भाजपाची काँग्रेस होईलच कशी?

By Admin | Published: March 22, 2017 11:38 PM2017-03-22T23:38:46+5:302017-03-22T23:38:46+5:30

उत्तर प्रदेशाच्या मुख्यमंत्रिपदी योगी आदित्यनाथ यांची नेमणूक झाल्यानं राजकीय चर्चाविश्वात झंझावात उठला आहे.

BJP will be the Congress? | भाजपाची काँग्रेस होईलच कशी?

भाजपाची काँग्रेस होईलच कशी?

googlenewsNext

उत्तर प्रदेशाच्या मुख्यमंत्रिपदी योगी आदित्यनाथ यांची नेमणूक झाल्यानं राजकीय चर्चाविश्वात झंझावात उठला आहे. उलट-सुलट युक्तिवादाच्या गदारोळात काही तथ्य समजून घेणं गरजेचं आहे. पहिली गोष्ट म्हणजे आदित्यनाथ हे उत्तर प्रदेशात झालेल्या विधानसभा निवडणुकीतील उमेदवार नव्हते. गोरखपूर मतदारसंघातून २०१४ साली पाचव्यांदा भाजपाचे खासदार म्हणून ते निवडून आले आहेत. भाजपाला विधानसभा निवडणुकीत ३२५ जागा मिळाल्या. मात्र त्यापैकी एकाही आमदाराला मुख्यमंत्री न बनवता आदित्यनाथ यांना या पदावर बसविण्यात आलं आहे.
दुसरं तथ्य म्हणजे गोवा व मणिपूर येथे सर्वात मोठा पक्ष नसूनही सौदेबाजीचं राजकारण करून सत्ता ताबडतोब आपल्या पदरात पडावी, यासाठी भाजपाने मोठी धावपळ केली. पण उत्तर प्रदेशात अभूतपूर्व यशानंतरही मुख्यमंत्रिपदी कोण येणार, हे ठरविण्यास आठवडा जावा लागला. आता उपमुख्यमंत्री झालेले केशव मौर्य हे इतर मागासवर्गीयांतील आहेत आणि विधानसभा निवडणुकीच्या काळात ते भाजपाचे प्रदेशाध्यक्ष होते. दुसरे उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा हे ब्राह्मण आहेत. खुद्द आदित्यनाथ हे रजपूत आहेत. भाजपाला ‘हिंदू’ मतांचं एकत्रीकरण करण्यात मौर्य यांचा मोठा वाटा होता. त्यामुळं मुख्यमंत्रिपदाची माळ आपल्याच गळ्यात पडेल, अशी खात्री मौर्य यांना वाटत होती. ही घडण्याची शक्यता नाही, असं दिसू लागताच, मौर्य यांचे समर्थक तेच मुख्यमंत्री बनणार, असं सांगताना दिसू लागले. त्याला उत्तर म्हणून योगी आदित्यनाथ यांचे समर्थकही स्पर्धेत उतरले. हे वादळ शमवण्यासाठी मोदी-शहा या दुकलीला काही दिवस घालवावे लागलेले दिसतात. त्यातूनच दोन उपमुख्यमंत्री नेमण्याचा निर्णय घेऊन आणि ‘एवढ्या मोठ्या राज्याचा कारभार सांभाळण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या साथीला किमान दोन उपमुख्यमंत्री तरी हवेतच’, असा युक्तिवादही केला जात आहे. तथ्य असं आहे की, राजकीय समीकरणं जुळवताना केलेली ही सोईची प्रशासकीय संरचना आहे... कारण मुख्यमंत्रिपदी योगी आदित्यनाथ यांना नेमायचं, हे ठरविण्यात आलेलंच होतं. फक्त ही सत्तेची समीकरणं जुळवण्यात वेळ गेला एवढंच. तिकडं गोव्यात व मणिपूरमध्ये ‘पैशाच्या थैल्या ओता, पदांची खैरात करा आणि पाठबळ मिळवा’, असा सरळ सौदा होता. सत्तेची समीकरणं जुळवताना जातीच्या पलीकडं जाऊन ‘हिंदू’ ही ओळख घट्टपणं आकाराला आणण्याच्या प्रयत्नाला अडथळा येईल, अशी कोणतीही जोखीम पत्करायची मोदी-शहा यांची तयारी नव्हती.
