; का?
- वसंत भोसले, संपादक, लोकमत, कोल्हापूर
कर्नाटकाच्या मंत्रिमंडळाचा विस्तार एकोणतीस जणांचा समावेश करून पूर्ण करण्यात आला. मावळते मुख्यमंत्री आणि कर्नाटक भाजपचे ज्येष्ठ नेते बी. एस. येडीयुरप्पा यांच्या राजकारणाला पूर्णविराम देण्याचा निर्णयच भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी घेतल्याचा संदेश या विस्ताराने देण्यात आला आहे. नवे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची ख्याती ही येडियुरप्पा यांचे विश्वासू सहकारी अशी होती. शिवाय ते संघ परिवारातील नाहीत, त्यांना केवळ येडियुरप्पा यांच्यामुळे भाजपमध्ये १३ वर्षांपूर्वी प्रवेश मिळाला आणि सातत्याने महत्त्वाच्या खात्यांचा कारभार देण्यात आला. परिणामी, ते येडियुरप्पा यांचे प्यारे म्हणूनच मुख्यमंत्रिपदावर बसणार, असे बोलले जात होते. त्याला पक्षश्रेष्ठींनी मंत्रिमंडळ विस्तार करताना छेद दिला आहे.
येडियुरप्पा यांनी भाजपला स्पष्ट बहुमत मिळविण्यासाठी काँग्रेस आणि जनता दलाच्या १६ आमदारांना भाजपमध्ये प्रवेश दिला होता. त्यातले १३ जण निवडून आले. त्यापैकी १२ जणांना मंत्रिमंडळात स्थान दिले गेले होते. शिवाय या सर्व मोहिमेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या माजी मंत्री लक्ष्मण सवदी यांना उपमुख्यमंत्रिपद देण्यात आले होते. आणखीन एक उपमुख्यमंत्रिपद सी. एन. अश्वाथ नारायण यांना दिले होते. बसवराज बोम्मई यांना मुख्यमंत्रिपदी बसवून पहिली लढाई जिंकली आहे, मंत्रिमंडळाच्या विस्तारातदेखील आपला वरचष्मा राहील असे येडियुरप्पा यांना वाटत होते.
कर्नाटकाच्या सार्वजनिक जीवनात लिंगायत समाजाचे वर्चस्व आहे. त्याचे सर्वोच्च नेते येडियुरप्पा यांना मुख्यमंत्रिपदावरून हटवू नये, अशी मागणी त्यांच्या राजीनाम्याच्या आदल्या दिवशीच बंगळुरूमध्ये झालेल्या मठाधिपतींच्या परिषदेत जाहीरपणे करण्यात आली होती.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने लोकसभेच्या २८ पैकी २६ जागा जिंकल्याने येडियुरप्पा यांचे महत्त्व वाढले होते. बसवराज बोम्मई यांच्या निवडीने नाराज होऊ पाहात असलेल्या लिंगायत समाजाला आधार वाटला. मंत्रिमंडळ विस्तारातही २९ पैकी ९ लिंगायत समाजाचे सदस्य निवडले गेले आहेत. मात्र, याचवेळी येडियुरप्पा यांचे दुसरे चिरंजीव बी. वाय. विजयेंद्र यांना मंत्रिमंडळात घेण्याची मागणी फेटाळण्यात आली. त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव बी. वाय. राघवेंद्र शिमोग्याचे खासदार आहेत. त्यांच्या चिरंजीवासह भाजपला बहुमत मिळवून देणाऱ्या बहुतांश साऱ्यांना डावलून येडियुरप्पा यांचे महत्त्व कमी करण्यात आले आहे. बसवराज बोम्मई हे येडियुरप्पा यांचाच रबर स्टँप असणार या चर्चेला छेद देण्याचा प्रयत्न करतील. येडियुरप्पा यांच्या विरोधात आघाडी उघडलेल्या आणि सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्या चार प्रमुख नेत्यांनाही मंत्रिमंडळात स्थान दिले गेले नाही.
भाजप पक्षश्रेष्ठींनी बोम्मई यांना ताकद देतानाच येडियुरप्पा यांचे महत्त्व कमी कसे होईल याची पूर्ण काळजी घेतली आहे. शिवाय पक्षात गटबाजी होऊ नये, यासाठी प्रथम उपमुख्यमंत्रिपद ठेवण्यात आलेले नाही. एक-दोन नव्हेतर, चार ते पाच उपमुख्यमंत्रिपदे या मंत्रिमंडळात असतील. अशी चर्चा होती. शिवाय इ. के. ईश्वराप्पा यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांनी आपणास चांगले खाते शिवाय उपमुख्यमंत्रिपद हवे, अशी जाहीर मागणी केली होती. त्यातून गटबाजी उफाळून येते, वेगळे सत्ताकेंद्र तयार होते; म्हणून त्यास छेद देणारी मोठी खेळी भाजपच्या श्रेष्ठींनी खेळली आहे. शिवाय पक्षाची पूर्ण ताकद बसवराज बोम्मई यांच्या मागे असेल, असा संदेश देण्यातही श्रेष्ठी यशस्वी झाले आहेत.
येडियुरप्पा यांना यापूर्वीही भ्रष्टाचाराच्या आरोपावरून सत्ता सोडावी लागली, तेव्हा एस. व्ही. सदानंद गौडा आणि जगदीश शेट्टर या ज्येष्ठ मंत्र्यांना मुख्यमंत्रिपद मिळाले होते. मात्र, त्यांना पूर्ण ताकदीनिशी काम करण्यास येडियुरप्पा यांच्या गटाने मोकळीक ठेवली नव्हती. कर्नाटकात भाजपची उभारणी आपण केली तेव्हा सत्तेचे हक्कदार आपणच आहोत, अशी भावना येडियुरप्पा यांनी जाहीरपणे बोलून दाखविली तीसुद्धा पुढील काळात अडचणीची ठरणार आहे. बसवराज बोम्मई यांची प्रतिमा स्वच्छ, चारित्र्यवान आणि भ्रष्टाचाराचा एकही आरोप नसलेले मंत्री अशी आहे. पक्षश्रेष्ठींच्या इच्छेनुसार येडियुरप्पा यांच्या राजकारणात पूर्णविराम दिला तर ते कर्नाटकाचे सर्वांत प्रभावी नेते पुढील काळात ठरतील, यात शंका नाही. भाजपला राज्य पातळीवर नेतृत्वाची वानवा आहे, तीदेखील या प्रयोगाने भरून निघेल.