भाजपा प्रवक्त्यांची राफेलवारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2019 09:03 PM2019-01-02T21:03:46+5:302019-01-02T21:05:08+5:30
राफेलप्रकरणावरुन कॉंग्रेसने भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चांगलेच घेरले आहे
मिलिंद कुलकर्णी
राफेलप्रकरणावरुन कॉंग्रेसने भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चांगलेच घेरले आहे. गावपातळीपासून तर संसदेपर्यंत काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यासह स्थानिक नेते नवनवीन आरोपांचे बाण सोडत आहे. पहिल्यांदाच भाजपा आणि पंतप्रधान मोदी याविषयावर अडचणीत आल्याचे आणि काहीसे गोंधळात असल्याचे जाणवत आहे. अगदी ९५ मिनिटांच्या दूरचित्रवाहिनीवरील अलिकडील मुलाखतीत पंतप्रधान मोदी यांनी यासंबंधी स्वत:वरील जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केलेला दिसून आला. काँग्रेस आणि राहुल गांधी यांचे आरोप सरकारवर आहेत, माझ्यावर नाहीत, असा दावा त्यांनी केला. त्यासोबतच संरक्षणसामग्री खरेदीविषयी वाद का उपस्थित केला जातो, असा सवाल करीत याचा लष्कराच्या मनोधैर्यावर परिणाम होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली आहे. भाजपा सरकारच्या कार्यकाळात पावणे पाच वर्षात प्रथमच असा वादंग घडतो आहे.
कॉंग्रेसने जिल्हा पातळीवर राफेलप्रकरणी निदर्शने आणि जिल्हा प्रभारींच्या पत्रकार परिषदा घेऊन भाजपा सरकारवर तोफ डागली. काँग्रेसच्या आक्रमणाला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपानेदेखील प्रदेश प्रवक्त्यांचे राज्यभर दौरे आयोजित केले. जळगावात केशव उपाध्ये तर नंदुरबारात अतुल शहा येऊन गेले. या दोघांनी राफेलप्रकरणी सरकार व भाजपाची भूमिका जोरकसपणे मांडली. परंतु, कॉंग्रेस आणि भाजपाच्या पत्रकार परिषदांमध्ये फरक एवढाच होता की, काँग्रेसचे प्रभारी नेते राफेलशिवाय अन्य विषयांवरदेखील बोलले. पण भाजपाच्या प्रवक्त्यांनी मात्र राफेलशिवाय कोणत्याही विषयावर बोलायला चक्क नकार होता. ही पत्रकार परिषदच मुळी राफेलविषयावर बोलावली आहे, त्यामुळे अन्य विषयांवर प्रश्न विचारु नये, असे सुरुवातीलाच स्पष्ट करण्यात आले.
राफेल, अनिल अंबानी, एचएएल, डसाल्ट हे शब्द सहा महिन्यांपासून प्रत्येकाला परिचित झाले असले तरी ‘गैरव्यवहार’ एवढेच सामान्य माणसाला कळते. बाकी करार, किंमती, सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा अशा तपशीलात तो फारसा जात नाही. त्यामुळे जिल्हा पातळीवर झालेल्या काँग्रेसचे आंदोलन असो की, दोन्ही पक्षाच्या पत्रकार परिषदा, त्याविषयी फारशी उत्सुकता प्रसार माध्यमे आणि सामान्य माणसामध्ये दिसून आली नाही.
मात्र यातून राजकीय पक्षांचा अट्टाहास आणि हतबलता दिसून आली. लोकसभा निवडणुका पाच महिन्यांवर आल्या असताना आणि सत्ताधारी भाजपा आणि विरोधी पक्ष काँग्रेसमधील घडामोडींना वेग आलेला असताना सामान्य माणूस आणि प्रसारमाध्यमांना त्यात रस असणे स्वाभाविक आहे. पण आम्ही तुम्हाला जे हवे त्याविषयी काहीही बोलणार नाही, आम्ही सांगतो, तेवढेच ऐका आणि छापा हा झाला अट्टाहास. राफेलविषयी पक्षीय निवेदन झाल्यानंतर कोणत्याही पत्रकाराने प्रश्न विचारला नाही, यावरुन मुरब्बी राजकीय नेत्यांना वास्तविकता लक्षात आली असेल. पण पक्षाच्या आदेशापुढे काही चालत नसल्याची हतबलता त्यांच्या देहबोलीवरुन दिसून येत होती. पक्षाने सांगितले म्हणून आम्ही पत्रकार परिषद घेतली. आम्हाला सोपविलेली जबाबदारी पार पडली, असेच एकंदर चित्र होते.
काँग्रेसच्या डॉ.हेमलता पाटील, भाजपाचे केशव उपाध्ये,अतुल शहा यांच्यासारखे अभ्यासू, व्यासंगी नेत्यांची एकप्रकारे ही कोंडी होती, पण त्यांनी पक्षादेशाला सर्वोच्च मानले.
बोफोर्सवरुन भाजपासह अन्य विरोधकांनी उठविलेले रान काँग्रेस नेत्यांना आठवत असेल, त्याची परतफेड आता राफेलच्या मुद्यावरुन केली जात आहे. सत्ताधारी पक्ष म्हणून किती अपरिहार्यता असते, याचा अनुभव भाजपा नेते घेत आहे. एरवी सगळ्या विषयांवर मनसोक्त संवाद साधणारे प्रवक्ते यावेळी मात्र ‘अळीमिळी, गुपचिळी’सारखे दिसले. भाजपामध्ये गेल्या पावणे पाच वर्षात ही नवीन संस्कृती उदयाला आली आहे. अर्थात तिचे मूळ रा.स्व.संघात आहे. आदेशाशिवाय काहीही बोलायचे नाही. कृती करायची नाही. प्रसिध्दीपासून दूर राहणाऱ्या संघ कार्यकर्त्यांना भाजपामध्ये आल्यावर हायसे वाटायचे. बंधनातून मुक्त झाल्यासारखे वाटायचे.पण अलिकडे भाजपामध्येदेखील ते वातावरण तयार होऊ लागले आहे, या विषयावरुन स्पष्ट झाले.