भाजपाचे उत्कृष्ट आपत्ती व्यवस्थापन

By admin | Published: February 24, 2017 11:55 PM2017-02-24T23:55:39+5:302017-02-24T23:55:39+5:30

भारतीय जनता पार्टीने जळगाव जिल्हा हा बालेकिल्ला असूनही गाफील न राहता पुरेशी काळजी आणि उत्कृष्टपणे आपत्ती व्यवस्थापन केल्याने जिल्हा परिषद निवडणुकीत प्रथमच

BJP's Best Disaster Management | भाजपाचे उत्कृष्ट आपत्ती व्यवस्थापन

भाजपाचे उत्कृष्ट आपत्ती व्यवस्थापन

Next

भारतीय जनता पार्टीने जळगाव जिल्हा हा बालेकिल्ला असूनही गाफील न राहता पुरेशी काळजी आणि उत्कृष्टपणे आपत्ती व्यवस्थापन केल्याने जिल्हा परिषद निवडणुकीत प्रथमच भाजपा स्वबळावर सत्तेच्या उंबरठ्यावर पोहोचले आहे.
जिल्हा परिषदेत १५ वर्षांपासून भाजपा-सेना युतीची सत्ता अबाधित राहिली. राज्यात भाजपा लहान भावाच्या भूमिकेत असतानाही जळगावात मात्र भाजपा मोठ्या भावाच्या भूमिकेत राहिला. अध्यक्षपद व महत्त्वाची सभापतिपदे भाजपा स्वत:कडे राखत असे. लोकसभा, विधानसभा, सहकारी संस्था, विधान परिषद आणि नगरपालिका निवडणुकांमध्ये भाजपाची यशस्वी घोडदौड सुरू राहिली. परंतु एकनाथराव खडसे यांच्यावर झालेले आरोप, त्यांनी दिलेला मंत्रिपदाचा राजीनामा, पक्षश्रेष्ठी व मुख्यमंत्र्यांविषयी त्यांनी उघडपणे व्यक्त केलेली नाराजी, खडसे आणि गिरीश महाजन यांच्यातील तीव्र मतभेद अशी स्थिती पाहता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जि.प. निवडणुकीपूर्वी भाकरी फिरवली. जळगावचे पालकमंत्रिपद खडसेंचे निकटवर्तीय असलेल्या पांडुरंग फुंडकर यांच्याकडून काढून ते मुख्यमंत्री व पक्षश्रेष्ठींचे निकटवर्तीय चंद्रकांत पाटील यांच्याकडे सोपविण्यात आले. सार्वजनिक जीवनाची सुरुवात अभाविपचे पूर्णवेळ कार्यकर्ते म्हणून जळगावपासून करणाऱ्या चंद्रकांत पाटील यांचे या जिल्ह्याशी भावनिक नाते आहे. संघटनकौशल्य आणि समन्वयाची भूमिका या गुणांच्या बळावर त्यांनी खडसे-महाजन गटात समतोल साधला. पक्षीय उमेदवारांच्या मुलाखतीसाठी खडसे आले नसले तरी महाजन यांच्या सोबत खडसे यांच्या स्रुषा खासदार रक्षा खडसे उपस्थित राहिल्या. कार्यकर्ता मेळावा, जाहीरनामा प्रकाशनाला दोन्ही नेते उपस्थित राहिले. उमेदवार निश्चित करताना खडसे-महाजन यांच्यासह तालुक्यातील लोकप्रतिनिधीला विश्वासात घेण्यात आले. मुख्यमंत्र्यांच्या सभेत खडसे-महाजन हे दोन्ही उपस्थित होते. जाहीर सभेत त्यांना बोलण्याची संधी न देण्याच्या खेळीने पक्षातील मतभेदाचे जाहीर प्रदर्शन टळले. पालकमंत्री स्वत: तीनदा प्रचारासाठी येऊन गेल्याने त्यांना वास्तव लक्षात आले आणि गरज असेल तेथे बांधबंदिस्ती त्यांनी केली.
राज्यभर भाजपा-सेनेमध्ये उघड आरोप-प्रत्यारोप सुरू असले तरी जळगावात भाजपाने सावध भूमिका घेतली. विधानसभा निवडणुकीत युती तोडण्याचे खापर खडसेंच्या माथी फुटल्याने यावेळी त्यांनी जाहीररीत्या युतीला होकार भरला. शिवसेनेचे सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील आणि खडसे यांचे राजकीय वैमनस्य उघड आहे. दोघांनी एकमेकांवर आरोप केले. पण उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी टीका दोघांनी टाळली. गुलाबराव पाटील आणि गिरीश महाजन यांची मैत्री आहे. पण ती मैत्री पक्षीय वाढीच्या आड येणार नाही, याची काळजी महाजन यांनी घेतली. चाळीसगाव, भुसावळ, अमळनेरमध्ये पक्षांतर्गत मतभेद उघडपणे समोर आले; परंतु जिल्हा नेत्यांनी हा विषय सामंजस्याने हाताळला. तो वाढू दिला नाही.
सहकारी संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि गुलाबराव पाटील वगळून इतर शिवसेनेच्या नेत्यांशी एकनाथराव खडसे यांनी जुळवून घेत सर्वपक्षीय आघाडीचा फॉर्म्युला वापरत वर्चस्व मिळविले. दूध संघ, जिल्हा बँक, साखर कारखाना यावर प्रथमच भाजपाची सत्ता आली. जिल्हा परिषद निवडणुकीत स्वबळावर सत्ता हस्तगत करण्यासाठी उर्वरित तिन्ही पक्षांमधील मातब्बरांना प्रवेश देण्याचे धोरण खडसे, महाजन आणि पाटील या त्रिकूटाने राबविले आणि त्याला चांगले यश मिळाले. याचा फटका काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांना बसला. ‘आयाराम-गयाराम’मुळे भाजपाची काँग्रेस होऊ लागल्याच्या आरोपाकडे दुर्लक्ष करीत उत्कृष्ट नियोजन व आपत्ती व्यवस्थापन केल्याने भाजपाला एवढे घवघवीत यश मिळाले आहे.
१५ पैकी केवळ ३ तालुक्यात भाजपाच्या पदरी निराशा पडली, ९ पंचायत समित्यांवर भाजपाची सत्ता आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने दुसरा क्रमांक कायम ठेवला असून सत्तेत राहून शिवसेनेला काहीही लाभ झालेला नाही. गेल्यावेळेप्रमाणे तिसरा क्रमांक कायम राहिला. ११ तालुके काँग्रेसमुक्त झाले आहेत. भाजपाची घोषणा काँग्रेसच्या मंडळींनीच पूर्ण केली.
- मिलिंद कुलकर्णी

Web Title: BJP's Best Disaster Management

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.