भाजपाचा सूर हरपलेलाच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 12:41 AM2017-11-30T00:41:48+5:302017-11-30T00:41:52+5:30
खान्देशात भाजपाचा प्रभाव असतानाही नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे. भाजपा-शिवसेना युती सरकारचा हा दुसरा कार्यकाळ पहिल्या सरकारपेक्षा काकणभर सरस असणे अपेक्षित असताना तसे घडत नसल्याचा सूर आता भाजपामधून उमटू लागला आहे.
-मिलिंद कुलकर्णी
भाजपा-शिवसेना युती सरकारचा हा दुसरा कार्यकाळ पहिल्या सरकारपेक्षा काकणभर सरस असणे अपेक्षित असताना तसे घडत नसल्याचा सूर आता भाजपामधून उमटू लागला आहे. मंत्रिपद गमवावे लागलेले एकनाथराव खडसे तर उघडपणे सरकारविरोधात विधाने करीत आहे. मात्र मंत्रिपदासाठी बाशिंग बांधून असलेले आमदार, पक्षश्रेष्ठी आणि मुख्यमंत्र्यांकडून झुकते माप न मिळणारे आमदार खासगीत सरकारविरोधात कुजबूज करीत आहेत. ही कुजबूज वा-याच्या वेगाने कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचत असल्याने सरकारविषयी एकंदर नाराजीचा सूर वेगाने उमटू लागला आहे.
नेते आणि कार्यकर्त्यांमधील अस्वस्थता वेगवेगळ्या निवडणुकीच्या माध्यमातून ठळकपणे समोर येत आहे. नंदुरबार जिल्ह्यात नंदुरबार, नवापूर, तळोदा या पालिकांच्या निवडणुका लागल्या आहेत. या निवडणुकीची सूत्रे माजी मंत्री डॉ.विजयकुमार गावित व त्यांची कन्या आणि जिल्हाध्यक्ष डॉ.हिना गावित यांच्याकडे पक्षाने सोपविली आहे. पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते आणि लोकसभा निवडणुकीत भाजपाचे दोनदा उमेदवार राहिलेले डॉ.सुहास नटावदकर कोठेही पटलावर दिसत नाही. त्यांची अलिप्तता बोलकी आहे. तळोद्यात भाजपा आमदार उदेसिंग पाडवी यांना सर्वाधिकार दिले असताना त्यांनी प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ.शशिकांत वाणी यांच्या गटाला पूर्णपणे डावलले आहे. डॉ.वाणी स्वत: नगराध्यक्षपदासाठी इच्छुक होते. त्यांना तर उमेदवारी दिली नाहीच; परंतु त्यांच्या पत्नी आणि विद्यमान नगरसेविका सुनीता वाणी यांचे तिकीट कापण्यात आले. वाणी यांच्या गटाच्या एकूण चार विद्यमान नगरसेवकांची तिकिटे कापण्यात आली. याउलट शिवसेनेतून आलेल्या तिघांना वा त्यांच्या कुटुंबीयांना भाजपाने उमेदवारी दिली. अनुभवी नगरसेवकांना घरी बसवून १५ नवख्या चेहºयांना संधी देण्यामागचे गणित अनाकलनीय असे आहे. आता वाणी यांची भूमिका, त्याचा पक्षीय कामगिरीवर होणारा परिणाम याविषयी भाजपांतर्गत चर्चा सुरू आहे. जळगाव जिल्ह्यातील वरणगाव( ता.भुसावळ) नगर पंचायतीच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपाच्या दोन उमेदवारांनी अर्ज दाखल करून मतभेदांचे उघड प्रदर्शन केले आहे. एकनाथराव खडसे यांच्या प्रभावक्षेत्रातील हे शहर असून त्यांनी ज्येष्ठ कार्यकर्ते सुधाकर जावळे यांच्या पत्नीला उमेदवारी जाहीर केली. मात्र युवा कार्यकर्ते आणि गटनेते सुनील काळे यांनी स्वत: अर्ज दाखल करून खडसे यांच्या निर्णयाला आव्हान दिले. पूर्वी आईला शब्द देऊन उमेदवारी दिली नव्हती, आता स्वस्थ बसणार नाही, अशी बंडखोरीची भाषा काळे यांनी जाहीररीत्या केली. असे प्रथमच घडले आहे. धुळ्यात केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे आणि आमदार अनिल गोटे यांच्यातील कलगीतुरा नेहमीच रंगत असतो. यावेळी मनमाड-इंदूर रेल्वे मार्गाचे निमित्त मिळाले. कामाचे श्रेय घेण्यावरून वाद असला तरी दुसरा कसे अडथळे आणतो, हे सांगण्यावर दोन्ही लोकप्रतिनिधींचा भर असल्याने भाजपाच्या प्रतिमेला धक्का बसत आहे.
जळगावात महसूलमंत्री चंद्रकांत पाटील हे पालकमंत्री आहेत. ते सवडीने जळगावात येत असतात. खडसे हे मंत्रिमंडळात पुनरागमनाच्या प्रतीक्षेत आहेत तर जलसंपदामंत्री गिरीश महाजन हे जळगावचे पालकमंत्रिपद कधी मिळेल, याची वाट पहात आहेत. भाजपाचे कार्यकर्ते पालकमंत्र्यांसह खडसे, महाजन गटात विभागले गेले आहेत.