भाजपा ‘ट्रेलर’ने शिवसेना घायाळ
By Admin | Published: September 3, 2016 05:30 AM2016-09-03T05:30:50+5:302016-09-03T05:30:50+5:30
नाशिक महापालिका पोटनिवडणुकीत भाजपाला मिळालेल्या यशाने शिवसेना अधिक घायाळ होणे स्वाभाविक आहे, कारण येऊ घातलेल्या निवडणुकीत विजय आपलाच असल्याचा
- किरण अग्रवाल
नाशिक महापालिका पोटनिवडणुकीत भाजपाला मिळालेल्या यशाने शिवसेना अधिक घायाळ होणे स्वाभाविक आहे, कारण येऊ घातलेल्या निवडणुकीत विजय आपलाच असल्याचा त्यांचा भ्रम यामुळे निकाली निघाला आहे
महापालिकेच्या एक-दोन प्रभागातील पोटनिवडणुकीच्या निकालावरून शहरवासीयांच्या सार्वत्रिक मानसिकतेचा अंदाज बांधता येऊ नये हे खरेच, पण निवडणुकांचे पाणी कुठल्या वळणावरून वाहू शकेल याचा संकेत मात्र त्यातून जरूर घेता यावा. नाशकातील हे असे संकेतच शिवसेना व ‘मनसे’ला घाम फोडणारे ठरले आहेत.
नाशिक महापालिकेतील दोन प्रभागांसाठी जी पोटनिवडणूक झाली, तीत या दोन्ही जागा आपल्या हातून गेल्याचे दु:ख सत्ताधारी ‘मनसे’ला होणे अपेक्षित असताना पराभवाचा बाण शिवसेनेच्या जिव्हारी लागला आहे, कारण यंदा महापालिका आपल्याच ताब्यात आल्याच्या आविर्भावात आतापासून हा पक्ष वागतो-वावरतो आहे. नाशिक महापालिकेची निवडणूक येत्या जानेवारी वा फेब्रुवारीमध्ये येऊ घातल्याने अवघ्या पाच-सहा महिन्यांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत ‘मनसे’ने अगर राष्ट्रवादीने तसाही जोर लावलाच नव्हता. त्यामुळे या पक्षांचे उमेदवार तिसऱ्या व चौथ्या क्रमांकावर राहिले.
मात्र केंद्रात तसेच राज्यातही एकत्रितपणे सत्ता उपभोगणाऱ्या भाजपा व शिवसेना या पक्षांनी प्रथमपासून ही पोटनिवडणूक ‘पोटतिडकी’ची केली होती. त्याचसाठी तर स्वकीयांचा विरोध डावलून वा त्यांना अंधारात ठेवून भाजपा शहराध्यक्ष, आमदार बाळासाहेब सानप यांनी पोलीस हत्त्येपासून ते दरोडा व खंडणी उकळण्यापर्यंतच्या विविध गुन्ह्यात नामांकित असलेल्या पवन पवार यांना आपल्या पक्षात प्रवेश देऊन पावन करून घेतले होते. शुचितेचा व ‘पार्टी विथ डिफरन्ट’चा टेंभा मिरवणाऱ्या भाजपाचे सोवळे त्यामुळे सुटून पडल्याची टीका झाली आणि खुद्द पक्षाच्याच अन्य स्थानिक आमदारांसह काही पदाधिकाऱ्यांनीही या प्रवेशाबद्दल आक्षेप नोंदविले होते. त्यामुळे या पवन‘पात्रा’च्या भरवशावर का होईना, पोटनिवडणूक जिंकून आगामी निवडणुकीतील विजयाची नांदी प्रदर्शिणे भाजपा शहराध्यक्षासाठी गरजेचे बनले होते. पक्षाची बदनामी स्वीकारूनही यश लाभले नसते, तर शहराध्यक्ष म्हणून सानप यांच्या यापुढील वाटचालीवर प्रश्न उपस्थित झाले असते. म्हणूनच भाजपासाठी ही पोटनिवडणूक प्रतिष्ठेची ठरली होती.
भाजपाचे असे राजकीयदृष्ट्या प्रवाहपतीत होणेच शिवसेनेला लाभदायी वाटत होते. भाजपातील गुंड-पुंडांच्या भरतीबद्दल गळे काढून शिवसेनेने रान पेटविण्याचा प्रयत्न केला होता. शिवाय, गेल्या काही महिन्यांपासून अन्य पक्षीय नेत्या-कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेशाला अधिक पसंती दिल्याचे दिसून येत होते. त्यामुळे महापालिकेत यापुढील सत्ता आपलीच, असा समज शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी करून घेतला होता आणि दुसरे म्हणजे, ज्या नाशिकरोड परिसरात सदर दोन प्रभागांची पोटनिवडणूक झाली, त्याकडे शिवसेनेचे प्रभाव क्षेत्र म्हणूनही पाहिले जाते. या साऱ्याच्याच परिणामी पोटनिवडणुकीतील यशही आपलेच, अशा भ्रमात या पक्षाचे पदाधिकारी होते. परंतु एके ठिकाणी दुसऱ्या, तर दुसऱ्या ठिकाणी तिसऱ्या क्रमांकावर शिवसेना राहिली. त्यामुळे जागा ‘मनसे’च्या गेल्या असल्या तरी शिवसेनेच्या दु:खाची जखम भळभळून वाहणे क्रमप्राप्त ठरले.
अर्थात, भाजपाने ही पोटनिवडणूक जिंकली म्हणून या यशाला उद्याच्या विजयाची नांदी ठरविणेही घाईचेच ठरेल. कारण, अजून पुलाखालून बरेच पाणी वाहून जाणे बाकी आहे. पण, निव्वळ मोठ्या प्रमाणातील पक्ष भरतीच्या बळावर किंवा पूर्ण करता न येणाऱ्या स्वप्नवत प्रकल्पांच्या घोषणांवर महापालिका निवडणुकीचे मैदान मारता येणार नाही, असा संकेत मात्र या पोटनिवडणुकीच्या निकालाने नक्कीच दिला असून, तो विशेषत: शिवसेना व ‘मनसे’ या दोन्ही पक्षांची काळजी वाढविणाराच ठरावा.