भाजपावाले, तुम्हीसुद्धा..!

By admin | Published: February 6, 2017 12:03 AM2017-02-06T00:03:59+5:302017-02-06T00:03:59+5:30

ज्या वाईट गोष्टी दोन्ही काँग्रेसने केल्या त्या सगळ्या ‘पार्टी विथ अ डिफरन्स’ असे म्हणणारी भाजपा करत आहे. गुंडांना पक्षात घेण्यापासून ते तिकिटासाठी पैसे मागण्यापर्यंत...

BJPmen, you too ..! | भाजपावाले, तुम्हीसुद्धा..!

भाजपावाले, तुम्हीसुद्धा..!

Next

ज्या वाईट गोष्टी दोन्ही काँग्रेसने केल्या त्या सगळ्या ‘पार्टी विथ अ डिफरन्स’ असे म्हणणारी भाजपा करत आहे. गुंडांना पक्षात घेण्यापासून ते तिकिटासाठी पैसे मागण्यापर्यंत...

महापालिका, जिल्हा परिषद निवडणुका जाहीर झाल्या आणि तमाम पक्षांमध्ये बंडखोरी उसळली. मुंबई काँग्रेसमध्ये संजय निरुपम आणि गुरुदास कामत या दोन गटांत अर्वाच्च शिवीगाळ झाल्याचे आणि ‘तुला बघून घेतो’ इथपर्यंतचे डायलॉग झाल्याचे समोर आले. मुंबईत स्वत:चे अस्तित्व बनवण्यात अयशस्वी ठरलेल्या राष्ट्रवादीत डिमांडच नसल्याने त्यांना मनासारखी तिकिटे वाटता आली आणि अस्तित्व असूनही ते टिकवता न आलेल्या राज ठाकरे यांच्या मनसेत तिकिटांसाठी मारामारी झाली नाही. शिवसेनेने मुंबईतली बंडखोरी टाळण्याचे आटोकाट प्रयत्न केले व त्यात यशही मिळवले. मात्र केवळ सत्तेसाठीच भाजपात येणाऱ्यांमध्ये मुंबईसह राज्यभर तुंबळ युद्ध रंगले आहे. ‘पार्टी विथ अ डिफरन्स’ असे बिरुद मिळवणारा भाजपा दोन वर्षांत राष्ट्रवादीच्या ताटाला ताट लावून बसला आहे.

सतत १५ वर्षे सत्तेत असणाऱ्या काँग्रेस, राष्ट्रवादीतील दादागिरी, भ्रष्टाचाराच्या सुरस कथा, एकमेकांवर केल्या जात असलेल्या कुरघोड्या या बजबजपुरीला कंटाळून जनतेने भाजपा व देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा चेहरा निवडला. अत्यंत प्रामाणिकपणे काम करण्याची आस, आणि हेतूंविषयी शत्रूच्या मनातही शंका येणार नाही, इतके ठाम वागणारा मुख्यमंत्री लाभूनही भाजपाला गुंड, पुंड आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असणारेच नेते, कार्यकर्ते पक्षवाढीसाठी का लागतात? दोन्ही काँग्रेसच्या खाबूगिरीला लोक कंटाळले होते. त्याच मार्गाने गेल्याशिवाय आणि पैसेखाऊ वृत्ती असल्याशिवाय सत्ता येत नाही, असे भाजपाला का वाटू लागले? कार्यकर्त्यांकडून जाहीरपणे तिकिटासाठी दोन लाखाची मागणी का केली जाऊ लागली? सकाळी शिवसेनेने तिकीट दिले नाही, म्हणून दुपारी त्या उमेदवारांना पायघड्या घालाव्या, एवढी भाजपाला सत्ता जवळची वाटू लागली? संस्कार आणि शिस्त या दोन गोष्टी संघाने भाजपाला दिल्या. त्या दोन्ही गोष्टींवर पाणी सोडून भाजपा नेते बेफाम वागू लागले आहेत.

प्रदेशाध्यक्ष जाहीरपणे नोटा आणा, बदलून देतो, दुष्काळ नव्हताच तरी आम्ही बोंब ठोकली म्हणून निधी मिळाला, असे जाहीरपणे सांगत आहेत. ही अगतिकता आहे की सत्तेची मस्ती? संघाच्या ज्येष्ठ, श्रेष्ठ नेत्यांना या गोष्टी मान्य आहेत का? असे एका ना दोन, असंख्य प्रश्न भाजपावर प्रेम करणाऱ्या जुन्याजाणत्या लोकांना पडू लागले आहेत. संघाच्या मुशीतून तयार झालेला हाच का भाजपा, असा प्रश्न त्यांना पडला आहे. लोकांनी आपल्याला सत्ता का दिली, या प्रश्नाचे उत्तरच भाजपा नेते विसरून गेले आहेत. ज्या गोष्टींसाठी जनतेने राष्ट्रवादी आणि काँग्रेसला नाकारले, त्या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी भाजपा अगदी आठवून आठवून करूलागला आहे.

भले आमची सत्ता नाही आली तरीही चालेल पण आम्ही गुंडांना तिकिटे देणार नाही, अशी कणखर भूमिका जाहीरपणे घेतली असती, तर राज्यातील जनतेने भाजपाला डोक्यावर घेतले असते. पण आता ज्या पद्धतीने सगळा माहोल या पक्षात तयार झाला आहे तो पाहता, भाजपाचीही काँग्रेस झाल्याचे पदोपदी दिसू लागले आहे.

शिवसेनेसोबतची युती तुटल्यानंतर भाजपाच्या मेळाव्यात शिवसेनेवर प्रहार करताना मुख्यमंत्री फडणवीस यांचा आवाज बसला, तर सेनेविरुद्ध बोलताना त्यांचा आवाज बसल्याची भाषा सेनेने वापरली. याच काळात ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांचे स्टेज कोसळले, जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या गाडीचे चाक फुटले अशी संकटे सुरू असताना केंद्राने जाहीर केलेल्या आर्थिक पाहणी अहवालात मुंबई महापालिका पारदर्शी कारभारात अव्वल असल्याचे समोर आल्याने शिवसेनेला आयतेच कोलीत मिळाले आहे.
गुंड उमेदवारांना भाजपाने दरवाजे उघडल्याने सर्वत्र टीकेची झोड उठलेली असताना, आता भाजपाचे कार्यकर्ते उमेदवारी देताना दोन लाखांची मागणी करतानाचा व्हिडीओ व्हायरल झालाय! पार्टी विथ अ डिफरन्स यालाच म्हणायचे का? जनतेने आपल्याला का निवडून दिले, याचे भान हरवलेल्या भाजपाच्या या वेगवान प्रगतिरथापुढे संघही हतबल झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे जरी पक्षाला यश मिळाले, तरी ते गुंडपुंडांमुळे की मुख्यमंत्र्यांच्या कामामुळे हा प्रश्न उरेलच! घोडामैदान जवळच आहे...
- अतुल कुलकर्णी

Web Title: BJPmen, you too ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.