भाजपाला हवाय ‘सेनामुक्त महाराष्ट्र’!

By admin | Published: May 11, 2016 02:53 AM2016-05-11T02:53:48+5:302016-05-11T02:53:48+5:30

मुंबई महापालिकेचा कारभार हा माफियाच्या हाती गेला आहे आणि या माफियावर ‘वांद्र्यातील साहेब, त्याचे मेव्हणे व खासगी सचिव’ यांचे नियंत्रण आहे,

BJP wants 'army free Maharashtra'! | भाजपाला हवाय ‘सेनामुक्त महाराष्ट्र’!

भाजपाला हवाय ‘सेनामुक्त महाराष्ट्र’!

Next

मुंबई महापालिकेचा कारभार हा माफियाच्या हाती गेला आहे आणि या माफियावर ‘वांद्र्यातील साहेब, त्याचे मेव्हणे व खासगी सचिव’ यांचे नियंत्रण आहे, हा भाजपाचे खासदार किरीट सोमय्या यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत केलेला आरोप म्हणजे शिवसेनेला मागे सारून आपले वर्चस्व मुंबई व राज्यात स्थापन करण्याच्या भाजपाच्या रणनीतीतील आणखी एक डाव आहे. दिल्लीत मोदी सत्तेवर आल्यानंतर पाच महिन्यांच्या अवधीतच महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका झाल्या. तेव्हा ‘मोदी लाटे’वर पुन्हा स्वार होऊन, अनेक वर्षांपासून जपलेले ‘शत-प्रतिशत भाजपा’ हे स्वप्न साकार करण्याची संधी आली आहे, अशी पक्षनेत्यांची भावना होती. आपले वर्चस्व प्रस्थापित करण्याची ही सुवर्णसंधी आहे, असा भाजपाचा आडाखा होता. शिवाय सेना डोईजड होत आहे, अशी राज्यातील भाजपा नेत्यांची भावना होती. त्यातच केंद्रात मोदी पंतप्रधान बनले आणि पक्षाची सूत्रे अमित शहा यांच्या हाती आल्यावर या दोघांना सेना हे लोढणे वाटू लागले होेते. शिवाय मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असल्याने तेथे आपलेच वर्चस्व हवे, अशी मोदी-शहा यांची धारणा होती. म्हणूनच वरकरणी सेनेची साथ करीत असल्याचे दाखवत प्रत्यक्षात या पक्षाचा हात शेवटी सोडून स्वतंत्रपणे निवडणूक लढवायची, अशी ही मोदी-शहा यांची रणनीती होती व आजही आहे. सेनेवर ‘माफियागिरी’चा आरोप करणारे खासदार किरीट सोमय्या हे ही रणनीती अंमलात आणताना वापरले जाणारे निव्वळ प्यादे आहेत. अलीकडच्या काळात पोलीस व तपास यंत्रणा आणि प्रशासनातील अधिकारपदावरील व्यक्ती या कशा ‘सोनेरी पिंजऱ्यातील पोपट’ आहेत आणि मालकाच्या सांगण्यानुसार कसे या यंत्रणा व त्यातील ही मंडळी बोलतात व काम करतात, याचे दाखले दिले जात असतात. आजकाल राजकीय पक्षांनाही असे पोपट लागत असतात. तिकडे दिल्लीत सुब्रमण्यम स्वामी हे असे ‘पोपट’ आहेत. इकडे महाराष्ट्रात सोमय्या. मोदी-शहा यांच्या या रणनीतीचाच एक भाग म्हणून विधानसभा निवडणुकीच्यावेळी तिकीट वाटपाच्या घोळात सेनेला गुंतवून शेवटच्या क्षणी तिचा हात सोडून देण्यात आला. ‘मोदी लाटे’वर स्वार होऊन १४४ जागा मिळवण्याचे भाजपाचे स्वप्न काही साकार झाले नाही. त्यामुळे सरकार स्थापन करता यावे म्हणून सेनेची मदत घेणे भाग पडणार होते. पण येथेही मोदी-शहा यांनी