भाजपाचे दुष्काळी दौरे उपचारात्मकच!

By Admin | Published: May 14, 2016 01:37 AM2016-05-14T01:37:06+5:302016-05-14T01:37:06+5:30

तद्दन उपचार म्हणून केल्या जाणाऱ्या राजकीय दौऱ्यांतून अगर भेटींतून फारसे काही निष्पन्न होत नसते; परंतु तरी ते केले जातात, कारण किमान लोकभावनांशी समरसता साधण्याचा हेतू त्यामागे असतो

BJP's drought tour is curative! | भाजपाचे दुष्काळी दौरे उपचारात्मकच!

भाजपाचे दुष्काळी दौरे उपचारात्मकच!

googlenewsNext

तद्दन उपचार म्हणून केल्या जाणाऱ्या राजकीय दौऱ्यांतून अगर भेटींतून फारसे काही निष्पन्न होत नसते; परंतु तरी ते केले जातात, कारण किमान लोकभावनांशी समरसता साधण्याचा हेतू त्यामागे असतो. राज्यातील सत्ताधारी भाजपाने दुष्काळ पाहणीसाठी जे दौरे चालविले आहेत त्याकडेही याच भूमिकेतून पाहता यावे. शिवाय, या दौऱ्यांमागे या पक्षाचा आणखीही एक उद्देश असावा तो म्हणजे सहयोगी शिवसेनेवर मात करण्याचा; जो लपून राहू शकलेला नाही.
दुष्काळाच्या वणव्यात होरपळलेल्या ग्रामस्थांना दिलासा देण्यासाठी ठिकठिकाणी प्रत्यक्ष भेटी देऊन तेथील वस्तुस्थिती जाणून घेण्याकरिता ‘भाजपा’चे मंत्री, आमदार व अन्य पदाधिकारी नुकतेच नाशिक जिल्हा दौऱ्यावर येऊन गेलेत. नाशकातच झालेल्या पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत या संबंधीचा निर्णय झाला होता. कारण या दौऱ्यांमागेही पार्श्वभूमी होती ती शिवसेनेतर्फे करण्यात आलेल्या अशाच दौऱ्यांची. सत्तेत सहभागी असूनही शिवसेनेच्या मंत्र्यांनी राज्यात दौरे करून दुष्काळी उपाययोजनांसाठी व संपूर्ण कर्जमाफीकरिता प्रसंगी रस्त्यावर उतरण्याची इशारेबाजी केली होती. परस्परांमधील वर्चस्ववादात लोकांची सहानुभूती शिवसेनेला कशी लाभेल, याचा विचार त्यामागे होता. विविध आघाड्यांवर भाजपाकडून कशी अन्यायाची भूमिका पार पाडली जाते, हे लोकांच्या निदर्शनास आणून देण्यासाठी शिवसेनेतर्फे नाशकात महामोर्चाही काढण्यात आला होता. या एकूणच एकतर्फी प्रचारतंत्राचा समाचार घेऊन, आपणही लोकांच्या बरोबर आहोत; भाजपाचे सरकार दुष्काळाच्या प्रश्नी तितकेच संवेदनशील आहे हे दाखवून देण्यासाठी संपूर्ण राज्यातच या दौऱ्यांचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, आता पावसाळा तोंडावर आला आहे. अनेक ठिकाणी तर वळवाच्या पावसाने वर्दीही देऊन झाली आहे. अशात भाजपाचे पदाधिकारी आपले दुष्काळी दौरे पूर्ण करतील कधी आणि त्यांचा अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर होऊन त्यानुसार उपाययोजना साकारतील कधी, याबाबत शंका घेतली जाणे अस्वाभाविक नाही. कारण तसाही राज्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहेच. भाजपाच्या सदर पाहणी दौऱ्यांकडे केवळ उपचार म्हणून पाहता येणारे आहे ते त्याचमुळे.
महत्त्वाचे म्हणजे, उपचाराचा आणि लोकांची सहानुभूती मिळवण्याचा हा प्रकार असला तरी, तोदेखील भाजपाला प्रभावीपणे पार पाडता आला नसल्याचे चित्र आहे. यंदाच्या दुष्काळाने जो कहर मांडला आहे त्यातून नाशिक जिल्ह्यात गेल्या चार महिन्यात तीस शेतकऱ्यांनी आत्महत्त्या केल्याच्या घटना घडल्या आहेत. दुष्काळाचा दाह किती असहनीय ठरला आहे त्याची या दुर्दैवी घटनांतून प्रचिती यावी. परंतु तालुका-तालुक्यांत दौऱ्यावर येऊन दुष्काळी परिस्थितीची पाहणी करून गेलेल्या भाजपाच्या नेत्यांनी जिल्ह्यातील कुणा आत्महत्त्या केलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबीयांची भेट घेत त्यांचे सांत्वन केल्याची अगर त्यांना दिलासा दिल्याची वार्ता वाचावयास मिळू शकलेली नाही. त्याउलट शिवसेनेच्या मंत्री व पदाधिकाऱ्यांनी संबंधितांच्या भेटी तर घेतल्याच, शिवाय आपल्या परीने पक्षस्तरावरून काही जणांना आर्थिक मदतही दिली. जिल्ह्यातील काही भागात शिवसेनेतर्फे पाण्याचे टँकर्स व जनावरांसाठी चारा छावण्याही सुरू करण्यात आल्या आहेत. संवेदनशीलतेची कृतिशील दखल घेतल्याचे त्यातून दिसून आले. तेव्हा भाजपाचा उपचारही परिणामकारकतेची पातळी गाठू शकला नसल्याचेच यातून स्पष्ट व्हावे. दुसरे म्हणजे, जिल्ह्यात अन्यत्र असे दौरे करताना नेमके भाजपाचे आमदार असलेल्या चांदवड तालुक्यालाच त्यातून वगळण्यात आले. त्यामुळे केवळ अन्य पक्षीय आमदारांच्याच कार्यक्षेत्रात दुष्काळी दौरे करून भाजपातर्फे निव्वळ राजकारणच केले गेल्याचे म्हणता येणारे आहे.
- किरण अग्रवाल

Web Title: BJP's drought tour is curative!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.