तिसरं तथ्यं आहे, ते स्वत:ला योगी म्हणवणारे आदित्यनाथ हे ज्या गोरखपूर मठाचे ‘महंत’ आहेत, त्याच्या परंपरेचं. आदित्यनाथ हे दिग्विजय नाथ यांची परंपरा चालवत आले आहेत. हे दिग्विजयनाथ १९२१ साली काँगे्रसमध्ये होते. चौरी चौरा येथील आंदोलनात त्यांना अटकही झाली होती. (पुढे हे दिग्विजयनाथ १९६७ साली हिंदू महासभेच्या तिकिटावर निवडून आल्यावर संसद सदस्यांची माहिती असलेल्या १९६७च्या पुस्तिकेत हा उल्लेख आहे). हे दिग्विजयनाथ १९३४ मध्ये मठाचे महंत झाले. नंतर हिंदू महासभेचे अध्यक्ष झाले. दिग्विजयनाथ यांच्या मृत्यूनंतर १९६९ साली अद्वैतनाथ हे महंत झाले. त्यांनी भाजपाचे उमेदवार म्हणून १९९१ व १९९६ची निवडणूक लढवली. आदित्यनाथ हे या दोन्ही पूर्वसुरींची परंपरा चालवत आले आहेत. लोकसभेच्या २०१४च्या निवडणुकीत व नंतर झालेल्या पोटनिवडणुकांत आदित्यनाथ यांनी ‘लव्ह जिहाद’वरून रण माजवलं होतं. प्रत्येक धर्मांतरित हिंंदूच्या बदल्यात १०० मुस्लीम स्त्रियांचं धर्मांतर घडवून आणण्याचं जाहीर आवाहन त्यांनी केलं होतं.असे हे आदित्यनाथ उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री बनल्यावर राज्यघटनेच्या चौकटीत ‘सबका साथ, सबका विकास’ करणार असल्याची ग्वाही देत आहेत.
जरा मागं वळून २००२ ते २०१३-१४ या काळातील मोदी यांची विधानं बघितली, तर असंच काहीसं आढळून येत नाही काय? तरीही हेच मोदी संसदेच्या इमारतीच्या पायरीवर डोकं ठेवून ‘राज्यघटना हाच माझा धर्म’ असं म्हणाले होतेच की! तथ्यं हेच आहे की, कडवं हिंदुत्व हा मोदी यांचा खरा चेहरा आहे. त्यांनी इंदिरा गांधी यांची एकाधिकारशाहीची शैली उचलली आहे इतकंच. पण मोदी म्हणजे इंदिरा गांधी नव्हे ते आणि भाजपा आता काँगे्रस बनत आहे, असं समजणं हा एक तर भाबडेपणा आहे किंवा निव्वळ मतलबी संधिसाधूपणा आहे. काँगे्रस ही सत्ता मिळविण्यासाठी व ती टिकविण्याकरिता जमातवादी राजकारण करीत आली आहे. उलट ‘जमातवाद’ हा भाजपाचा स्थायिभावच आहे व राहणारही आहे. राहिला प्रश्न मतदारांचा. त्यांनी भाजपाला मतं दिली-२०१४ साली आणि आता उत्तर प्रदेशातही. पण याच मतदारांनी इंदिरा गांधी यांना १९७१ साली डोक्यावर घेतलं होतं, १९७७ साली बाजूला फेकलं होतं आणि १९८०ला पुन्हा निवडलं होतंच ना ! तेव्हा संख्याबळ हा लोकशाहीतील एकमेव निकष असू शकत नाही. लोकशाही मूल्यं मानणं आणि ती प्रत्यक्षात आचरणात आणणं, हे महत्त्वाचं असतं. तसं संघाची राजकीय आघाडी असलेलं भाजपाचा राजकीय ‘डीएनए’च नाही. तेव्हा भाजपाची काँगे्रस होईलच कशी? त्यामुळं आदित्यनाथ यांची निवड मोदी करणार, यात नवल ते काय !
-प्रकाश बाळ
(ज्येष्ठ पत्रकार आणि स्तंभ लेखक)

Web Title: BJP will be the Congress?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.