भाजपाचे बेगडी दलितप्रेम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2018 05:42 AM2018-05-04T05:42:33+5:302018-05-04T05:42:33+5:30
नरेंद्र मोदी यांच्या सूचनेमुळे ज्यांच्या मनातील दलितद्वेष अजून गेला नाही त्या भाजपामधील अनेक मंत्र्यांची व पुढाऱ्यांची त्याविषयीची बनवाबनवी आणि उडवाउडवी सुरू झाली आहे
दलित समाजाशी संपर्क वाढविण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेमुळे ज्यांच्या मनातील दलितद्वेष अजून गेला नाही त्या भाजपामधील अनेक मंत्र्यांची व पुढाऱ्यांची त्याविषयीची बनवाबनवी आणि उडवाउडवी सुरू झाली आहे. प्रथम उत्तर प्रदेशातील सुरेश राणा या ज्येष्ठ मंत्र्याने अलिगड जिल्ह्यातील एका दलित कुटुंबात रात्रीचा मुक्काम केला. मात्र त्या मुक्कामात त्याने शेजारच्या हलवायाकडून मागविलेले जेवण घेतले. घर चालेल पर जेवण नको हा त्याचा पवित्रा त्याच्या पक्षातील अनेकांना अजून समर्थनीय बनविता आलेला नाही. नेमक्या याच सुमारास भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या, मध्य प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री व आताच्या केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी ‘दलितांच्या घरी जाऊन जेवायला मी काही प्रभू रामचंद्र नाही’ असे कमालीचे संतापजनक विधान केले आहे. ‘त्यांनी माझ्याकडे जेवावे, मी मात्र त्यांच्याकडे जेवणार नाही’ हा त्यांचा खुलासाही तेवढाच धक्कादायक आहे. प्रत्यक्ष प्रभू रामचंद्राने शबरीने दिलेली तिची उष्टी बोरे खाल्ली ही रामायणातील सर्वतोमुखी असलेली, त्या दैवताचा गौरव वाढविणारी कथा या साध्वी म्हणविणाºया बार्इंना ठाऊक नसावी हा त्यातला आणखी दुर्दैवाचा भाग. गांधीजी दिल्लीत असत तेव्हा भंग्यांच्या वस्तीत राहत आणि त्यांच्याच हातचे जेवत. त्यांना मिळणाºया अपुºया सोयीतच ते स्वत:चे सारे भागवत. प्रत्यक्ष व्हाईसराय माऊंट बॅटन आणि पंतप्रधान नेहरू व उपपंतप्रधान पटेल हेही चर्चेसाठी त्यांना त्या वस्तीत जाऊन भेटत. एका उद्योगपतीने तुमची राहण्याची याच वस्तीतील व्यवस्था अधिक सुखकर करण्याची जबाबदारी आपण घेऊ असे म्हणताच गांधीजी म्हणाले, तशी व्यवस्था या साºयांसाठी व कायम स्वरूपाची करणार असाल तरच मी तिचा स्वीकार करीन. तथापि अशा तुलनेत अर्थ नाही. कुठे गांधी आणि कुठे हा राणा आणि कुठे त्या उमाबाई? माणुसकी आणि मनुष्यधर्म ज्यांच्या मनात पूर्णपणे रुजला आहे त्यांची गोष्ट वेगळी आणि धर्माच्या जीर्ण आज्ञा डोक्यात ठेवून माणसा-माणसांचा वेगळा विचर करणाºयांची बात वेगळी. मोदींचे सरकार दिल्लीत सत्तारूढ झाल्यापासून देशातील दलितांचे वर्ग दुखावले व दुरावले आहेत. आपल्यावर या राजवटीत अन्याय होतो, डॉक्टरेट करायला जाणारी आपली मुले आत्महत्या करतात आणि आपल्याकडील तरुणांना भर रस्त्यात व पोलिसांच्या देखत मारहाण केली जाते हे पाहणाºयांचा वर्ग तसा संतापणार नाही तरच ते नवल ठरते. आताच्या भाजपाच्या दलितप्रेमाची खरी गरज २०१९ मधील सार्वत्रिक निवडणूक ही आहे. उत्तर प्रदेशात अखिलेश यादवांचा समाजवादी आणि मायावतींचा बहुजन समाज, हे दोन पक्ष एकत्र आले तेव्हा भाजपाने गोरखपूर व फूलपूर गमावले. त्या दोन पक्षांची युती अशीच कायम राहिली तर उत्तर प्रदेशातील भाजपाच्या खासदारांची आताची ७३ ही संख्या कमी होऊन २३ वर येईल हा आकडेतज्ज्ञांचा अंदाज त्या पक्षाला भेडसावणारा आहे. त्यामुळे दलितांघरच्या जेवणावळी व त्यांच्या वस्त्यांना भेटी असा राजकीय कार्यक्रम त्याने हाती घेतला आहे. सुरेश राणा आणि उमा भारती यांचा असा बचाव माध्यमांनी उघड केल्यानंतर त्यांना तºहेतºहेचे बनावटी खुलासे करावे लागत आहेत. अशा बेगडी वागणुकीहूनही तिचे केले जाणारे समर्थन अधिक संतापजनक आहे. त्यातून त्यांच्या नेतृत्वाचे समाधान कदाचित होईल. मात्र दलितांचे वर्ग व एकूणच भारतीय समाज यातील कशावरही विश्वास त्ठेवणार नाही, हे उघड आहे. समाजाने खºया अर्थाने एकात्म व्हावे यासाठी या देशातील महापुरुषांनी याआधी केलेले प्रयत्न पाहिले की आताची राजकीय वागणूक केवळ फसवीच नव्हे तर त्या महापुरुषांचा अपमान करणारी आहे असेही मनात येते.