निवडणुकीचे निकाल लागत असतानाच शरद पवार यांच्याशी संधान बांधून ‘सरकारच्या स्थिरते’करिता राष्ट्रवादी काँग्रेसची मदत मिळवून देण्याची व्यवस्था केली होती. पण निवडणुकीच्या काळात पक्षांतर करून आलेल्यांना उमेदवारी देताना ‘हा आमचा आपद धर्म आहे; पण आमचा शाश्वत धर्म हा नैतिक व स्वच्छ कारभार करण्याचाच आहे’, असा युक्तिवाद फडणवीस करीत असत. शिवाय राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘भ्रष्ट’ नेत्यांना तुरुंगाची हवा खायला लावू, अशी ग्वाही फडणवीस निवडणूक सभात देत असत. साहजिकच राष्ट्रवादी काँग्रेसच्या साथीने सरकार चालवल्यास पक्षास त्याची राजकीय किंमत मोजावी लागेल, अशी भीती त्यांना होती. शिवाय आपल्या ‘स्वच्छ’ प्रतिमेबाबत जागरूक असलेल्या फडणवीस यांना राष्ट्रवादी कॉँग्रेसची साथ घेतल्यास ही प्रतिमा मलीन होण्याचा धोका वाटत होता. मग सेनेला सत्तेत सहभागी करून घ्यायचे, पण अपमानित करून, अशी थोडी मुरड मोदी-शहा यांनी आपल्या रणनीतीला घातली. या रणनीतीचा भाग म्हणून सेनेला दुय्यम मंत्रिपदे देण्याचा प्रस्ताव पक्षापुढे मांडण्यात आला. त्याला सेना नकार देणार, हे उघडच होते. त्यावेळीच सेनेतील अनेकांना मंत्रिपदाचे गाजर दाखवून पक्ष फोडण्यास प्रवृत्त करण्याची मोहीम हाती घेण्यात आली. आधीची १५ वर्षे राजकीय वनवासात राहिलेले बहुसंख्य सेना नेते सत्तेकरिता आसुसले होते. शेवटी पक्ष फुटण्याचा धोका लक्षात घेऊन सेना नेतृत्वाने माघार घेतली आणि पदरात पडली ती मंत्रिपदे स्वीकारली. तेव्हापासून गेली १८ महिने सेना व भाजपा यांच्यात खडाखडी सुरू आहे. सेनेला अपमानित करण्याची एकही संधी भाजपा सोडताना दिसत नाही. तरीही सेना सत्तेला चिकटून आहे; कारण पक्ष फुटण्याचा धोका. त्यामुळे ‘आम्ही आमची भूमिका बदललेली नाही, आग्रह सोडलेले नाहीत’, असे सेना नेतृत्व सतत सांगत राहिले आहे. पुढील वर्षी मुंबई महापालिकेच्या निवडणुका आहेत. सेनेचा सगळा ‘राजकीय जीव’ पालिकेतील सत्तेत एकवटला आहे. ही सत्ता हातची गेली, तर ‘सेनामुक्त महाराष्ट्र’ करण्याच्या दिशेने दमदार पावले टाकली जाऊ शकतात, हे भाजपा जाणतो. सेनेचा पालिकेतील कारभार हा अत्यंत भ्रष्ट आणि अनागोंदीचा आहे. शेकडो कोटीचे घोटाळे झाले आहेत. तेव्हा या कारभारावर प्रहार करीत राहणे, हा ‘सेनामुक्त महाराष्ट्रा’च्या रणनीतीतील पुढचा डाव आहे... किरीट सोमय्या हे या डावपेचांत प्याद्याची भूमिका निभावत आहेत. पालिकेत भाजपाही सेनेसह सत्तेत आहे. तेव्हा या भ्रष्टाचारास तेही तेवढेच जबाबदार आहेत. त्यावर सोमय्या यांचे उत्तरही मासलेवाईक आहे. मुंबई पालिकेत आवाज कोणाचा आहे, असा प्रतिप्रश्न सेनेच्याच घोषणेचा वापर करून सोमय्या यांनी विचारला आहे आणि हात झटकून टाकले आहेत.

Web Title: BJP wants 'army free Maharashtra'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.